Home > मॅक्स ब्लॉग्ज > राज, शिंदे, अजितदादा आणि एका राजकीय शोकांतिकेची करुण सुरुवात!

राज, शिंदे, अजितदादा आणि एका राजकीय शोकांतिकेची करुण सुरुवात!

राज, शिंदे, अजितदादा आणि एका राजकीय शोकांतिकेची करुण सुरुवात!
X

आपण पत्रकार होतो हे कोणत्याही पत्रकारिता सोडून दिलेल्या पत्रकाराला विसरणे शक्य होत नाही. तो या ना त्या प्रकारे स्वत:तला पत्रकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा किमान तो मरू नये, अशी त्याची मनोमन इच्छा असते. हे दहा अकरा वर्षांपूर्वी सक्रिय पत्रकारितेस रामराम केलेल्या माझ्याबद्दलही खरेच आहे. अजूनही एखादा दिवस असा येतो, की आज आपल्या हाती लिहिण्याची, बोलण्याची हक्काची जागा असती तर, आपण हे लिहिले असते किंवा ते बोललो असतो असे अतिशय तीव्रतेने वाटते. कालचा दिवसही असेच वाटण्याचा दिवस होता.

काल एकाच दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अशा घटना घडल्या की त्याबद्दल पत्रकारांनी टोकदारपणे लिहायला हवे होते, असे वाटले. परंतु अर्थकारणाच्या दबावामुळे कोणत्याही मराठी वर्तमानपत्रात मग तो आघाडीचा असो की पिछाडीचा, असे करणे कोणत्याही पत्रकाराला आता शक्य नाही. त्यामुळे अजूनही प्रमुख मराठी वर्तमानपत्रांतून काम करणाऱ्या काही चांगल्या पत्रकारांनी दबक्या आवाजात आणि अडून-अडून या गोष्टींबद्दल लिहिले आहे. पण ते स्पष्टपणे लिहायला हवे होते.

अनेक घटनांपैकी तीन महत्त्वाच्या घटना ज्यांच्याबद्दल काल काहीतरी उल्लेखनीय घडले त्या घटना आहेत.

१. राज ठाकरे यांचे भाजपच्या बोलावण्यावरून विशेष विमानाने दिल्लीला जाणे, साडेबारा तास भेटीची सूचना येण्याची वाट बघणे आणि शेवटी अमित शाह यांना अर्धा तास भेटून मुंबईला परत येणे. आता राज ठाकरे यांच्या मनसेला किमान दोन जागा देऊन भाजप महायुतीत सामावून घेईल, अशा बातम्या वर्तमानपत्रांत leak केल्या गेल्या.

. काल एकनाथ शिंदे यांचे पाच विद्यमान खासदार शिंदेंना भेटायला गेले आणि आमच्या जागांबद्दल भारतीय जनता पक्षाकडून उलटसुलट माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली जात आहे अशी त्यांनी तक्रार केली. खरे म्हणजे या पाच पैकी पाचही जागांवर भारतीय जनता पक्षाला एकतर कमळ चिन्हावर स्वतःचे उमेदवार उभे करायचे आहेत किंवा विद्यमान खासदार बदलून शिंदेंनी नवा उमेदवार द्यावा अशी भाजपची इच्छा आहे.

३. काल सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरायला सशर्त वापरायला परवानगी दिली. परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहोतगी यांना भरपूर सुनावले. अजित दादांची कृती ही घटनेतील दहाव्या अनुसुचीची आणि मतदारांची चेष्टा नव्हे काय असा थेट प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला आहे.

साधारण दहा वर्षांपूर्वीचा काळ असता तर या तीन व इतरही अनेक राजकीय घडामोडींबद्दल अत्यंत परखड आणि टोकदार संपादकीय, राजकीय भाष्य आणि काही लेख छापून आले असते. परंतु मोठ्याप्रमाणावर राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना शरण गेलेल्या आजच्या पत्रकारितेच्या काळात असे काही घडेल याची आशाही करणे चुकीचे आहे. असो.

१. पहिल्या घटनेविषयी

कोण्या एकेकाळी या राज्यात बाळासाहेब ठाकरे नावाचे एक पक्षप्रमुख भारतीय जनता पक्षाशी राजकीय युती करून सुद्धा दबक्याने वागवायचे. भाजपचा उल्लेख ते अनेकदा कमळाबाई असा करायचे. अनेकदा ते भाजप नेत्यांचा जाहीरपणे पाणउतारा करायचे. हे काही योग्य होते असे नाही. परंतु असे ते करायचे हे खरे. तरीही बाळासाहेब ठाकरे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना दिल्लीत भेटायला जायचे नाही. लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नीतीन गडकरी, इत्यादी भाजपचे त्यावेळचे प्रमुख नेते बाळासाहेबांना भेटायला थेट मातोश्रीवर जायचे. बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते झाल्यानंतर अनेकदा ते दिल्लीला गेले, यावरून उद्धव ठाकरे यांना अनेकदा उपहास सहन करावा लागलेला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनीही बाळासाहेबांप्रमाणेच दिल्लीसमोर कालपर्यंततरी मान झुकवली नव्हती. भाजपचे अनेक नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावे लागत असे. काल पहिल्यांदा भाजपने विमान पाठवून राज ठाकरे यांना दिल्लीला बोलावून घेतले. ‘बोलावलं म्हणून आलो’ असे स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. राज ठाकरे सोमवारीच दिल्लीला पोचले. परंतु त्यांना अमित शहांकडून ताबडतोब ‘बोलावणे’ काही आलेच नाही. साडेबारा तास ते चौदा तास इतका वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी राज ठाकरे यांना अमित शाह यांनी appointment दिली आणि अर्धा तास ‘सकारात्मक’ चर्चा घडून आल्याचे ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बाळ नांदगावकर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

आता महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय असलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांना आणि मनसेला दिल्लीच्या तख्तापुढे जाऊन उभे राहणे अपरिहार्य झाले आहे, हे स्पष्ट झाले. कोण्या एकेकाळी दिल्लीच्या तख्ताचे प्रतिनिधी बाळासाहेब ठाकरे यांना थेट मातोश्रीवर भेटायला यायचे, ही आता यापुढे राजकीय दंतकथा म्हणून सांगितली जाईल. त्यांच्या दोन्ही वारसांनी या कथेला दंतकथा करण्यात आपापला वाटा उचलेला आहे. हा या घटनेचा राजकीय अन्वय आहे.




२. दुसऱ्या घटनेविषयी

सामान्यतः एखादा पक्ष दुसऱ्या पक्षाशी जेव्हा युती करतो तेव्हा भविष्यातील निवडणुकीत त्या पक्षाच्या विद्यमान आमदार व खासदारांच्या संख्येपेक्षा जवळजवळ दुप्पट जागांवर किंवा कमीतकमी विद्यमान संख्येपेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करणार हे गृहीत धरलेले असायचे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांनी हे राजकीय गृहीतक इतिहासजमा करण्याचे ठरविले आहे, असे दिसते. २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. त्यापैकी १३ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात निघून गेले. गंमत म्हणजे शिंदे यांना १८ पेक्षा जास्त किंवा किमान १८ तरी लोकसभा मतदार संघांत उमेदवार उभे करायला संधी मिळायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात मात्र शिंदे यांना त्यांच्या गटातील विद्यमान १३ खासदारांच्या लोकसभा मतदार संघांपैकी किमान ३ आणि कमाल ५ जागांवर पाणी सोडावे लागेल किंवा उमेदवार बदलावा लागेल किंवा स्वतःचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उभे करावे लागेल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

यामुळे रामटेक, वाशीम, पालघर, शिर्डी आणि कोल्हापूर या पाच मतदार संघांतील कृपाल तुमाने, भावना गवळी, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे आणि संजय मंडलिक यांच्यासह काही खासदारांनी काल शिंदे यांची भेट घेतली व त्यांना वाटणारी काळजी बोलून दाखवली. ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील उल्लेखनीय घटना आहे. शिंदे भाजपसोबत गेल्यावर त्यांना सत्ता मिळाली, ते स्वतः मुख्यमंत्री झाले. परंतु या पुढे त्यांना भाजपने महायुतीत का ओढून घेतले याचे नित्यनवे साक्षात्कार होणार आहे असे दिसते. पहिल्याच झटक्यात शिंदे यांना १३ पेक्षा कमी खासदारकीच्या जागा देऊन त्यांची महायुतीतली जागा भाजप दाखवून देत आहे. प्रत्यक्षात १३ पेक्षा शिंदेंची एकजरी जागा कमी झाली, तर शिंदे यांना उठता बसता टोमणे मारणाऱ्यांची संख्या मोजताही येणार नाही इतकी वाढेल. तसेच लोकसभा निवडणुकीत जर ते विद्यमान खासदारांनाही उमेदवारी देऊ शकले नाहीत आणि त्यांना दिल्लीश्वरांनी हवे तसे झुकायला लावले, हे चित्र जर अंतिम ठरले तर शिंदे त्यांच्या विद्यमान आमदारांना तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ शकतील की नाही, याबद्दल साधार शंका उपस्थित केली जाईल.

तुलनेत उद्धव ठाकरे यांना त्यांनी मागच्या निवडणुकीत जिंकून आणलेल्या १८ पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा वाट्याला आल्याचे वास्तव लोक शिंदे यांच्यापुढे आरसा म्हणून सतत दाखवत राहतील.




३. तिसऱ्या घटनेविषयी

अजितदादा गटाला निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह बहाल करून टाकले आणि अजितदादांची राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी असेही घोषित करून टाकले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने काल जी निरीक्षणे मांडली व जे आदेश पारित केले त्यानंतर अजितदादा गटाला घड्याळ हे चिन्ह त्यांना केवळ सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपावेतो अटी-शर्तींसह वापरायला मिळाले असून तो निर्णय अंतिम नाही याची निवडणुकीत जाहिरातच करावी लागणार आहे. Poster, Banner आणि जाहिरातीत सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेचा सतत उल्लेख करावा लागणार आहे. ‘घड्याळ हे आमचे चिन्ह आहे, पण ते अंतिम नाही’ हे वाक्य अजितदादांना या लोकसभा निवडणुकीत सारखे लिहित बसावे लागणार आहे. कदाचित हे वाक्य त्यांच्या स्वप्नातही त्यांना टोचत राहील.

जी नामुष्की अजित पवार यांना सगळ्यात जास्त टोचणार आहे, ती बारामतीच्या लोकसभा मतदार संघात. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना महायुतीत घेऊन उपमुख्यमंत्री केले तेव्हा बारामती मतदार संघात त्यांनी सुप्रिया सुळे म्हणजे पर्यायाने शरद पवार यांच्या निवडणुकीतल्या पराभवाची हमी द्यावी ही पहिली अट होती. त्यामुळे बारामती मतदार संघात अजित पवार यांची आयुष्यभराची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ती जपण्यासाठी त्यांनी आजवर राजकारणात प्रत्यक्ष भाग न घेणाऱ्या स्वतःच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच मैदानात उतरवले आहे आणि सुनेत्रा वाहिनी यांचे निवडणूक चिन्ह हे घड्याळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर अजितदादांना बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातच मी म्हणतो म्हणून काकांना हरवा; मी म्हणतो म्हणून सुनेत्रा पवार यांना निवडून द्या; मी म्हणतो म्हणून घड्याळावर शिक्का मारा असे भावनिक आणि राजकीय आवाहन करत मतदार संघात प्रचार करावा लागेल. परंतु प्रत्येकवेळी जाहिरातीच्या खाली जसे लिहिले असते तसे घड्याळ हे आपलेच चिन्ह आहे पण अंतिम नाही हे सांगण्याचे दुःख पचवावे लागेल.ही एका राजकीय शोकांतिकेची अत्यंत करुण अशी सुरुवात आहे!



लेखक- गणेश कनाटे

माजी संपादक, (टी.व्ही.९ आणि साम टी.व्ही. मराठी)


Updated : 21 March 2024 1:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top