Home > मॅक्स रिपोर्ट > जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरू, राहुल गांधी यांनी घातला महाराष्ट्राच्या अस्मितेला हात

जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरू, राहुल गांधी यांनी घातला महाराष्ट्राच्या अस्मितेला हात

जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरू, राहुल गांधी यांनी घातला महाराष्ट्राच्या अस्मितेला हात
X

राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून जात आहे. या यात्रेदरम्यान झालेल्या जाहीर सभांमधून राहुल गांधी यांनी बहुजन समाजाच्या अस्मितेला हात घालत बहुजन समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

शेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना मार्ग दाखवण्याचे काम केले. एवढंच नाही तर जिजाऊंमुळे शिवाजी महाराज एवढं मोठं काम करू शकले, असं म्हणत राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला घातली.

बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मगाव सिंदखेड राजा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आवर्जुन आपल्या भाषणात जिजाऊंचा उल्लेख केला. त्यामुळे राहुल गांधी यांनी बहुजन समाजातील महापुरूषांचा उल्लेख करून बहुजन मराठा समाजाला आकर्षित करीत असल्याचे म्हटले जात आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात आदिवासी, ओबीसी, दलित समाजाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि संत बसवेश्वर यांना पुष्प अर्पण करून वंदन केले. तेव्हाच राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील रणनिती स्पष्ट झाली होती. त्यानुसारच राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत असताना बहूजन समाजाला साद घातली.

नांदेड येथील सभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी कधीही द्वेष पसरवण्याचे काम केले नाही. या महापुरूषांनी सातत्याने प्रेम वाटण्याचे काम केले. या महापुरूषांमध्ये कोणत्याही प्रकारचा अंहकार नव्हता. त्यामुळेच या महापुरूषांचे विचार घेऊन ही भारत जोडो यात्रा सुरू आहे, असं राहुल गांधी नांदेडपासून ते शेगावपर्यंत सांगत राहिले.

राहुल गांधी यांनी ज्या पध्दतीने महापुरूषांचा उल्लेख करून बहूजन समाजातील मराठा, ओबीसी, दलित समाजाला साद घातली. त्याप्रमाणेच राहुल गांधी यांनी वाशिममध्ये आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला जात असल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवले. तसेच बिरसा मुंडा यांचा कर्तृत्वाचा गौरव करत राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली.

राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना थेट सावकरांवर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी वयाच्या 24 व्या वर्षी ब्रिटीशांनी दिलेल्या प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. मरण आले तरी ते शरण गेले नाहीत. मात्र दुसरीकडे दोन तीन वर्षे अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगली तर सावरकरांनी इंग्रजांना चिठ्ठ्या लिहायला सुरूवात केली. ब्रिटीशांची माफी मागितली. मात्र सावरकरांना भव्य दिव्य दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण बिरसा मुंडा यांच्या कतृत्वाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. या यात्रेत सातत्याने राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे एकप्रकारे भविष्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून बहूजन समाजाच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated : 19 Nov 2022 1:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top