PM -CARES चे व्हेंटीलेटर्स आणि भारतीय रेल्वे...
आता बातमीचे हेडलाईन पाहून तुम्हाला वाटत असेल हे काय गौडबंगाल आहे. मात्र, हे काही गौडबंगाल नाही तर मेंदू जागृत करणारं विज्ञान आहे... नक्की वाचा इलेक्ट्रॉनिक्स अभियंता मधुकर दुबे यांचं विचार करायला लावणारं विश्लेषण
X
ही फार दिवसांपूर्वीची गोष्ट नाही. झाली आहेत ५ वर्षे. मी त्यावेळी एका जर्मन मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कस्टमर सर्व्हिसेस - तांत्रिक या विभागाचा प्रमुख म्हणून काम बघत होतो. ही कंपनी अतिशय नावाजलेली आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगच्या क्षेत्रामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचात येते.
भारतातील गौरवशाली रेल्वेला आणि सिग्नलिंगसाठी लागणारे तंत्रज्ञान ह्याच कंपनीचे वापरले जाते. मुंबईमधील सर्व लोकल गाड्या अपघात न होता फक्त २-३ मिनिटाच्या अंतराने ह्याच कंपनीच्या यंत्रणेमुळे धावतात.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईमध्ये धावणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त रेल्वे गाड्या याच कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि विक्रीपश्चात सेवा देखील घेतात. तर अशा कंपनीने भारतीय रेल्वेला लागणाऱ्या डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनसाठी अतिशय महत्वाचे असे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट पुरविले आहेत. आणि ते अतिशय उत्तम काम करत आहेत.
परंतु मध्यंतरीच्या काळात कंपनीने त्यांचा सप्लायर बदलला आणि सुमारे ४-५ % पार्टस मध्ये खराबी दिसायला सुरुवात झाली. ते विशिष्ट पार्ट फेल व्हायला सुरुवात झाली. त्याचे फेल होण्याचे प्रमाण होते साधारण ४-५ %... पण एक एक पार्ट होता. ११-१२ लाखाचा आणि भारतीय रेल्वे असे साधारणपणे ६०० पार्टस वापरत होती. त्यापैकी वर्षाला २०-२५ पार्ट फेल होत होते.
ते जर तीन वर्षाच्या आत फेल झाले तर कंपनी मोफत दुरुस्ती करून देत होती आणि त्यानंतर फेल झाले तर ३-६ लाखाच्या खर्चात दुरुस्ती केली जात असे. फेल होण्याचा दर हा तांत्रिक करारापेक्षा कमीच होता. तरीही रेल्वे विभागाने आणि मी स्वतः देखील याला आक्षेप घेतला. हे प्रमाण जास्त होत आहे, हे सांगून सर्व पार्टचे रिपेरिंग मोफत करावे असा आग्रह धरला. त्यात कंपनीच्या जर्मन अधिकाऱ्यांबरोबर बोलणी करून किमान निम्मे पार्टस मोफत रिपेयर करून द्यावेत असे ठरले.
त्यासाठी आम्हाला फक्त पार्ट जर्मनीला पाठविण्याचा खर्च सहन करायचा होता. पण त्यापुढे जाऊन मी असा आग्रह धरला की, हे पार्ट नेमके कशामुळे फेल होत आहेत, याचा तपशीलवार रिपोर्ट आम्हाला ग्राहक म्हणून हवा आहे.... आणि फेल होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी कंपनी नेमके काय उपाय करत आहे? याची देखील माहिती हवी आहे.
(In technical jargon, this is called as Root Cause Analysis - RCA and generally prepared by design engineer and manufacturing experts. One way to do it is called as 8-D report generation. This takes months or years and lot of resources go into it. This 8D report also suggests remedial actions and failures are monitored till failure rate comes down within globally accepted quality norms.)
कंपनीने ते मान्य केले. त्या पार्टसाठी लागणार कच्चा माल ते सॅमसुंग कंपनीकडून घेत होते. त्या कंपनीने ह्या फेल होणाऱ्या पार्टचे जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विश्लेषण केले. त्यासाठी खर्च आला २.५ कोटी रुपये. हा खर्च जर्मन कंपनीने सोसला. एका वर्षाने रिपोर्ट आला. भारतातील कमालीची आर्द्रता आणि कमालीचे तापमान याचा परिणाम होऊन पार्ट फेल होत होता.
खरे तर करारामध्ये ह्या गोष्टी किती असतील, हे ठरलेले होते आणि भारतातील ते प्रमाण जास्त होते. कायदेशीर भाषेत कंपनी काखा वर करू शकत होती, पण तसे झाले नाही. कंपनीने जवळजवळ सर्व फेल झालेले पार्ट मोफत बदलून दिले. आर्द्रता आणि तापमान याचा अभ्यास करण्यासाठी इंजिनियर पाठविले. ते भारतात दोन महिने राहिले आणि त्यांचा खर्च २५ लाख झाला. तोही कंपनीने उचलला.
आता व्हेंटिलेटर बद्दल.....
हे व्हेंटिलेटर प्राण वाचविणारे उपकरण आहे, माणसांचे प्राण. या उपकरणाचे ऑपरेटिंग मॅन्युअल धड नाही. ते तांत्रिक दृष्ट्या नेमके कोणत्या निकषावर बनवले आहेत, हे माहित नाहीत. ते चालवून दाखविण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. कसेतरी चालू झाले तर पुरेसा ऑक्सिजन देऊ शकत नाहीत.
ऑक्सिजनचा प्रेशर पुरेसा नसतो. कुठल्याही उपकरणावर वॉरंटी नावाचा प्रकार असतो. ते उपकरण एक वर्ष अथवा जसे ठरले असेल, तेव्हढ्या काळात चालले नाही तर रिपेयर करून अथवा बदलून द्यावे लागते. यापैकी व्हेंटिलेटर बद्दल काहीही होताना दिसत नाही.
त्या ऐवजी फडणवीस आणि दरेकर समजत नसलेल्या गोष्टीबद्दल अपप्रचार करत हिंडत आहेत. अशा फेल होणाऱ्या कंपनीला कोणी जाब विचारल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. खरे तर अशा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीचे मालक जेलमध्ये जायला हवेत. पण....
पण PM -CARES ह्या जादुई शिक्क्यासह ते आलेले असल्याने आणि त्यातही काही मशीन देवभूमी गुजरात मधून आल्यामुळे डॉक्टर, राजकारणी आणि इतरांची दातखीळ बसलेली दिसते. ज्यांनी सायकलचा हवा मारण्याचा पंप बनविला नाही, त्यांना व्हेंटिलेटर बनवायला दिला तर असेच होणार. खेळण्यातील विमान न बनविणारा उद्योजक जर जगातील सर्वात प्रगत जेट फायटर विमान बनवत असेल, तर हे क्षम्यच म्हणायला हवे. आता त्यात तुमच्या नातेवाईकांचे आणि तुमचे जीव जात असतील तर तो तुमचा प्रश्न आहे.
(मधुकर दुबे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आहेत. त्यांनी ३३ वर्षे एमएनसी कंपनीत काम केले आहे आणि सध्या ते नाशिक येथील गुरु गोबिंदसिंग फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण आणि प्लेसमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.)