Home > मॅक्स ब्लॉग्ज > रमाई : बाबासाहेबांच्या रामू

रमाई : बाबासाहेबांच्या रामू

आज दि. २७ मे रोजी माता रमाबाई आंबेडकरांची पुण्यतिथी भारतीय संस्कृतीतील स्त्रीजीवनाचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून माता रमाई अग्रणी आहेत. त्यांच्या जीवनातील काही घटनांचा किशोर मांदळे यांनी घेतलेला मागोवा...

रमाई : बाबासाहेबांच्या रामू
X

दापोलीच्या वणंदकर धोत्रे यांची कन्या राणीबाई ही सुभेदार रामजी बाबा सपकाळ यांची सून म्हणून आली तेव्हा अवघी ९ वर्षांची होती. साल होते १९०८. बाबासाहेबांचे वय तेव्हा १७ वर्षे. आई-वडिलांचे छत्र हरवलेली. चुलते व मामा यांनी वाढवलेली. शांत, सुस्वभावी. खडतर कष्टाचेच प्राक्तन घेऊन जन्माला आलेली. सुभेदार रामजी बाबांनी तिला रमाबाई हे नाव दिले. बाबासाहेब तिला रामू म्हणत !

गोष्ट परळच्या चाळीतील आहे. बाबासाहेबांना डॉक्टरेट मिळाल्याने त्यांची ओळख आता डॉक्टर बी.आर. आंबेडकर अशी झालेली. आपला नवरा खूप शिकलेला व आता तर डॉक्टर झालेला. पण सदा पुस्तकात काय डोकं घालून बसलेला असतो. पुस्तकांचा लईच नाद या माण्साला. रमाबाई स्वतःची समजूत काढत व हेही दिवस बदलतील असा मनोमन विश्वास बाळगत ओढग्रस्त संसार रेटत राहिल्या.

एका रात्री चाळीतील एका बाईचे दिवस भरत आले व बाळंतपणाच्या कळांनी बाई कासावीस झालेली. शेजारणी जमल्या. रमाबाई देखील त्यातच. थोड्या थोड्या वेळाने त्या बाईच्या खोलीत डोकावून यायच्या. परंपरागत उपचार चालूच होते. इतक्यात रमाबाईंना आठवले - आपला नवरा डॉक्टर आहे ! त्या बाबासाहेबांना म्हणाल्या, अवं ... ती बाय बघांना. तीच दीस भरून आल्यात. लयच कशी कायनूक करतीय. बाबासाहेब पुस्तकातून डोकं वर न काढताच, शांतपणे म्हणाले - मग, मी काय करू ? रमाबाईंनी ते ऐकून घेतले व पुन्हा एकदा त्या बाईकडे एक चक्कर टाकून आल्या. त्या बाईच्या आकांताचे गाऱ्हाणे पुन्हा नवऱ्यापुढे मांडले. बाबासाहेब म्हणाले, मग डॉक्टरांना बोलवा !

रमाबाईंनी बाबासाहेबांकडे आश्चर्याने पाहिले व धीर करून म्हणाल्या - आता कशाला बाहेरचा डॉक्टर बोलवायचा ? तुमीच हैत की डॉक्टर ! ते ऐकताच बाबासाहेबांना एकदम सात मजली हसू फुटले व ते काही क्षण डोळ्यात पाणी येईपर्यंत हसतच राहिले. रमाबाई पार गोंधळून गेल्या. हसणे आवरते घेत बाबासाहेब म्हणाले - रामू, मी तसला डॉक्टर नाही !

मगं वं कसलं डॉक्टर हैत तुम्ही ! रमाबाईं पुढचं ऐकायला अधीर झाल्या होत्या. बाबासाहेब शांतपणे म्हणाले - रामू, अगं मी पुस्तकांचा डॉक्टर आहे ! ते ऐकून रमाबाई मटकन खालीच बसल्या. डोईवर दोन्ही हातांची कमान ठेवून स्वतःशीच पुटपुटल्या - आता गं बाई ! आजवर माण्संच आजारी पडायची. आता पुस्ताकंबी आजारी पडायला लागली की काय ...

रमाबाईंच्या त्या निरागस मूर्तीकडे पहात स्वगत बोलावे तसे बाबासाहेब बोलते झाले. म्हणाले, होय. रामू. होय ! पुस्तके सुद्धा आजारी पडतात ! इथली सर्व पोथ्या-पुस्तके आजारीच आहेत. आजारी मनाच्या माणसांनीच जणू ती लिहिली आहेत ! मला ती सर्व पुस्तके बरी करायची आहेत. त्यांच्यावर उपचार करायचे आहेत. साध्या औषधाने बरी झाली नाहीत तर ... त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पुस्तकांचाच दवाखाना उभा करायचा आहे ! मला पुस्तकांसाठी माझे 'राजगृह' बांधायचे आहे !

या 'राजगृहात' आपल्या रामूला घेऊन १९३४च्या फेब्रुवारी महिन्यात बाबासाहेब राहायला आले. 'राजगृहा'चे सुख जेमतेम वर्ष सव्वा वर्षच रमाईला लाभले. २७मे १९३५ला महामानवाच्या या शांत, निगर्वी व शालीन सावलीने 'राजगृहा'तच अखेरचा श्वास घेतला.

शूद्रातिशूद्रांना इथल्या व्यवस्थांनी दोन हजार वर्षे दिलेल्या न्यूनगंडावर बाबासाहेबांनी एकहाती मात केली व आम्हा बहुजनांना या न्यूनगंडातून बाहेर तर काढलेच पण आम्ही अहंगंडाकडे जाऊ नये म्हणून प्रज्ञा, शिल, करुणा व मित्रता यांची दीक्षा दिली. समताभावी लोकशाहीचे स्वप्न असलेले अजोड संविधान दिले.

या संविधानाच्या पानापानांवर रमाईने ओठांत दाबून ठेवलेल्या आसवांच्या सलील सत्वाचे शिंपण आहे ! घरोघरीच्या रमाईंनो, सावित्री - जोतिबांनो, संविधानाच्या पानापानांना समतेच्या स्वप्नांचा गंध आहे. ती समता प्रत्यक्षात आणू तेव्हाच भीम-रमाईचे पांग फिटतील !

- किशोर मांदळे, पुणे

Updated : 27 May 2022 2:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top