Home > मॅक्स ब्लॉग्ज > एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी - पुरुषोत्तम खेडेकर

एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी - पुरुषोत्तम खेडेकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव महाराष्ट्रातच कमीत कमी तीन वेळा साजरा करुन शिवप्रेमी जनतेत गट निर्माण केले गेले. तसेच धार्मिक व जातीय वातावरण गरम करण्यात आले होते, एकमताने १९ फेब्रुवारी शिवजयंती निश्चित झाल्यानंतर आता घरोघरी वर्तमानातील शिवाजी तयार होवोत हीच अपेक्षा इतिहासकार पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी - पुरुषोत्तम खेडेकर
X

सुमारे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळात शिवजयंती निश्चित तिथी वा तारीख बाबतीत एकमत झाले नाही. आज शिवजयंती २०२२ सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे, तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव महाराष्ट्रातच कमीत कमी तीन वेळा साजरा करुन शिवप्रेमी जनतेत गट निर्माण केले गेले. तसेच धार्मिक व जातीय वातावरण गरम करण्यात आले होते, आता घरोघरी वर्तमानातील शिवाजी तयार होवोत हीच अपेक्षा इतिहासकार पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच एक अति उत्साहजनक तसेच भावनिक वातावरण निर्माण झाले आहे असे लक्षात येते. अर्थातच ही एक अभिमानास्पद बाब आहे. " एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी " व " शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात " हे नारे जगभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची लाट निर्माण करण्यासाठी यशस्वी होत आहेत. महत्वाचे म्हणजे एकेकाळी भारतीय हिंदू धर्मातील तिथी की जगभरातील सामाईक काल गणनेसाठी वापरात असलेल्या इंग्रजी कॅलेंडर नुसार तारीख ?? हा शिवजयंती वाद निर्माण करण्यात आला होता. याच कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव फक्त महाराष्ट्रातच कमीत कमी तीन वेळा साजरा केला जात असे. एवढेच नाही तर यातून शिवप्रेमी जनतेत गट निर्माण केले गेले. तसेच धार्मिक व जातीय वातावरण गरम करण्यात आले होते. शिवजयंतीच्या दिवशी राज्यभर तणाव असायचा. महाराष्ट्र राज्याबाहेर अपवादानेच शिव जयंती साजरी केली जात होती. आता एकोणीस फेब्रुवारी रोजी देशभरात व देशाबाहेर सर्वच ठिकाणी शिवजयंती साजरी केली जात आहे. परिणामी सामाजिक एकता व बंधुभाव निर्माण झाला आहे. सर्वांनाच शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

यापूर्वी वर्षोनुवर्षे किल्ले शिवनेरी वर तसेच महाराष्ट्रातील गावोगावी वैशाख शुद्ध द्वितीया व फाल्गुन वद्य तृतीया ह्या हिंदू तिथीनुसार, तर काही ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साध्या पध्दतीनेच साजरी केली जात होती. सुमारे शंभर वर्षांपेक्षा जास्त काळात शिवजयंती निश्चित तिथी वा तारीख बाबतीत एकमत झाले नाही. आज शिवजयंती २०२२ सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. याबद्दल खूप खूप आनंद होत आहे.

सर्वचशिवप्रेमी जनतेचे आभार. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही अमृतमय घटना आहे. अभिनंदन व शुभेच्छा.मित्रांनो, हा एक आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्याला शिवजयंती तारखेच्या बाबतीत काही माहिती व इतिहास माहित असणेही गरजेचे आहे असे मला वाटते. ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे असे लक्षात येते की सन १८६९ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव किल्ले रायगड व नंतर पुणे शहरात सर्वप्रथम सुरू केला होता. पुढच्या काळात बाळ गंगाधर टिळक यांनी सन १८९५ मध्ये वेगळा शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोक वैशाख शुद्ध द्वितीया ह्या तिथी नुसार शिवजयंती साजरी करत असावेत. टिळक यांच्या छावणीत परशुराम व बाजीराव पेशवे यांचे चित्र ठेवून शिवजयंती साजरी केली जात होती. इतरांनी हरकत घेतली असता त्यांनी छत्रपती महाराज यांच्या एका मुस्लीम सहकाऱ्याचे एक महाराजांचे चित्र म्हणून ठेवले होते असे म्हणतात. याच काळात पुणे येथे ब्राह्मणेतर विरूद्ध ब्राह्मण वाद, छत्रपती मेळे विरुद्ध टिळक मेळे वाद विकोपाला गेले होते. पुढे बाळ गंगाधर टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या जन्मतिथी बाबतीत संभ्रम व गैरसमज निर्माण केले.

वैशाख शुद्ध द्वितीया १५४९ ( सहा एप्रिल १६२७ ) की फाल्गुन वद्य तृतीया १५५१ ( एकोणीस फेब्रुवारी १६३०) हा वाद निर्माण झाला होता. हे दोन्ही गट वैशाखी व फाल्गुनी गट नावाने ओळखले जात होते. यावरून शिवप्रेमी जनतेने समजून घेणे गरजेचे आहे की, शिवजयंती वाद हिंदू मराठी पंचांग महिना व तिथीचा आणि इंग्रजी तारीख एवढाच नव्हता. तर हिंदू तिथी व महिनाही एक नव्हते. तिथीला विरोध नव्हता. यात सुमारे दोन वर्षांचा फरक होता. या व अन्य कारणाने शिवजयंती साजरी करणे सुमारे १८९९ पासूनच कमी होत गेले. १९२० नंतर किल्ले शिवनेरी वर रामचंद्र बुट्टे पाटील जून्नर व अन्य मंडळे फाल्गुन वद्य तृतीया नुसार शिवजयंती साजरी करत असत. तीन मे १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बदलापूर कोकण येथे भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी केली होती. अशा प्रकारे वेगवेगळ्या तिथी व तारखांना शिवजयंती साजरी केली जाऊ लागली. पण शालेय वा महाविद्यालयीन शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख बाबतीत मौन पाळले गेले होते. या कारणाने शिव जन्म तारीख निश्चित करण्यासाठी इतिहासकार व शासन कामी लागले.

महाराष्ट्र शासनाने डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. समितीचे फाल्गुन वद्य तृतीया बद्दल एकमत झाले होते. परंतू परंपरावादी समाजाच्या दबावामुळे त्यांनी वैशाख शुद्ध द्वितीया हीच तिथी चालू ठेवण्याची शिफारस केली होती. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही याच तिथीला किल्ले शिवनेरी वर शिवजयंतीच्या निमित्ताने १९९५ पासून वंदन करण्यासाठी जमत होतो. शिव जन्म तारीख निश्चित व्हावी हीच शिवप्रेमी जनतेची अपेक्षा होती. मराठा सेवा संघाचे इतिहासकार कामाला लागले. जगप्रसिद्ध इतिहासकार वा. सि. बेंद्रे यांनी सविस्तर संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म किल्ले शिवनेरी वर दिनांक एकोणीस फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. असे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यासाठी अनेक वर्षे परदेशातील मूळ कागदपत्रे तपासले होते. एवढेच नाही तर शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र लिहून मराठेशाहीचा इतिहास बारकाईने मांडला आहे. सन १९३३ मध्ये इटलीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्सल चित्र मिळवले व प्रकाशित केले होते. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे चित्र पाहतो ते महान इतिहासकार वा. सि. बेंद्रे यांनीच मिळवलेले आहे. अशा सर्वश्रेष्ठ इतिहासकारांच्या संशोधनाचा आधार घेत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी १९९७ रोजी सर्वप्रथम आम्ही किल्ले शिवनेरी वर मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली होती. पुढे तीच प्रथा चालू ठेवली. त्यावेळी आम्ही किल्ले शिवनेरी वरील नगारखाना मधील एका खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसविला होता. कारण शिवजन्म झालेल्या मूळ वाड्याचा तेवढाच भाग आज शिल्लक आहे. तर स्थानिक पोलीस सलग चार वर्षे आम्ही बसवत असलेला पुतळा जप्त करत होते. याशिवाय राज्यभरात दरवर्षी मराठा सेवा संघ १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करत आहे. याला काही विरोध झाला होता. पण आम्ही थांबलो नाही. आज आम्हाला आनंद आहे की जगभरातील शिवप्रेमी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करत आहेत.

पुढे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी १६३० हीच निश्चित करण्यासाठी मागणी केली. तेवीस एप्रिल १९९९ रोजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधानसभेत एका ठरावाद्वारे हीच मागणी केली होती. सुमारे डझनभर आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानुसारच मुख्यमंत्री प्राचार्य मनोहर जोशी यांनी सांस्कृतीक कार्य मंत्री प्रा प्रमोद नवलकर यांच्या सोबत सल्लामसलत करून मागणी मान्य असल्याचे जाहीर केले. परंतू नंतर आलेल्या मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुत्वाचे कारण सांगून तसे आदेश निर्गमित करण्यास नकार दिला होता. १९९९ मध्ये स्मृतीशेष विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर प्रा रामकृष्ण मोरे सांस्कृतिक कार्य मंत्री झाले जानेवारी २००० मधील नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मी, आमदार रेखाताई खेडेकर व मंत्री रोहिदास पाटील यांनी प्रा रामकृष्ण मोरे यांची भेट घेऊन शिवजयंती तारीख एकोणीस फेब्रुवारी जाहीर करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी केली. परंतू प्रा रामकृष्ण मोरे जरा द्विधा मनःस्थितीत व अस्वस्थ होते शिवसेना आंदोलन करून दंगली घडवून आणतील अशी त्यांना भिती वाटत होती. शेवटी आम्ही सर्वजण मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कडे गेलो. पुन्हा भरपूर चर्चा झाली. रोहिदास पाटील अक्षरशः ओरडले आणि विलासराव देशमुख यांनी आदेश निर्गमित करण्याची मान्यता दिली. आम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रा रामकृष्ण मोरे यांना यावर्षी शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी वर शासनाने साजरी करावी अशी मागणी केली. सर्वांनीच ती मान्य केली.

नागपूर येथील चर्चा बाबतीत मंत्रालय, मुंबई येथे कळविण्यात आले . आणि पंधरा फेब्रुवारी २००० रोजी मंत्रालयीन आदेश निर्गमित केले गेले . त्यावेळी मी ठाणे येथे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होतो. सतरा फेब्रुवारी २००० रोजी रात्री आम्ही बारा सहकारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा, लोखंडी गेट, सजावटीसाठी सामान घेऊन रात्री किल्ले शिवनेरी वर पोहोचलो. तेथील नगारखाना मधील खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापित केला. सजावट केली. रांगोळी काढली. एक पाळणा बांधला. अॅड. राजेंद्र बुट्टे पाटील व त्यांच्या कुटुंबातील महिलांना दुसऱ्या दिवशी शिवनेरी वर नेले. पाळणा गाऊन घेतला. दिवसभर इतर तयारी केली. पुरातत्त्व विभागाने आमच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक शेख पाहण्यासाठी आले. आमच्या सोबत पोलीस अधिकारी भाल साहेब होते. पोलीसांना सर्व माहिती दिली व समजावून सांगितले. शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी उचलली. एकोणीस फेब्रुवारी २००० रोजी सकाळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सहकारी मंत्री हेलीकॉप्टरने आले. मी व आमदार बाळासाहेब दांगट सामोरे गेलो. आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख व इतर मंत्री यांना घेऊन सरळ नगारखाना गाठला. महिलांनी स्वागत केले. मुख्यमंत्री व सहकारी मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमास अभिवादन केले. पुजन केले जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पाळणा गायला. ओळखी झाल्या.

तेथून मुख्यमंत्री जिजाऊ व बालशिवाजी समुह शिल्प दर्शनासाठी आले. आणि नंतर मराठा सेवा संघाच्या मंचावर स्थानापन्न झाले. स्वागत व परिचय झाला. शाहीर रामदास कुरंगळ सिंदखेड राजा यांनी खड्या आवाजात पोवाडा सादर केला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदम खुश झाले . शाहीराचे अभिनंदन करुन नगद बक्षिस दिले. पुढे सुमारे दोन तास छान कार्यक्रम झाला नि मुख्यमंत्री आम अभिनंदन करुन व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुंबई कडे परतले.

एकोणीस फेब्रुवारी २००० हीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी वर साजरी झालेली पहिली शिवजयंती होय ही प्रथा सर्वप्रथम सन १९९५ पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू झाली होती. यापूर्वी दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व इतर काही पाहूणे हेलीकॉप्टरने सरळ किल्ले शिवनेरी येथे उतरत. जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे व इतर काही अधिकारी स्वागत करत होते. पुढे मुख्यमंत्री जिजाऊ व शिवाजीराजे समुह शिल्पाचे पूजन करून माल्यार्पण करत होते. आणि अगदी अर्धा तासांतच तेथून जून्नर शहरातील जाहीर सभात सहभागी होत असत मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वप्रथम किल्ले शिवनेरी वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची पद्धत सुरू केली आहे. तीच आज चालू आहे. मराठा सेवा संघाच्या अंतर्गत वादामुळे अलीकडे तेथील सहभाग कमी झाला आहे. ह्या मानपानाच्या बाबी अपरिहार्य असतात. महत्वाचे म्हणजे मराठा सेवा संघाच्या योजनेनुसार शिवजयंती शिव जन्मस्थान किल्ले शिवनेरी येथे भव्य प्रमाणात शासकीय इतमामात साजरी केली जात आहे. हाच खरा मोठा आनंद आहे.

पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व आपणास खूप खूप शुभेच्छा. घरोघरी वर्तमानातील शिवाजी तयार होवोत हीच अपेक्षा आहे.

Updated : 17 Feb 2022 1:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top