ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि परिवर्तनाची चळवळ
ब्राह्मणेतर चळवळीतून निर्माण झालेल्या चित्रपटांची जबाबदारी धनिक वर्गाने का घ्यायला हवी? तामिळनाडू मध्ये ज्या पद्धतीने चित्रपटांची निर्मिती झाली. त्या पद्धतीने इतरत्र का होऊ शकली नाही? यासह सामाजिक परिवर्तनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी नक्की काय करायला हवे? वाचा सुनिल तांबे यांचा विचार
X
पेरीयार रामस्वामी नायकर यांनी सिनेमा या माध्यमाची शक्ती अचूक ओळखली होती. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं गावोगावी सिनेमा हॉल बांधा आणि सिनेमांची निर्मिती करा. आत्मसन्मानाची, द्रविड अस्मितेची चळवळ सिनेमा या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोचू शकते.
पेरीयार हे सांगत होते त्यावेळी तमिळनाडूमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. द्रविड कळघम या पेरीयार यांच्या संघटनेचा भारतीय राज्यघटनेला विरोध होता. उत्तर भारतातील भटांचं हे कारस्थान आहे. अशी त्यांची टीका होती. दरवर्षी २६ जानेवारीला राज्यघटनेचं दहन करण्याचा कार्यक्रम द्रविड कळघम आयोजित करत असे. मात्र चिनी आक्रमणानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला. द्रविड मुनेत्र कळघम हा राजकीय पक्ष अण्णा दुराई यांनी काढला.
१९६७ साली ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर काँग्रेसच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये सत्ता मिळालेली नाही. दोन द्रविड पक्षच आलटून पालटून सत्तेवर असतात. तमिळनाडूच्या राजकारणात तमिळ सिनेमा मध्यवर्ती आहे. जयललिता असो की करुणानिधी दोन्ही नेत्यांच्या माध्यम कंपन्या म्हणजे साम्राज्य उभी राह्यली. तमिळ सिनेमाही बोलपटांप्रमाणे शब्दबंबाळ होता. मात्र, पुढे त्यांनी प्रतिमांची आणि दृश्यांची भाषा विकसित केली. त्यामुळेच कबाली, काला असे चित्रपट निर्माण होतात.
सिनेमा माध्यमाचा उपयोग करून परिवर्तनाचा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रकल्प तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीने हाती घेतला. एकविसावं शतक द्रुकश्राव्य भाषेचं आहे. लेख, मासिकं, पुस्तकं, ग्रंथ यापेक्षा द्रुकश्राव्य माध्यमांची बाजारपेठ कित्येक पटींनी विस्तारली आहे. परिवर्तनाचा विचार-- गांधी ते आंबेडकर, या माध्यमाद्वारे लोकांमध्ये रुजवायला हवा. ब्राह्मणेतर चळवळीतून निर्माण झालेल्या धनिक वर्गाने या माध्यमाची आर्थिक जबाबदारी उचलायला हवी.
साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यासारख्या भुलभुलैयातून चित्रपटकर्मींनी बाहेर पडायला हवं आणि बाजारपेठ काबीज करायला हवी.
सुनिल तांबे