Home > मॅक्स ब्लॉग्ज > राज ठाकरे यांचे राजकारण भरकटतेय

राज ठाकरे यांचे राजकारण भरकटतेय

शनिवारी गुढी पाडवादिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष होते. अलीकडे काही महत्त्वाचे प्रश्न वरचेवर गंभीर होत असतानाच नजिकच्या काळात मुंबईसह इतर प्रमुख शहरांतील महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींचा निवडणूक कार्यक्रम आहे. त्यातच पंजाबमध्ये मिळालेल्या यशानंतर आम आदमी पार्टी (आप) ला हुरूप चढला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा पक्ष उतरणार असल्याने त्याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणात या सर्वांचे प्रतिबिंब कसे उमटते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांचा राजकीय भूमिका व विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी...

राज ठाकरे यांचे राजकारण भरकटतेय
X

रोखठोक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज यांच्या भाषणावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज यांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर प्रतिकूल प्रतिक्रियांची संख्या समाज माध्यमांवर तरी जास्त आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते-कार्यकर्ते आणि समर्थक सोडले तर राज यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर इतरांकडून फारशी अनुकूल प्रतिक्रिया येत नाही. असे का व्हावे हा विचार स्वतः राज आणि त्यांचे कट्टर समर्थक नक्कीच करतील. पण त्याची चिकित्सा विविध माध्यमांतून होणे अपहिरार्य आहे.

राज यांची मुख्यमंत्रीपदाची मनिषा

राज यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लक्ष्य बनवले. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे त्यांचा रोख होता. आपले चुलतबंधू उद्धव यांच्याबाबतची त्यांची मते काही नवीन नाहीत. सन २००० च्या दशकाच्या आरंभी महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव यांची निवड झाल्यापासून दोघांमधील सुप्त संघर्ष वरचेवर तीव्रच होत गेला. त्याची परिणती २००६ मध्ये मनसेच्या स्थापनेत झाली पण त्या आधीही काही सूचक घटना घडत होत्या.

२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ संघाने सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या मान्यवरांचे वार्तालाप आयोजित केले होते. त्या वार्तालापासाठी उद्धव ठाकरे यांनी यावे यासाठी अनेकदा संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने राज ठाकरे यांना निमिंत्रित केले गेले होते. त्यावेळी बोलताना, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे विधान राज यांनी केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः किंवा कुटुंबातील कोणालाही निवडणुकीच्या राजकारणात उतरू देण्याविरोधात होते. त्यामुळे या विधानानंतर मोठे काहूर उठले होते. राज असे का बोलले असतील यावर बरेच दिवस चर्वीतचर्वण झाले. पण त्यांच्या मनात काही तरी शिजत होते हे २००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यावर उघड झाले.

उद्धव यांच्याशी कौटुंबिक संबंधही कमीच

अलिकडे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाला त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. राज यांनी शिवाजी पार्क येथे बांधलेल्या नव्या घराला भाजपा व अन्य पक्षांतील काही लोकांनी राज यांच्या आमंत्रणावरून भेट दिली. पण उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय जाऊन आल्याचे दिसले नाही. यावरून या दोघा भावांतील दुरावा खोलवर रुजल्याचे दिसून आले होते.

शनिवारी राज काही गोष्टी उघड बोलले आहेत. महापौर बंगला ताब्यात घेऊन तिथे स्व. बाळासाहेब यांचे स्मारक बनवायला आपला विरोध होता.. ईडीच्या नोटिसा चार महिन्यांपूर्वीच आल्या होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.. त्याची परिणती नातलगांच्या मालमत्तांवर टाच येण्यात झाली.. नोटिसांबदद्ल संताप येतो तर नातलगांना मुंबई महानगरपालिकेत जाऊ देऊ नका.. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे होते ना, मग घ्या आता.. समोरचे (म्हणजे भाजपा) गप्प थोडेच बसणार आहेत, ही विधाने उद्धव यांच्याबाबत होती. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसे उत्तर देतात याकडे आता लक्ष लागेल.

राज यांच्याबाबतीतच बोलायचे झाले तर त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून निवडणूक लढवायला काय हरकत होती? तसे केले असते तर २००९ साली केवळ १३ नव्हे तर जास्त आमदार निवडून आले असते. राज यांच्या त्यावेळच्या राजकारणाची पद्धत लोकाना कमालीची आवडली होती. मराठी भाषेची आणि तरुणांची होत असलेली गळचेपी, बेरोजगारी, परप्रांतियांचे आक्रमण, काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण यावर त्यांची आक्रमक मते आणि काही खळ्ळ-खट्याक घडामोडी लोकांना तरी भावल्या होत्या. पण राज यांच्यातला निष्णात राजकारणी कधी वर आलाच नाही. त्यामुळे हे सारे अल्पजीवी ठरले.

राजकीय हताशपणा, अमित यांना पुढे चाल

याची त्यांना जाणीव आहे की नाही हे माहित नाही पण आता तर त्यांच्या भाषणातला रोख पाहिला तर काहींसा हताश झालेला राजकारणी डोकावतोय. राज हे वय वाढलेले किंवा थकलेले राजकारणी दिसत नाहीत. पण त्यांच्या भाषणात तुटक-तुटकपणा जाणवत होता. विषय खुलवत नेत असतानाच ते थांबत होते इतर विषयाकडे वळत होते. इतर कुठलाही श्लेष काढण्यापूर्वी एक सांगता येईल की राज यांनी स्वतःला खूप मर्यादित करून घेतले आहे. का, ते त्यांनाच ठाऊक.

त्यांच्या राजकारणाची दिशा वरचेवर खूप मर्यादित होत आहे. अलीकडे त्यांनी आपले चिरंजीव अमित यांना पुढे आणण्यास सुरूवात केली आहे. राजकारणाबाबतची राज यांची स्वतःची मते त्यांच्यातील राजकारणी पुढे येऊ देण्यास अडथळा तर ठरत नसतील ना? कारण ते जेव्हा नाशिक महानगरपालिकेतील विकास कामाबद्दल आणि नंतरच्या निवडणुकीतील अपयशाबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्यातील निराश राजकारणी बोलत असतो. हे चांगले लक्षण नाही.

ज्या व्यक्तीने राजकारणाचे बाळकडू आपले चुलते, एक धगधगते नेतृत्व असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतले आहे, आणि शरद पवार यांच्यासारख्या कसलेल्या मुरब्बी राजकारण्याची विविध प्रश्नांवर जाहीर मुलाखत घेतली आहे त्यांनी एका महानगरपालिकेतील पराभव इतका मनाला लावून घ्यावा हे आश्चर्य आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतल शिवसेनेच्या बऱ्याच जागा मनसेमुळे गेल्या आणि विरोधी पक्षनेतेपद प्रथमच भाजपाकडे गेले तेव्हा स्व. ठाकरे यांना काय वाटले असावे याची कल्पना ते करू शकतात.

राजकारण वाढवताना मर्यादा

पक्षातील स्थानिक सुभेदार, कार्यकर्ते काहीतरी उलटेसुलटे काम करतील म्हणून त्यांना वर्षानुवर्षे कार्यक्रमच द्यायचा नाही, हे राजकारण असू शकत नाही. माझी भाषणे ऐका आणि खुष रहा असे म्हणून कसे चालेल? राज्यापुढे अनेक समस्या असताना, पारंपरिक संस्थानिक पद्धतीच्या राजकारणाला लोक विटलेले असताना आणि ते एका चांगल्या पर्यायाच्या शोधात असताना मनसेसारखा पक्ष एकदम उंचावर जाऊन पुन्हा खाली का येतो, याचा अभ्यास नाही करायचा?

राजकारण करताना विरोधी पक्षातील लोकांशी असलेली मैत्री आपल्या पक्षवाढीच्या विरोधात येऊ द्यायची नसते. शरद पवार यांचे उदाहरण याबाबत लक्षात घेण्यासारखे आहे. पडद्याआड आपली मैत्री ते दिलदारपणे निभावतील पण निवडणूक आल्यानंतर त्याच मित्राच्या कार्यक्षेत्रात आपला कार्यकर्ता कसलीही भीडभाड न ठेवता निवडून आणतील. पण इकडे गंमतच आहे. एखाद्या जिल्ह्यात दौऱ्यावर गेल्यानंतर आपले कार्यकर्ते ज्या प्रस्थापिताच्या विरोधात लढतात त्याच्याच घरी चहापानाला जायचे. आम्ही ज्याच्या विरोधात लढतोय त्याच्या घरी गेल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ होईल आमचे राजकारण अडचणीत येईल, असे कार्यक्रते म्हणत असतानाही नाकावर टिच्चून जायचे. त्यामुळे तिथे पक्ष वाढेल कसा, आणि कार्यकर्ते कसे टिकून राहतील याचा विचार नको करायला? आपण राजकारणी आहोत, राजकीय विचारवंत नव्हे याचे भान बाळगण्याची गरज असताना आपल्याला राजकीय उंची मिळवून देणारे महत्त्वाचे मुद्दे गमावत आहोत, याचे भान कसे काय रहात नसावे हे उलगडत नाही. याचबरोबर आपले राजकीय सहकारी आपल्याला का सोडून जात आहेत, याचाही विचार करताना ते दिसत नाहीत. जाणाऱ्यांना महत्त्व द्यायचे नसेल तर किमान नवे तरी सहकारी जोडले गेले पाहिजेत. पण तसेही दिसत नाही.

ज्वलंत प्रश्नांवर भूमिका नाही

कधीकाळी टोलच्या मुद्दयावर रान पेटावयचे. पण आजही याबाबत जनमत अस्वस्थ असताना त्यावर बोलायचे नाही. या विषयावर मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला जाताना हुशारीने मिडीयाच्या वरिष्ठांना घेऊन जायचे. का, तर बैठकीनंतर आंदोलन मागे घेतले तर मिडियातून उलटसुलट चर्चा सुरू होऊ नये म्हणून. पण अशामुळे जनमत सोबत राहण्याची हमी काय, हा प्रश्न पडत नाही?

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यामुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. १ एप्रिलपासून मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क वाढवले गेले आहे, गावागावात अकृषिक कराच्या वसुलीमुळे आणि मालमत्ता नोंदणीतील याबाबतच्या काही बदलांमुळे मध्यमवर्गीय अस्वस्थ आहे, शिक्षण प्रचंड महाग होत आहे, खासगी संस्थाचालक आणि कार्पोरेट शिकवणीचालक यांच्याकडून मध्यमवर्गीयांची पिळवणूक होत आहे, टोलचे दर वाढले आहेत, आदी प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली तर त्याला मोठे जनसमर्थन मिळेल, हे माहिती असूनही ते टाळले जात असेल तर आनंदीआनंद आहे.

पुण्याबाबत ठोस भूमिका

नाशिकसोबतच पुणे येथेही मनसेला मोठा पाठिंबा मिळाला होता. पुणे महानगरपालिकेत मनसे हा प्रमुख विरोधी पक्ष होता. आज पुणे व आजूबाजूला प्रचंड विस्तार झाला आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील उद्योगांमुळे विविध भागातील तरुणवर्ग पुण्यात स्थायिक होत आहे. पण वाढत्या नागरीकरणानंतर काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पायाभूत सुविधा, वाहनांची कोंडी हे तर विषय आहेतच, शिवाय नव्याने वाढलेला जो भाग महानगरपालिकेच्या हद्दीत आला आहे तेथील निवासी इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या जोडण्या लगेच मिळतात का, मिळत नसतील तर त्याची कारणे काय, पाण्याचे टँकर चालवणारांच्या टोळ्या आहेत का, त्यांची नेमकी भूमिका काय, एखाद्या इमारतीला सक्तीने पाणी घेण्यास भाग पाडले जाते का, पाण्याचे बील खूप येते म्हणून टँकर कमी केले तर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण होते का, होत असेल तर ते करणारे कोण आहेत, या व अनेक जिवाळ्याच्या प्रश्नांना हात घातला नाही तर तरुण पिढी कशी सोबत येईल. असेच प्रश्न थोड्याफार फरकाने इतरही शहरांत आहेत. याचा विचार होत नाही.

काही औद्योगिक वसाहतींत आणि नागरीकरण होत असलेल्या भागात सिमेंट, दगड, वाळू, विटा, कामगार पुरविणारे ठराविक लोक कोण आहेत, त्यांची तिथे मक्तेदारी कशी चालते, त्यामुळे काय नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही औद्योगिक वसाहतीत वस्तूंचा पुरवठा, कामगार पुरविणारे, वाहतूक कंत्राटदार, भंगार उचणारे लोक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कोणीतरी जाहीरपणे चर्चेत आणाव्यात असे उद्योजक आणि तिथे काम करणारांनाही वाटते. पण रोजच्या जगण्यातील भेदक प्रश्न न मांडता आम्हाला पक्त आदर्शवाद शिकविला जात असून महापुरुषांचे दाखले देण्याचे काम सुरू आहे, असे तरूण पिढी म्हणत असेल तर त्यावर कोण बोलणार?

लोकांच्या मनातील मुद्दे हवेत

जो नेता लोकांच्या मनातील प्रश्नांवर बोलतो त्याला जनसमर्थन लाभते. एखाद्या निवडणुकीत अपयश आले तर त्यामागची कारणे शोधावी लागतात. मतदारांवर नाराज होऊन, चिडून चालत नाही. शनिवारच्या भाषणात लोकांच्या मनातील काही मुद्दे राज यांनी उपस्थित केले. त्याला लोकांतून लगेच प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये आमदारांना मुंबईत घरे द्यावीत का आणि आमदार-खासदारांना निवृत्तीवेतन कशाला हवे हे दोन मुद्दे होते. यावर त्यांनी अधिक बोलायला हवं होते. एकवेळ गरजूंना मदत करायला कोणी नाही म्हणणार नाही. पण त्यांनी आपण गरजू आहोत, हे जाहीरपणे सिद्ध केलं पाहिजे. लोकांना नाही का एखाद्या योजनेचा लाभ देताना पात्रता सिद्ध करण्यास सांगितले जाते. पण ज्यांची पोटं भरलेली आहेत किंवा ज्यांना पुढच्या किमान काही पिढ्यांना गरज भासणार नाही त्यांना का दिले जावे, यावर जनमताचा कानोसा घ्यायला हवा होता.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे उतरणार हे निश्चित आहे. पण मुंबईकरांच्या सध्याच्या समस्यांवर कोण, किती आवाज उठवतो याकडे लोक पाहत आहेत. विद्यमान नगरसेवकांची मुदत संपत असताना व आर्थिक वर्ष संपत असताना मुंबईत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली. सध्या अनेक ठिकाणी पदपथ दुरुस्ती कामे सुरू आहेत. चांगले पदपथही दुरुस्त केले जात आहेत. त्यावरच्या टाईल्सचा दर्जा काय हे पाहिल्याबरोबर लक्षात येते. अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी, रस्ता काँक्रिटीकरणसाठी रस्ते बंद आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न छोटे वाटले तरी ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यावर बोलायला हवे होते.

राष्ट्रवादीने छगन भुजबळांना का मंत्री केले ते काय स्वातंत्र्यवीर आहेत का हा सवाल राज यांनी केला. हाच प्रश्न भुजबळ यांना मंत्रीमंडळात घेतले त्याचवेळी विचारला गेला पाहिजे होता. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने यावर का प्रतिक्रिया दिली नाही हे ही विचारायला हवे होते. अलीकडेच भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त केले तेव्हा आणि त्या विरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे टाळले तेव्हा प्रमुख विरोधी पक्षाने का प्रतिक्रिया दिली नाही, हेही विचारायला हवे होते.

अजूनही वेळ गेलेली नाहीशनिवारी गुढी पाडवादिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष होते. अलीकडे काही महत्त्वाचे प्रश्न वरचेवर गंभीर होत असतानाच नजिकच्या काळात मुंबईसह इतर प्रमुख शहरांतील महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींचा निवडणूक कार्यक्रम आहे. त्यातच पंजाबमध्ये मिळालेल्या यशानंतर आम आदमी पार्टी (आप) ला हुरूप चढला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा पक्ष उतरणार असल्याने त्याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणात या सर्वांचे प्रतिबिंब कसे उमटते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांचा राजकीय भूमिका व विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी...

एकेकाळी अखिल भारतीय विद्यार्थी सेना, शिवउद्योग सेना याद्वारे तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण करणारे राज आता परिपक्व नेते झाले आहेत, हे दाखवून देण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. मात्र पूर्वग्रह न बाळगता प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची तयारी त्यांनी दाखविली पाहिजे. मात्र त्यासाठी त्यांनी, मला वाटले तर मी लोकांना, कार्यकर्त्यांना भेटणार, मला वाटले तर मी बोलणार, मला वाटले तर मी सभा घेणार, तुम्हाला काय वाटतं मला काहीच कळत नाही का, हे दूर ठेवायला हवे. त्यांच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट, महाराष्ट्राचे नवनिर्माण ही भाषा लोकांच्या लक्षात आहे.

आजच्या राजकारणाला मोठी आर्थिक ताकद लागते हे खरेच. पण ती नसेल आणि लोकांच्या ज्वलंत समस्यांना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता भिडण्याची तयारी ठेवली तर लोकही इतर गोष्टीचा विचार करत नाहीत. हे 'आप' या पक्षाने दाखवून दिले आहे. भूमिकेतील अनाकलनीय बदल लोक स्वीकारत नाहीत. मोदींची लोकप्रियता व त्यांच्या गुजरात मॉडेलवर खूप चर्चा सुरू असताना त्याबाबत चांगले बोलायचे व नंतर टीका करायची हे लोकांना पटले तरी पाहिजे. मोदींनी विरोधकांना नामोहरम करत आपले राजकारण कसे वाढवत नेले हे ही लक्षात घेतले पाहिजे.

आपण जे बोलतो आणि राजकारण करतो त्यामुळे आपलीच मतपेढी वाढते की इतर कोणाची याचा विचार राज करत नसतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण आपली स्वतंत्र ओळख गमावणे म्हणजे आपले राजकारण आपण संपवण्यासारखे आहे याची काळजी घेणेही आवश्यक आहे. भाजपाबरोबर राहण्यामुळे कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे आजवर भले झालेले नाही, हे त्यांना माहिती असणारच.

आज ८१ वर्षाचे शरद पवार सर्वांना पुरून उरतात. त्यांच्यावर टीका करण्यासारखे अनेक मुद्दे असतीलही, पण राजकारणी म्हणून त्यांच्यातल्या जमेच्या बाजूवर मात करण्याची तयारी असलेलाही कोणी नाही. आपल्या हातात मोजकेच पत्ते आहेत हे पवार यांना माहिती नसते का? पण तेच पत्ते ते बेमालूमपणे फिरवतात आणि त्यांच्या विरोधकांना नामोहरम करतात. त्यांच्या पक्षामुळे जातीवाद वाढला हा आरोप त्रयस्थ व्यक्ती म्हणून ठीक आहे. पण तसे करूनही ते आजच्या राजकारणातली आपली काहीतरी उपयुक्तता निश्चितपणे टिकवून असतील आणि त्याला आव्हान देण्याच्या क्षमतेवर कोणी गांभीर्याने काम करत नसेल तर दोष कुणाचा?

नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाचे प्रतिनिधित्व करू शकेल अशा सर्वसमावेशक राजकीय भूमिकेच्या तरुण नेत्याची गरज महाराष्ट्राला निश्चितच आहे. ती संधी राज ठाकरे यांच्यासाठी संपलेली नाही. पण त्यासाठी काम करायचे की नाही हे त्यांनीच ठरवायचे आहे.

Updated : 3 April 2022 7:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top