राहुल गांधी .... २०२४ सालातील देशाचे प्रधानमंत्री
राहुलजी , आपल्या ५१ व्या वाढदिवसानिम्मित आपल्याला खूप खूप शुभेच्छा... नावात काय आहे ? शेक्सपिअरने लिहिलंय नावात काय आहे . परंतु राहुलजी आपल्या नावातच सर्व काही आहे . राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त निवृत्त पोलिस अधिकारी विश्वास कश्यप यांनी शब्दमय भावना व्यक्त केल्या
X
तथागत गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव राहुल होते . तुमचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना बुद्ध तत्वज्ञानाचं फार मोठं आकर्षण होते . त्यामुळेच असेल कदाचित तुमच्या आजीने तुमचे नाव राहुल ठेवले .
राहुल गांधी म्हणजे ....
राहुल गांधी म्हटले की एक हुशार, संयमी, विवेकी, अभ्यासू , नम्र , देखणं आणि प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेला , उच्चशिक्षित , संवेदनशील , देशाचा नेतृत्व खंबीरपणे करू शकणारा सहृदयी माणूस डोळ्यासमोर उभा राहतो .
वडिलांप्रमाणेच नवनवीन वैज्ञानिक संशोधनात रुची असणारा राहुल .
भाजपा आय . टी . सेल ....
राहुलजी , भाजपा सरकार तुम्हाला पहिल्यापासून घाबरत आहे . सन २०१४ च्या अगोदरपासून त्यांनी तुम्हालाच टार्गेट करायला सुरुवात केली . तुमच्या छोट्या छोट्या चूका शोधून त्यात स्वतःचा नवीन मिरची मसाला टाकून भाजपा आय . टी . सेलने तुम्हाला जाणीवपूर्वक बालिश आणि हास्यास्पद बनविले . तुम्हाला "पप्पू " केले . समाजमाध्यमाचा त्यावेळेस सर्वात नीच आणि घाणेरडा वापर त्यांनी केला . दिड दमडीचे हे आय . टी . सेलवाले वाटेल तसे आपल्याविरुद्ध प्रचार करीत होते . हा प्रचार इतका निर्दयी होता की सगळा देश गोंधळून गेला . स्वतःला विचारवंत समजणारे भले भले दिड शहाणे तुमच्यावर टीका करायला लागले . त्यांच्यासाठी तुम्ही एक सॉफ्ट टार्गेट होतात . आधीच मरगळलेल्या अवस्थेत असणारी तुमची काँग्रेस त्या भयंकर हल्ल्यासमोर अगदी हतबल झालेली दिसली . आपण सुद्धा वैयक्तिक बरेच बॅक फुटवर गेलात . आपल्याला इतक्या खालच्या पातळीवरचा प्रचार अपेक्षित नव्हता . कारण तोपर्यंत भारतीय राजकारणाची पातळी इतक्या खालच्या पातळीवर कधीच गेली नव्हती . सगळा भारत देश ह्या भाजपा आय . टी . सेलवाल्यांनी ( राज ठाकरेंच्या भाषेत नाजायज औलाद ) गोंधळून ठेवला होता . तो अजूनही बऱ्यापैकी गोंधळलेलाच आहे . जितका देश गोंधळलेला असेल तितके ह्या गोंधळी लोकांना हवेच आहे .
मानवतावादी विचार ....
आपण लहान वयात आपल्या आजीची आणि ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर वडिलांची हत्या पहिली . एखादा असता तर तो क्रूर मानसिकतेचा झाला असता . सगळया समाजाला दोष देऊन आपण एक चिडखोर , हुकूमशाही वृत्तीचे झाला असता . परंतु तसे न होता आपण एक संयमी , मानवतावादी विचारांचे पाईक झालात .
एकाग्रचित राहुल ....
ह्या भाजपावाल्यांनी आपल्याला जेवढया घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केले तेवढ्या पद्धतीने संपूर्ण जगातून ट्रम्प ना सुद्धा ट्रोल केले गेले नाही . ज्यांना धड एक वाक्य सरळ लिहिता , बोलता येत नाही , ज्यांचा आय . क्यू . दहा ते अकरा वर्षाच्या मुलांच्या इतका आहे ते अंधभक्त तुमच्यावर घरात बसल्या बसल्या टी व्ही वरील बातम्या पाहत तोंडसुख घेत होते . परंतु आपण आपल्या मनावरचा संयम कधीच ढळू दिला नाही . ह्या गोष्टीला फार मोठी शक्ती लागते . मनाचा मोठेपणा लागतो . व्हाट्सउप च्या ग्रुपवर जर कोणी एकदोघांनी मिळून आमच्यावर टीका केली तर आम्ही दोन दोन दिवस अस्वस्थ असतो . आम्हाला झोप येत नाही . आपण इतके कसे एकाग्रचित राहू शकता ?
उच्च प्रतीची एकाग्रता ....
आमच्या आईला जर कोणी बोलले तर आम्ही झटकन आरे ला कारे करतो . इथे भारतीय संस्कृतीचा उदो उदो करणारे , उच्च कोटींची परंपरा ,देवींची पूजा , नवरात्री उत्सवात फक्त गरम पाणी पिऊन दिवस काढणारे , आपल्या आईला घाणघाण भाषेत बोलून त्यांना बारबाला म्हणून हिणवतात तेव्हा तुम्ही किती शांत असता . इतक्या उच्च प्रतीची सहनशीलता कोठून शिकलात आपण ?
बेईमान व्यापारी , उद्योजक .....
ज्या व्यापाऱ्यांनी , उद्योजकांनी काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून प्रचंड माया जमविली तीच मंडळी काँग्रेसला नावे ठेऊ लागली . आपल्याला बालिश समजू लागली . कारण ह्या जमातीला आता त्यांच्याच जमातीतील एक म्होरक्या मिळाला होता . त्या म्होरक्याला त्याच्यात असलेले नसलेले सर्व गुण चिकटवून त्यांनी त्याला जादूच्या दिव्यातील जिनी करून टाकला . बस . तो म्होरक्या आल्याआल्याच देशाला स्वर्ग बनवून टाकेल . पण पहिल्या काही वर्षातच ह्या मंडळींना त्यांची चूक लक्षात आली . परंतु गिरे तो भी टांग उपर ह्या न्यायाने कसेबसे ही मंडळी आपल्या म्होरक्याचा उदोउदो करण्यात गुंगच राहिली . गेल्या एक वर्षापासून आणि आता कोरोनो महोत्सवात तर ह्यांच कंबरडच मोडलय . ह्या व्यापारी उद्योजकांच जेवढं नुकसान होईल तेवढं चांगलंच आहे . कारण केवळ ह्यांच्यामुळेच ही ब्याद आमच्या डोक्यावर बसवली गेली आहे . आता उद्योजक बुडाले तर देशाचं काय होणार असले फालतू प्रश्न विचारून काहीही होणार नाही , हे भिकेला लागलेच पाहिजेत कारण सर्वसामान्य जनता ह्यांच्या काळात भिकेलाच लागली आहे .
विपश्यनेचा प्रचंड प्रभाव .....
आपण मध्यंतरी विपश्यना केलीत . त्यानंतर आपल्या व्यक्तीमत्वात कमालीचा आत्मविश्वास आणि एक डॅशिंग नेता आम्हाला दिसून आला . २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही खऱ्या अर्थाने अखिल भारतीय पातळीवरील तुमचं नेतृत्व सिद्ध केलत . आपली भाषणे , बिनतोड युक्तिवाद , ते चौकीदार वगैरे वगैरे . काही विचारू नका . आपण एक झंझावात निर्माण केलात . वाटले संपले ह्या गँगचे दिवस . परंतु आम्हा सर्वांच्या दुर्दैवाने ( अंधभक्त सोडून ) इ व्ही एम च्या मदतीने हे पुन्हा मोठ्या संख्येने निवडून आले .
राजीनामा .....
त्यानंतर अतिशय विचारपूर्वक आणि नम्रपणे आपण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलात .
जशास तसे ....
आता भाजपा आय टी सेलवाल्यांच्या तोडीस तोड आपल्या पक्ष्याचे आय टी सेल काम करू लागले . त्याला घाबरून पूर्वी एक व्हाट्सउपच्या एक क्लीकवर शेकडो लोकांना जाणारी पोस्ट आता फक्त पाचच जणांना जाऊ लागली . खरतर तुमच्या आक्रमकतेला घाबरून सरकारने खेळलेली ती चाल होती . घाबरून गेले होते ते .
संसदेतील मिठी .....
संसदेत तुम्ही मारलेली मिठी आम्हा सगळ्या देशवासीयांना भावली . ज्याला मिठी मारलीत ती व्यक्तिसुद्धा काहीकाळ गडबडली . काही सुचेनासे झाले त्यांना . परंतु सत्तेची नशा चढलेल्या त्या व्यक्तीने त्यानंतर साधे उभे राहण्याचे सुद्धा सौजन्य दाखविले नाही . इतका मग्रूरपणा संसद पहिल्यांदाच पाहत होती .
पिसाळलेला मीडिया ....
व्यापारी , उद्योजकांच्या हातात संपूर्ण मीडिया असल्याने ते तुमच्यावर अक्षरशः तुटून पडतात . अर्णब गोस्वामी सारखा पाळलेला पत्रकार तुमच्या संबंधात असलेल्या बातमीत मोठ्याने किंचाळतो . आपली छटाकभर असलेली पत्रकारिता तो आपल्यावर टीका करून टिकवून ठेवतोय . आपल्यावर टीका करून अशा कित्येक पत्रकारांचे कुटुंब पोटभर खात आहेत . ह्या दलालांनी आपल्यावर जवळ जवळ बहिष्कारच घातला आहे . फक्त आपल्या विरोधातली बातमी देण्यातच हे धन्यता मानतात . नाइलाजास्तव कधी कधी ते तुम्हाला दाखवितात . तुमच्या बद्दल जास्त काही दाखवायला सुरुवात केली की लगेच त्यांचा अदृश्य मालक डोळे वटारतो . लगेचच हे शेपटी आत करून गोल गोल घुटमळायला लागतात .
देशाला कोरोना चा धोका सांगणारा प्रथम व्यक्ती ....
देशाला कोरोनाचा सगळ्यात मोठा धोका आहे याची पहिली जाणीव आपल्याला झाली . देशहितासाठी आपण ती सरकारला सांगितली . परंतु सरकारने त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष केलं . त्याचे परिणाम आज संपूर्ण देश भोगतोय . ( त्यात हे अंधभक्त सुद्धा आले )
ऑनलाइन पत्रकार परिषद .....
कोरोना महोत्सवाच्या दरम्यान आपण फेसबुक वर येऊन ऑनलाइन पत्रकार परिषद घेतलीत . त्यात एक पत्रकाराने आपल्याला एक प्रश्न केला की कोरोना बाबत केंद्र सरकारचे काय काय चुका झाल्या आहेत असे आपणास वाटते ? ह्यावर आपण उत्तर दिलेत की, पहिल्यांदा आपण सर्वांनी कोरोनावर विजय प्राप्त करू . त्यानंतर सरकारने काय काय चुका केल्या त्या मी आपल्याला सांगेन . आता सरकारच्या चुका सांगण्याची ही वेळ नाही . किती ही प्रगल्भता ! एखादा उपटसुंभ म्हणाला असता की, सरकारच हे चुकलं ते चुकलं . सध्या असल्यांची चलती आहे . टाळ्या वाजवा , दिवे विजवा , आकाशातुन फुले टाका असे वेगवेगळे भयानक आणि हास्यास्पद प्रयोग होत असताना सुद्धा आपण कधीही सरकारवर टीका केली नाही .
देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी असलेला नेता ....
देशाची अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे . केंद्रातील सत्ताधारी पक्षाला त्याची काहीही फिकीर नाही . खरेतर संपूर्ण जबाबदारी त्यांची . तसे पाहिले गेले तर सत्ताधारी पक्षाला जेवढे अपयश येईल तेवढे तुमच्यासाठी चांगलेच होते परंतु आपण तसा क्षुद्र विचार केला नाहीत . आपण जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ रघुराम राजन , अभिजित बॅनर्जी , उद्योजक राजीव बजाज ह्यांच्याशी मोकळेपणाने जाहीररीत्या बोलून सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेने काय काय उपाय केले पाहिजेत यावर सार्वजनिक चर्चा केलीत . ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर तुम्ही सरकारला अप्रत्यक्षरीत्या उपाय सुचवित होतात . अशा ह्या कृत्यासाठी ह्यांची आभार मानायची सुद्धा दानत नाही .
कारुण्याने भरलेलं व्यक्तिमत्व ....
लॉकडाऊन मध्ये रस्त्याने चालणाऱ्या मजुरांना तुम्ही कोरोनाची भीती मनात न बाळगता रस्त्यावर जाऊन भेटलात . किती ही माणुसकी , करुणा ! अशा ह्या करणेसाठी किती इंचाची छाती आहे हे पाहिले जात नाही . टी व्ही वर भाषण द्यायला येताना सुद्धा मास्क लावून येणाऱ्या नेत्यांना ते कळणार नाही .
खरा देशभक्त .....
कालच चिन्यांच्या आक्रमणानंतर तुम्ही प्रधानमंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे जाहीरपणे सांगितले . किती हा मनाचा उदारपणा औदार्यपणा ! ज्या सरकारने तुमची वाटेल तशी बदनामी केली त्याच सरकारच्या पाठी तुम्ही पक्ष म्हणून ठामपणे उभे राहिलात . देशभक्ती देशभक्ती की काय ती ह्यालाच म्हणतात ना ? चीनशी इकडे हजारो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट करायचे आणि चिन्यांनी तयार केलेल्या चड्डी बनियन वर बहिष्कार घाला म्हणणाऱ्यांना ही देशभक्ती कशी पचणार , कशी दिसणार ?
आता आपली इनिंग आणि कर्माचा सिद्धांत ....
असो . राहुलजी, आपण २०२४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री होणार ह्यात तिळमात्र ही शंका नाही . ह्यांची ही शेवटची इनिंग आहे . कारण त्यांचा हा दुसरा डाव आहे . क्रिकेट मध्ये तिसरा डाव नसतो . आता आपली इनिंग सुरू होईल . कोणत्याही परिस्थितीत हे परत येणार नाहीत कारण " कर्माचा सिद्धांत " ह्यांनाही लागू होतोच की नाही ?
आपल्याला पुन्हा एकदा आजच्या वाढदिवसाच्या आणि २०२४ च्या प्रधानमंत्री पदाच्या आताच मनःपूर्वक शुभेच्छा .
आपला चाहता , ऍड. विश्वास काश्यप , मुंबई .