देशातील प्रश्नांवर भारतीय खेळाडूंची भूमिका काय ?
X
मुसलमानांच्या लिंचिंग आणि दलित अत्याचारविरोधी भूमिका कोणत्या भारतीय खेळाडूने घेतलेली तुम्ही पाहिली आहे का? भारतीय खेळाडू इतर देशातील मानवीहक्कांच्या बाजूने उभे राहतात मग आपल्याचं देशातील प्रश्नांवर मूग गिळून का बसतात? वाचा पत्रकार आलोक देशपांडे यांचा विचार
काल मोजून 5 मिनिटं मॅच बघितली. तेव्हढाच रस आहे क्रिकेटमध्ये. कंटाळा आला आणि दुसरीकडे लक्ष वळवले. पण आज सकाळी बातम्यांत हा फोटो बघितला आणि डोक्याला हात लावला.
एक तर जय शहा वगैरे मंडळी ज्या BCCI मध्ये आहेत त्याच्या खेळाडूंनी मानवी हक्क वगैरे साठी पाय दुमडून बसणे खूपच क्युट वाटले आणि दुसरे म्हणजे या तमाम खेळाडूंना स्वतःच्या देशात गेली 6/8 महिने रस्त्यावर आंदोलन करणारे शेतकरी का दिसत नसावेत असा प्रश्न पडला.
Black Lives Matter ही राजकीय चळवळ आहे. अमेरिकेतील. दुसऱ्या देशातील एखाद्या मानवी हक्क चळवळीबद्दल आत्मियता असणं चांगलंच. पण त्याचवेळी स्वतःच्या देशातील चळवळीबद्दल मूग गिळून बसणे म्हणजे केवळ करंटेपणा नाही तर उच्च दर्जाच्या कणाहीन मानसिकतेचे प्रदर्शन. BLM बद्दल आज पाठींबा देणे म्हणजे तिथल्या बदललेल्या राजकीय व्यवस्थेच्या बाजूने बोलणे. ट्रम्प असता तर एवढी हिंमत झाली नसती. म्हणजे इथे देखील कमालीचा संधीसाधूपणा.
अमेरिकेतील कोलीन कापरनिक हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू कृष्णवर्णीयांविरोधातील पोलीस अत्याचाराविरोधात राष्ट्रगीत चालू असताना निषेध म्हणून गुडघा दुमडून उभा राहिला. पैसा, राजकीय ताकद याच्या विरोधात जाऊन प्रामाणिकपणे मानवी हक्कांची बाजू घेऊन उभा ठाकला. तिथून अनेकांना धीर आला आणि एक चळवळ उभी राहिली. आज किती भारतीय क्रिकेट खेळाडू मुसलमानांच्या लिंचिंग विरोधात ही कृती करतील? दलित अत्याचार विरोधी भूमिका कधी कोणी घेतली आहे का?
क्रीडा आणि राजकीय आंदोलन याचा संबंध खूप जुना आहे. ताठ कण्याच्या खेळाडूंनी राजकारण हादरवून सोडले आहे आणि त्यासाठी त्रास सहन केला आहे. BLM ची नौटंकी संपली की आपली मिशी कशी जातीचा अभिमान सांगणारी आहे याचं ट्विट करायला आणि प्रधानमंत्री साहेबांसोबत हेल्थ चॅलेंज घ्यायला आपली मंडळी मोकळी होतील.
आलोक देशपांडे
(लेखक - द हिंदू वृत्तपत्राचे मुख्य बातमीदार आहेत.)
(फेसबुक साभार)