Home > मॅक्स ब्लॉग्ज > राजकीय वर्तुळ

राजकीय वर्तुळ

राजकीय वर्तुळ
X

• महागाईचा भडका आणि माध्यमांची गोची

भाज्यांच्या किंमती आकाशाला भिडल्यायत, त्यातच इंधनाचे दर ही दररोज वाढतायत. सामान्य माणसाला महागाईच्या झळा सोसवेना झाल्यायत. असं असलं तरी राजकारण मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीय.

महागाईला कोण जबाबदार असा प्रश्न विचारणाऱ्या भाजपाच्याच जुन्या जाहीराती सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल आहेत. त्यामुळे महागाई संदर्भात बातम्या द्यायला ही प्रसारमाध्यमे कचरतायत. या आधी प्रत्येक वेळेला महागाईचा भडका अशा हेडलाइन्स छापणाऱ्या माध्यमांनी आता श्रावणात मागणी वाढल्याने महागाईचा भडका अशी सोयीची भूमिका घ्यायला सुरूवात केलीय. काही वर्तमानपत्रांनी यंदा पावसामुळे भाज्यांचे नुकसान झालं असून चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे दर वाढलेयत असं एक्स्पर्ट भाष्य केलंय.

भाज्या महाग झाल्या तरी चालतील पण मिठाला जागलं पाहिजे, असं काही माध्यमांच्या बाबतीत आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

• सोशल वॉर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी एकाचवेळी जवाबदो नावाच्या हॅशटॅग खाली मोदींना १५ लाखाचं काय झालं अशी विचारणा सुरू केलीय. सर्व नेत्यांनी एकच ट्वीट, म्हणजे एकच कंटेट ट्वीट केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. वास्तविक कुठलाही ट्रेंड तयार करायचा असेल तर त्या विषयावर ठराविक वेळेत भरमसाठ ट्वीट व्हावे लागतात. त्यातही व्हेरीफाईड ट्वीटर हँडल्सवरून ट्वीट झाले तर लवकर ट्रेंड तयार होतो.

पण सहसा अशा ट्रेंड मध्ये भाग घेणारे वेगवेगळं कंटेट आणि क्रिएटीव्ह पोस्ट करतात, पण राष्ट्रवादीचं हे गणित चुकलं आणि त्यांना भाजपच्या प्रतिहल्ल्याचा सामना करावा लागला. भारतीय जनता पक्षाने एनसीपी वर एनसीपी ट्वीट स्कॅम असा ट्रेंड चालवला. भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या ट्रेंडचाही बराचसा कंटेट सारखाच होता.

सध्या भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच सोशल मिडीयावर आक्रमक दिसतेय. तसंच मनसे ने तर आपल्या आंदोलनांची संख्या एकदम वाढवून टाकलीय. प्रत्येक आंदोलन फेसबुक वर लाइव्ह करायचं असा पण कार्यकर्त्यांना आदेश आहे. काँग्रेसचे काही नेते सोशल मिडीयावर सक्रीय जरूर आहेत, मात्र त्यांचा फारसा प्रभाव जाणवत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर कमी सक्रीय आहेत, मात्र काही ठराविक नेते मात्र सोशल मिडीयाचा चांगला वापर करताना दिसतायत.

एकूणच २०१९ साठी सर्व पक्षांचं सोशल वॉर सुरू झालंय, असं असलं तरी अजूनही सोशल मिडीया कसा वापरायचा, त्यावर कसं कंटेट पोस्ट करायचं याचं गमक मात्र राजकीय कार्यकर्त्यांना सापडलेलं दिसत नाही.

• देवेंद्र फडणवीस ‘चिडीचुप्प’

राम कदम प्रकरणावरून सध्या भाजपची छी-थू सुरू आहे. राज्यातील महिलांमध्ये राम कदमांच्या विरोधात संतापाचं वातावरण आहे. असं असलं तरी संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टी मध्ये मात्र या विषयावर फारसं कोणी बोलताना दिसत नाही.

मनसेतून भारतीय जनता पक्षात आलेले राम कदम असोत किंवा जमीन घोटाळ्यात नाव आलेले प्रसाद लाड.. हे दोन्ही धनदांडगे नेते मुख्यमंत्र्यांचे आवडते नेते मानले जातात. त्यामुळे सुद्धा भारतीय जनता पक्षातील नेते या दोन्ही नेत्यांबाबत बोलायला टाळाटाळ करताना दिसतात.

बाहेरून आलेल्या नेत्यांबाबत पक्षातील जुन्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कसलंच ममत्व दिसत नाहीय, त्यामुळे बाहेरून आलेले नेते भाजपाला बदनाम करत आहेत आणि त्यांच्या मुळे पक्ष बदनाम होईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे. पक्षातील जुन्या नेत्यांच्या या भूमिकेमुळेच बहुधा मुख्यमंत्र्यांनी गप्प राहणं पसंत केलंय.

Updated : 8 Sept 2018 7:21 PM IST
Next Story
Share it
Top