Home > मॅक्स ब्लॉग्ज > #MahasaAmini : इराणमधील हिजाब सक्तीचा इतिहास काय सांगतो?

#MahasaAmini : इराणमधील हिजाब सक्तीचा इतिहास काय सांगतो?

इराणमध्ये नियमानुसार पोशाख नसल्याने पोलिसांनी महसा अमीनी या तरुणीवर कारवाई केली. त्यात तिचा मृत्यू झाला आणि इराणमध्ये महिलांचा हिजाब विरोधात उद्रेक झाला. पण इराणमध्ये महिलांची पोशाखावरील निर्बंधांबाबत काय भूमिका आहे. याबाबत लेखिका नंदीनी आत्मसिद्ध यांच्या दोन लेखांच्या मालिकेतील पहिला भाग....

#MahasaAmini : इराणमधील हिजाब सक्तीचा इतिहास काय सांगतो?
X

इराणमध्ये सध्या पेटलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र बनत चालला आहे. महसा अमीनी या तरुणीचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यानंतर हा उद्रेक सुरू झाला. महसा ही इराणच्या कुर्दिस्तान भागातली तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत तेहरानला आली होती आणि तिला तिथल्या महामार्गावर असलेल्या मॉरल सिक्युरिटी एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांनी अटक केली. कारण काय, तर तिने केलेला पोशाख म्हणे नियमानुसार नव्हता. तिला ताब्यात घेताना, तिला पोशाख नियमांबाबत समजावलं जाईल आणि तासाभरात सोडण्यात येईल, असं तिच्या भावाला सांगण्यात आलं होतं. पण नंतर तिला काही काळाने हॉस्पिटलात हलवण्यात आलं आणि दोन दिवस कोमात राहिल्यानंतर महसाचा मृत्यू झाला. तिच्या डोक्यावर, पायांवर जखमा असल्याचं भावाच्या लक्षात आलं. तिच्यासोबत कोठडीत असलेल्या बायांनी,महसाला पोलिसांनी मारहाण केली असं भावाला सांगितलं. अमानुष मारहाण, भिंतीवर डोकं आपटलं जाणं सा सगळ्या प्रकारांमुळे महसाचा मृत्यू झाला, हे समोर आल्यावर इराणमध्ये स्त्रिया आणि पुरुष महसाच्या बाजूने उभे राहिले आणि एक आंदोलनच उभं राहिलं...

स्त्रियांनी हिजाब फेकून देण्याची भूमिका घेतली. काहीजणींनी केस कापून विरोध प्रदर्शित केला. इराणमध्ये हिजाब, म्हणे हेडस्कार्फ घालणं आणि अंग झाकेल असं वस्त्र (याला चादोर/चादर म्हणतात) पांघरणं स्त्रियांसाठी बंधनकारक आहे. स्त्रीच्या डोक्यावरील केसही दिसता कामा नये, यावर कटाक्ष असतो. मात्र प्रत्यक्षात हे सगळं पाळलं जात नाही आणि बहुतेकदा पोलीसही याकडे दुर्लक्ष करतात, असं इराणशी संबंधित मैत्रीण नेहमी सांगत असते. त्यातही चादोर तर कमीजणीच घेतात. हिजाबही डोकं साधारण झाकणाराच घातला जातो. हिजाब ही इराणमधली शतकांपासून चालत आलेली परंपरा आहे. तरीही, तिची सक्ती असू नये, असं तिथल्या महिलावर्गाचं मत आहे.

शहा पहलवीने यावर बंदी घातली आणि त्याच्या मुलाच्या काळातही ती चालू राहिली होती. तेव्हा या बंधनालाही विरोध झाला होता. १९७९ साली झालेल्या क्रांतीला या मुद्द्यानेही हातभार लावला होता. मात्र हा विरोध तेव्हा केवळ धर्माच्या आघाडीवरून झालेला नव्हता. सामान्यजनांचाही त्यास पाठिंबा होता. इराणमध्ये बुरखा हा प्रकार कधीच चलनात नव्हता. हिजाब मात्र होता. तो घातला, तर शिक्षा होईल या नियमाने एकेकाळी समाजात असंतोष होता. तोही त्या सक्तीच्या विरोधात होता. आजही खरं म्हणजे हीच भूमिका इराणी स्त्रिया घेत आहेत. फरक हा की, हिजाबची सक्ती करण्याला त्यांचा विरोध आहे, अशी उलटसुलट तरीही सारख्याच तोंडवळ्याची मतं आणि मानसिकता सगळीकडच्याच समाजांमधून दिसते.

आपल्या देशातही हाच प्रकार घडत असतो. शैक्षणिक संस्थांमधून असलेली हिजाब/बुरखाबंदी सक्तीतून आली आहे. हिजाबबंदी अथवा हिजाबसक्ती दोन्हीही चुकीच्याच गोष्टी आहेत. पण हिजाब न घालण्यामुळे मुलींचं शिक्षण थांबत असेल, तर या बंदीचा पुनर्विचार व्हायला हवा. मुस्लिम समाजातील कडवी आघाडी या मुद्द्याचा वापर राजकारणासाठी करते हेही खरं आहे. अशा मंडळींना खतपाणी मिळेल अशी पावलंच उचलू नये. स्त्रियांना घाबरवून त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालणारे चुकीचंच वागत आले आहेत. पोशाखावरची बंधनं हा वादाचा चिरंतन विषय आहे. त्यातून वेगवेगळे अर्थ काढता येतात. हिजाब, बुरखा हे मागासपणाचं, स्त्रियांच्या गुलामीचं लक्षण आहे, असं म्हटलं जातं. पण अशा गोष्टींना मुस्लिम समाजातील स्त्रियाही विरोध करतात. त्यासाठी आंदोलनं, चळवळी काही कमी झाल्या नाहीत. पण बाबरीकांडानंतर काळाचे काटे उलटे फिरू लागले, हे नाकारता येणार नाही. ते निमित्तमात्र ठरून बुरखा न घालणार्‍या स्त्रिया तो वापरू लागल्या किंवा त्यांना तो वापरणं भाग पाडण्यात आलं, हे मी स्वतः पाहिलं आहे.

मुंबईच्या लोकलने प्रवास करताना, १९९०च्या आधी कितीतरी कॉलेज विद्यार्थिनी किंवा नोकरी करणार्‍या मुस्लिम तरुणी बुरखा काढून बॅगेत टाकत आणि मोकळेपणाचा आनंद लुटत. उतरताना काहीजणी सोडल्या, तर इतर सगळ्या तो न घालताच बाहेर पडत. घरी परतताना याउलट परिस्थिती असे. उतरायच्या वेळी बुरखा चढवला जाई, नंतरच्या काळात मात्र हे बदलत गेलं. अर्थात आताही बुरखा न घालणार्‍या कैक मुस्लिम तरुणी असतात. पण प्रमाण कमी झालं आहे. खरं तर त्यांना घरचे बुरखा घालायला सांगत किंवा आज सांगतात, तेव्हाही ते सगळे धर्मवादाला पाठिंबा म्हणूनच तसं करतात हे म्हणणं चुकीचं ठरेल. आपल्या मुलींना आणि कुटुंबाला त्रास नको, अशी भावनाही त्यामागे बरेचदा असते. सगळ्यांचं मतपरिवर्तन होण्याची वाट बघत राहिलं तर या मुलींना घराबाहेर पडणंच मुश्किल होईल, त्यापेक्षा बुरखा घालणं काय वाईट, असा व्यवहारी विचारही अनेकदा होत असतो. काळ कोणासाठी थांबत नाही. मुलींनी शिक्षण घेणं जास्त महत्त्वाचं आहे, ही भूमिकाही यात आहेच.

लोकलमध्ये बुरखा काढून आत टाकणार्‍या मुलीही असाच व्यवहारी विचार करणार्‍या...

पुन्हा इराणच्या ताज्या घटनेकडे वळते. तिथे गेल्या काही वर्षांमध्ये मॉरल पोलिसिंग वाढलं आहे. बरेचदा अशा घटनांमागे शिया-सुन्नी हा पदरही दिसून येतो. महसाच्या संदर्भातही हे वास्तव असल्याचं माझी इराणी मैत्रीण सांगत होती...एखाद्या गोष्टीचा किंवा त्या गोष्टीवरील बंदीचा विचार तेवढ्याच चौकटीत होऊ शकत नाही. त्यात बरेच संदर्भ असतात. भारतात हिंदू वा इतरधर्मीय स्त्रियामुलींवर काय कमी बंधनं आहेत? पण बहुतेकजणी ती मानत नाहीत किंवा सरसकट पाळत नाहीत. त्यांचा समाज त्यांना टोकाला जाऊन छेडत नाही, हे त्यामागचं कारण आहे. म्हणूनच तर डोईचा पदर दोन खांद्यांवर आणि मग एका खांद्यावर हे वास्तवात आलं. ड्रेसवर ओढणी घेतली जातेच असं नाही. विशिष्ट पोशाखावर शोभून दिसते, म्हणून लहान वा मोठी ओढणी दोन वा एकाच खांद्यावर घेतलेली दिसते. पण उद्या साधी ओढणी घेणं हे सक्तीचं केलं किंवा ती घेण्यावर बंदी घातली, तर? याचाही विचार झाला पाहिजे, पोशाखी बंधनांवर बोलताना...

महसा हे आजचं ताजं उदाहरण. इराणमध्ये स्त्रियांना पोशाखी बंधनांवरून खूप सोसावं लागलं आहे आणि त्याविरुद्ध लढाही द्यावा लागला आहे. अफगाणिस्तानातला उलटा प्रवासही ताजाच आहे. अरब राष्ट्रांमधूनही महिलांवरील वेगवेगळ्या बंधनांवरून संघर्ष सुरूच असतो.

काही वर्षांपूर्वी मसीह अलीनिजाद या इराणी महिलेचं 'द विंड इन माय हेअर : माय फाइट फॉर फ्रीडम इन मॉडर्न ईरान' हे आत्मकथन प्रकाशित झालं होतं. त्यात स्त्रियांचा मोकळ्या श्वासासाठीच्या संघर्षाविषयी वाचायला मिळतं. स्त्री आत्मचरित्रांवरील माझ्या सदरात या पुस्तकावर लिहिलेला लेख इथे देत आहे. आजच्या इराणमधील वास्तवाचे धागेदोरे आणि मुळं यांचं मागील काळाशी असलेलं नातंही समजून येईल...

Updated : 23 Sept 2022 7:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top