Home > मॅक्स ब्लॉग्ज > पंतप्रधान महोदय आणि दिव्यांग युवा पत्रकार गौरव मालक!

पंतप्रधान महोदय आणि दिव्यांग युवा पत्रकार गौरव मालक!

पंतप्रधान महोदय आणि दिव्यांग युवा पत्रकार गौरव मालक!
X

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.6 मार्च 2022 रोजी पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी विविध विकास कार्यक्रमांचं उद्घाटन केलं. यातला महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे मेट्रो. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसमवेत मेट्रो प्रवास केला. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातून चार दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात मला संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने अमोल शिंगारे यांनी मला फोन केले मात्र काही कारणास्तव ते उचलता आले नाही. नंतर मी त्यांना दुसऱ्या दिवशी परत फोन केला यावेळी त्यांनी सांगितलं, "आपल्याला पंतप्रधान महोदयांना भेटण्याची सुवर्णसंधी होती मात्र कागदपत्र जमा करण्याची काल शेवटची तारीख असल्याने ती संधी गेली आहे." त्यावर मी म्हणालो, "हरकत नाही पण माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद!" दुसऱ्या दिवशी परत यांचा फोन आला आणि ते म्हणाले ही संधी परत तुम्हाला मिळू शकते तुम्ही आता तुमचे कागदपत्र पाठवा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझे संबंधित प्रक्रिये करिता लागणारे कागदपत्र त्यांना पाठवले.

ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तर त्यांचा परत फोन आला. तुम्हाला पुणे शासकीय जिल्हा रुग्णालयात कोरोना विषयक चाचणी साठी यावं लागेल. अर्थात मी माझ्या बाबांना घेऊन दोन तासांचा प्रवास करत शासकीय रुग्णालयात गेलो व संबंधित अहवाल सुदैवाने सकारात्मक आला.

अर्थात ही सगळी धडपड सुरू होती ती म्हणजे विशेष माझ्या दिव्यांग बांधवांसाठी... कारण मी स्वतः दृष्टी बाधित असल्याने माझ्या इतर दिव्यांग बांधवांना येणाऱ्या समस्या मी स्वतः चांगल्या प्रकारे अनुभवल्या आहेत. व त्याची मला जाणीव आहे व जबाबदार माध्यम प्रतिनिधी म्हणून मी त्या समस्यांचा आवाज वेळोवेळी बुलंद करत आलो आहे. आता ही प्रक्रिया पार पाडायचे म्हणजे अडचणी येणार हे मला ठाऊक होतं. शिवाय वास्तविकपणे व निसंकोचपणे सांगायचं म्हणजे जिल्हा रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी त्यादिवशी पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. बाबांनी कशीबशी व्यवस्था केली. आर्थिक विवंचना जरी वाटयाला आली असली तरीसुद्धा आई-वडिलांचा स्वाभिमान सदैव प्रेरित करत आला आहे. माझ्या परिस्थितीचा बाऊ करणे हा अजिबात उद्देश नाही. मात्र वास्तव हे मांडलं गेलं पाहिजे.





अखेर 6 मार्च उजाडला व सकाळी ठीक 5 वाजून 36 मिनिटांनी मी बाबांसोबत घरून निघालो. व 6 वाजून 48 मिनिटांनी विमलाबाई गरवारे शाळेमध्ये पोहोचलो. यावेळी पंतप्रधानांना भेटणारे विद्यार्थी मला भेटले. नंतर मेट्रोचे अधिकारी आले व त्यांनी आमच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याच बरोबर आम्हाला आमचे पास दिले यावेळी आमचे भ्रमणध्वनी त्या ठिकाणी जमा करून घेण्यात आले. नंतर गरवारे मेट्रो स्थानकावर नेण्यात आलं. यादरम्यान मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोमध्ये दिव्यांगांच्या दृष्टीने असलेल्या सुलभ व्यवस्थांची माहिती आम्हाला दिली. त्याच बरोबर यावेळी सुरक्षाविषयक तपासणी करण्यात आली नंतर स्थानकामध्ये प्रवेश करताच थोड्या वेळानंतर आम्हाला मेट्रोमध्ये बसवण्यात आलं. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मेट्रो पहात होतो. थोड्याच वेळाने पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले व "प्रणाम" असा आवाज कानी पडला. मग सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना प्रणाम केला. आल्यानंतर ते माझ्या शेजारी स्थानापन्न झाले व चर्चेला सुरुवात झाली.

त्यांचा पहिला प्रश्न,

तुमचे नाव काय व तुम्ही काय करता?

मी सांगितलं, "12 वी उत्तीर्ण झालो आहे व सध्या कला शाखेमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला मॉडर्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. सोबतच शिकाऊ पत्रकारिता करतो." त्यावर ते म्हणाले, "शिक्षण आणि पत्रकारिता या दोन गोष्टी व्यवस्थित पार पाडता येतात का?"

त्यावर मी म्हणालो, "आपण जसं एका राजकीय पक्षाचे नेते व देशाचे पंतप्रधान या दोन भूमिका पार पाडता, तसेच मी सुद्धा दोन्ही व्यवस्थित पार पाडतो."

यावर ते म्हणाले, "तुमची दरम्यानच्या काळातील सर्वाधिक चांगली बातमी कोणती?" मी म्हणालो, "राज्यात दिव्यांग व्यक्तींना परीक्षेदरम्यान मिळणाऱ्या लेखनिक प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी होत्या. त्यावर मी बातमी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतली."





त्यांनी विचारलं तुम्ही कोणती वृत्तवाहिनी सर्वाधिक पाहता? मी म्हणालो, "मी सर्वच वाहिन्या पाहतो व जे मला निष्पक्ष वाटतं, त्याचा मी स्वीकार करतो. व जे निष्पक्ष वाटत नाही ते मी सोडून देतो. "

मग त्यांनी तुम्हाला काय समस्या आहेत? हे विचारलं. आणि मला खऱ्या अर्थाने आनंद झाला. यावर दिव्यांगांच्या जेवढ्या समस्या मांडता येतील त्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कारण कालावधी सुद्धा अतिशय थोडा होता.

या प्रवासादरम्यान पंतप्रधान यांच्या बरोबरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोशारी, एकनाथराव शिंदे, सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. अजित दादा व फडणवीस सर यांच्याशी सुद्धा संवाद झाला. पंतप्रधानांनी माझ्यासोबतच तिथे उपस्थित असलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची सुद्धा बातचीत केली. नंतर आनंदनगर मेट्रो स्थानकावर पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी आशीर्वाद दिले व ते मेट्रोच्या बाहेर पडले.





अशा पद्धतीने ही भेट संपन्न झाली.

या भेटीचे छायाचित्र समाज माध्यमांमध्ये गेल्यानंतर अनेकांनी कौतुक केलं व अनेकांनी टीका सुद्धा...

या सर्वांचाच मी अगदी विनम्रपणे स्वीकार करतो व माझ्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना सांगू इच्छितो, मी कुठल्याही राजकीय नेत्याला भेटलो नसून देशाच्या पंतप्रधानांना भेटलो आहे. व मला प्रत्येक संवैधानिक पदाबद्दल आदर आहे आणि तो प्रत्येकालाच असायला हवा. अर्थात संबंधित पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या पदाला न्याय द्यायचा असतो व मोदी साहेब तो न्याय देतात अथवा नाही हे संपूर्ण देश पाहतो आहे. त्यामुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याने यावर भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं.

आपलाच युवा पत्रकार गौरव गजानन मालक.

Updated : 8 March 2022 6:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top