Home > मॅक्स ब्लॉग्ज > आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारा नेता : राजीव गांधी

आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारा नेता : राजीव गांधी

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त राजीव गांधी यांच्या कर्तृत्वाचा वेध घेतला आहे जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...

आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारा नेता : राजीव गांधी
X

पंतप्रधान म्हणून अमेरिकेत गेले होते तेव्हा ते म्हणाले होते, मी तरुण आहे आणि प्रत्येक तरुणाप्रमाणे माझंही एक स्वप्न आहे. हे स्वप्न होतं आधुनिक भारताचं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. टेलिकॉम क्रांती त्यांच्यामुळे झाली. कंप्युटर आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीची सुरुवात त्यांनी केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की अन्य कोणता, त्यासाठी तंत्रज्ञान हवं, त्यानुसार नवीन राजकीय रचना हव्यात याचा पुरस्कार त्यांनी केला. विविध मिशन्सची स्थापना त्यांनी केली.

चौखंबा राजनीतीची कल्पना मांडली होती राममनोहर लोहियांनी. मात्र ती मूर्त करण्यासाठी ग्रामपंचायतींना घटनात्मक स्थान दिलं राजीव गांधींनी. मतदानाचा अधिकार २१ वर्षीय व्यक्तीला होता. राजीव गांधींनी तो १८ वर्षांच्या युवक-युवतींना दिला.

असम करार केला आणि असममधील फुटीरतावादी चळवळींना पायबंद घातला. मिझोराममधील फुटीरतावादी चळवळीचे नेते लालडेंगा यांच्याशी करार करून मिझोराममध्ये शांतता प्रस्थापित केली. असम आणि मिझोराम दोन्ही राज्यांमध्ये बिगर काँग्रेस सरकारं स्थापन झाली.

पंजाब करार करण्यासाठी काँग्रेसचे शत्रू मानलेल्या शरद पवारांची मदत घेतली, अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी ज्युलियो रिबेरो यांना तिथे पाठवलं.

पक्षांतर विरोधी कायदा केला.

श्रीलंकेतील तमिळ फुटीरतावाद्यांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला.

सारांशाने सांगायचं तर इंदिरा गांधी यांनी जे राजकीय प्रश्न निर्माण केले ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राजीव गांधी यांनी केला. त्यासाठी व्होट बँकेचा मुद्दा बाजूला सारला. त्यामुळे काँग्रेसमधील पारंपारिक नेतृत्वाला धक्का बसला. उदा. अर्जुन सिंग, इत्यादी. राजकारणात अनुभवाला कमालीचं महत्व असतं. राजीव गांधी अननुभवी होते. त्याचा फायदा काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींनी घेतला. या पक्षश्रेष्ठींना व्होट बँकांची चिंता होती.

शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की शहाबानोला मेहेरची रक्कम मिळणं ही बाब मुस्लिम वैयक्तीक कायद्यानुसार रास्त आहे, परंतु तिला पोटगी मिळणं हा तिचा हक्क आहे, भारतीय राज्यघटनेनुसार. काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींनी आणि मुस्लिम धर्ममार्तंडांनी या विरोधात आवाज उठवला. आणि मुस्लिम व्होट बँक कायम ठेवण्यासाठी कायदा बदलण्याचा निर्णय घेणं राजीव गांधींना भाग पाडलं. त्यामुळे भारत सरकार नाही तर काँग्रेस आणि समस्त सेक्युलर आणि स्वातंत्र्यलढा व राज्यघटनेची मूल्यं पाळणारे हिंदू विरोधी आहेत असा प्रचार संघ परिवाराने सुरु केला.

त्यावर उतारा म्हणून अरुण नेहरू यांच्या सल्ल्याने बाबरी मशिदीला लावलेलं कुलुप उघडण्यात आलं. शिलान्यासाला परवानगी देण्यात आली. गावा-गावातून एक वीट अयोध्येला नेण्याचा मार्ग मोकळा झाला.

बोफोर्स प्रकरण उद्भवलं. राजीव गांधींना किकबॅक वा पैसे मिळाले नव्हते परंतु तोफांच्या खरेदीत दलाली गेली होती.

इंदिरांजीच्या हत्येनंतर दिल्लीत शीखांचं शिरकाण झालं. हे शिरकाण करण्यात दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. परिणामी १९८४ नंतर काँग्रेस कधीही स्वबळावर सत्तेत आली नाही. १९९१ साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेवर येणार होती. मात्र तेव्हाच प्रभाकरनने दावा साधला.

राजीव गांधी यांना मनःपूर्वक आदरांजली.

Updated : 21 May 2022 8:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top