मनसे च्या झेंड्यावरील ' राजमुद्रा ' बेकायदेशीर आहे का?
मनसे च्या झेंड्यावर असलेली ‘राजमुद्रा’ बेकायदेशीर आहे का? कायदा काय सांगतो वाचा Adv. असिम सरोदे यांनी दिलेली माहिती
X
छत्रपती शिवाजी महाराजांची तेव्हाची राजमुद्रा आता इतिहासाचा एक भाग आहे. ती राजमुद्रा महाराष्ट्रातील सर्वांच्या स्वाभिमानी इतिहासाची निशाणी आहे. त्या राजमुद्रेचे कुणी कॉपीराइट घेतलेले नाही व घेऊ सुद्धा शकत नाहीत.
भारत स्वतंत्र झाला तेव्हाच संविधानाने सगळे जुने पद, पदव्या, टायटल्स ( जुने चिन्ह, निशाण्या ) रद्द केलेले आहेत.
राज ठाकरे यांच्या मनसे च्या झेंड्यावर असलेली ' राजमुद्रा ' काढून टाका असे सांगण्याचा कायद्याच्या दृष्टीकोनातून कुणालाच अधिकार नाही. मनसे च्या झेंड्यावर तेव्हाची ' राजमुद्रा' असणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही, मनसे च्या झेंड्यावर ' राजमुद्रा' असणे बेकायदेशीर सुद्धा ठरत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, राजमुद्रा , त्यांचे गड-किल्ले, त्यांच्या कार्याचा इतिहास यातून शिवाजी महाराजांचे विचार कोण मांडतात व पाळतात याचा शोध नागरीकांनी घेत राहिले पाहिजे, तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मित्र म्हणून भेटतील.
इतिहासात रमणे, भावनांनाच महत्व देणे, त्या ऐतिहासिक गोष्टींचे व जातीय भावनांचे राजकारण करणे हेच काम सगळे राजकीय पक्ष करीत आहेत. झेंडे, रंग, चिन्ह, आकृत्या, प्रतीकं यांच्या भोवती राजकारण फिरते यासाठी सामान्य माणसाने बुद्धीशी फारकत घेतली हेच कारण आहे. आजच्या काही राजकीय लोकांचा घसरलेला दर्जा ही आपली समस्त नागरिकांची चूक आहे ती आपणच सुधारली पाहिजे.