Home > मॅक्स ब्लॉग्ज > दुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग !

दुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग !

एक जग एक राष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात येणे शक्य आहे का, जगभरातील विविध विचारसरणी त्यासाठी पूरक आहेत का, याचे विश्लेषण करणारा संजय सोनवणी यांचा लेख नक्की वाचा...

दुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग !
X

व्यवस्था बदलत राहतात. कोणतीही व्यवस्था अमरतेचा पट्टा घेऊन जन्माला आलेली नाही हे आपण पाहिले. सुजाण व विचारी नागरीक आपल्या भविष्यातील पिढ्या अधिकाधिक चांगल्या वातावरणात वाढाव्यात यासाठी नवनव्या व्यवस्थांची मांडणी करीत असतात. त्या अंमलात याव्यात यासाठीही प्रयत्न करत असतात. पण कोणती व्यवस्था श्रेष्ठ याबाबतचे अहंकार आणि त्या अहंकारांतील संघर्ष याने जग बरबटलेले आहे व त्यामुळे भविष्याकडे जाण्याचा आपला वेग मंदावलेला आहे आणि जगात एका परीने गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली आहे, हे आपण पाहू शकतो. एका अर्थाने आजचे मानवी जग हे अनेक दुर्घर दुखण्यांनी जखडले आहे आणि त्यातून ते उमद्या भविष्याची कामना करत आहे असे आपण पाहू शकतो.

"एक जग:एक राष्ट्र" या संकल्पनेचा पुर्णत्वापर्यंतचा प्रवास तेवढा सोपा नाही. या संकल्पनेच्या प्रत्यक्षात येण्यामुळे अखिल मानवजातीचे ख-या अर्थाने वैश्विक नागरिक होण्याचे स्वप्न साकार होईल याबाबत फारशी कोणाला शंका नाही. याला "दिवास्वप्न" समजणारे लोकही कमी नाहीत. आमचेच राष्ट्र जगातील अन्य राष्ट्रांवर सत्ता गाजवत राहील अशी स्वप्ने पाहणारी राष्ट्रे आता अनेक झाली आहेत. अमेरिका तर कधीपासुनच स्वत:ला महासत्ता समजते. पुर्वी ग्रेट ब्रिटन हे महासत्ता होते. जर्मनीने हिटलरच्या नेतृत्वाखालीच महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला होता. साम्यवादी रशियानेही अर्ध्या जगावर प्रभुसत्ता गाजवली. आज चीनही त्या दिशेने वाटचाल करीत आहे पण चीनची अर्थव्यवस्थाच ब-याच अंशी अमेरिकेवर अवलंबून आहे. जर्मनीनेही आतापासून नव्याने महासत्ता बनण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून शिक्षणपद्धतीतही त्या दृष्टीने बदल करायला सुरुवात केली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही भारतीयांत महासत्तेचे स्वप्न पेरले. पण महासत्ता म्हणजे नेमके काय याची व्याख्या मात्र अन्य राष्ट्रांवर आर्थिक व राजकीय प्रभुत्व गाजवणे (म्हणजेच अन्य राष्ट्रांन मांडलिक बनवणे" एवढ्यापुरती मर्यादित झालेली आहे. खरे म्हणजे महासत्ता होण्याच्या काही राष्ट्रांच्या स्पर्धेमुळे राष्ट्रवादाने एक विकृत स्वरूप धारण केले आहे.

आज उजव्या विचारसरणीच्या लोकांची चलती आहे. विचारसरणी कोणतीही सर्वस्वी वाईट अथवा टाकावू असते असे नाही. किंबहुना विविध विचारसरण्यांचे सह-आस्तित्व व त्यातील वाद-विवादांमुळे पुढे जाणारे विचार आपल्याला अभिप्रेत असतात. प्रत्यक्षात आपल्याला असे दिसते की "विचारहीनांचा विचार" असे उजव्यांच्या विचारसरणीचे जागतीक रुप बनले आहे आणि त्याला भारतीय उजवा विचारही अपवाद नाही. किंबहुना ही राष्ट्रवादाचीही शोकांतिका आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

डाव्यांचे म्हणावे तर तेही पोथीनिष्ठतेत अडकलेले असल्याने व मानवी स्वातंत्र्याची त्यांच्याही लेखी उजव्यांप्रमाणेच काही किंमत नसल्यामुळे त्यांचाही विचार मानवकल्याणाला उपयुक्त आहे असे दिसलेले नाही. जेवढी हिंसा जगात कम्युनिस्टांमुळे झालेली आहे व ज्या पद्धतीची समता ते आणू पाहतात ते पाहता त्यांना मानवी मुल्यांना चिरडणारी निरंकुश सत्ता असणारे जागतीक सत्ताकेंद्र व्हायचे आहे हे इतिहासाने सिद्ध केले आहे. लोकशाहीची मुल्ये साम्यवाद्यांना मुलत:च मान्य नाहीत. भारतात १/३ भुमीवर कब्जा बसवलेले माओवादी हे याच वादाचे खुनशी अपत्य आहे. यात मानवी जीवनाचे हित होणे तर दूर उलट मातेरे होणे स्वाभाविक आहे. समता हा अत्यंत फसवा शब्द असून त्याचे भारतातही घटनात्मक तत्व असुनही काय झाले आहे हे भारतीयांना चांगलेच माहित आहे. शिवाय, उजवे काय आणि डावे काय, त्यांच्यातही एवढे उप-विचारप्रवाह आहेत की कोणाला नेमके काय सांगायचे आहे आणि प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर ते कसे वागणार आहेत याबाबत कोणी निश्चयाने सांगू शकणार नाही. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना दुषित तर झालीच आहे पण सा-या जगाचे एक राष्ट्र बनवण्याच्या महनीय संकल्पनेतील ते अडसरही आहेत.

मुस्लिम ब्रदरहुड ही एक जागतीक राष्ट्र बनवण्याच्या संकल्पनेने पछाडलेली संस्था आहे. जगातील सर्वाधिक क्रुरकर्मा म्हणून कुख्यात झालेल्या इसिसचा जन्म त्यातुनच झाला. इसिसने नवखिलाफत स्थापन केली असून हळू हळू जगच काबीज करत नेत इस्लामी सत्ता स्थापन करण्याचे इसिसचे स्वप्न आहे. त्यांनी बनवलेल्या योजनेनुसार पुढील काही वर्षात भारतासह युरोप, अमेरिका ते आफ्रिकेतील अनेक राष्ट्रे दहशतवादाच्या आधाराने आपल्या स्वामित्वाखाली आणत "इस्लामी जग" बनवण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणजे त्यांनाही एक जग एक राष्ट्रच हवे आहे पण ते इस्लामी सत्तेखालील! त्यांच्या स्वामित्वाखालील जग विशूद्ध इस्लामी तत्वांनुसार चालेल. त्यासाठी इसिसने रक्तरंजित संघर्ष मांडला असून युरोपात त्याची धग आधीच पोहोचली आहे. भारतातील काही मुस्लिमांनाही या संकल्पनेचे आकर्षण असून काही प्रत्यक्ष तर अनेक त्याचे छुपे समर्थक आहेत. मानवी हिताचे, मानवाला उपकारक असे "उदात्त एक जग:एक राष्ट्र" इसिसच्या संकल्पनेत नाही हे उघड आहे. धर्मांध, एका धर्माच्या वर्चस्वाखालील चिरडलेल्या अन्य धर्मियांचे मिळून त्यांना "एक जग:एक राष्ट्र" बनवायचे आहे. आणि सारी सत्ता या नवखिलाफतीमार्फत राबवली जाणार आहे. त्यात लोकशाहीला काही स्थान नाही हे उघड आहे. साम्यवाद आणि इस्लामवादात धर्म हा मुद्दा सोडला तर तसा विशेष फरक नाही हेही आपल्याला माहित आहे.

अन्य धर्मियांनाही आपल्याच धर्माचे वर्चस्व असलेले जग नको आहे अशातला भाग नाही. काहींचे छुपे तर काहींचे उघड प्रयत्न त्या दिशेने चालुच असतात. मध्यपुर्वेतील संघर्षाकडे आपण क्रुसेड काळातील ख्रिस्ती, ज्यु व इस्लाम यांच्यातील संघर्षाचे प्रतीरुप म्हणूनच पाहु शकतो. ख्रिस्ती व ज्यू राष्ट्रे विरुद्ध इस्लामी राष्ट्रे अशी सध्याची व्यूहनीति आहे. भविष्यात ती वेगळे परिमाण धारण करू शकेल. पण धार्मिक, वांशिक व प्रादेशिक अस्मिता, ज्या केवळ काल्पनिक पुरातनाच्या व श्रेष्ठत्ववादाच्या वर्चस्वतावादी गंडातून येतात त्यांचेही काय करायचे हा अखिल मानवजातीसमोरील एक गहन प्रश्न आहे. त्यावरही आपल्याला चिंतन करावे लागणार आहे.

थोडक्यात अर्थविचारवाद (भांडवलशाही की साम्यवाद?) आणि धर्मवाद (कोणत्या धर्माच्या स्वामित्वाखालील जग?) आणि तदनुषंगिक मानवाच्याच भ्रमांतून निर्माण झालेल्या श्रेष्ठतावादाच्या गंडांत संघर्ष होत राहिल्याने ख-या अर्थाने "एक जग : एक राष्ट्र" कसे बनेल याची सुजाणांना चिंता लागणे स्वाभाविक आहे. सध्या जरी भांडवलशाही विचाराने जग पादाक्रांत केले असले तरी त्यालाही हे जागतीक संदर्भ असल्याने अनेक राष्ट्रांत भांडवलशाहीची जागा "कुडमुड्या" बनावट भांडवलवादाने घेतली आहे. भारत हे या अशाच भांडवलवादाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भारतातील समाजवादही आता विकृत पातळीवर जावून पोहोचला आहे. त्यामुळे भारतातीलच नागरीक आपल्या एकुणातील अर्थव्यवस्थेच्या रसातळाला जाण्याने पिचत आहेत. समाजवादात "समाज" कोठेच राहिलेला नाही पण याची सामाजिक चिंताही आपल्याला नाही. मग नवे सुसंगत तत्वज्ञान शोधण्याची प्रेरणा कोठून येणार? म्हणजेच अर्थतत्वज्ञानास समृद्ध करत त्यानुषंगाने त्याला मानवी चेहरा देण्यास भारतीय विचारवंत व अर्थतज्ञांना अपयश तर आलेच आहे पण सत्तेत असनारे राजकीय पक्ष हे केवळ सत्ताकारणानेच तेवढे भारावून गेल्याने नार्सिससप्रमाने आपल्याच कोषात गुंगत नागरीहिताचे मात्र शत्रू बनले आहेत असेही चित्र आपल्याला दिसते. आणि हे चित्र जगात अनेक राष्ट्रांत आपल्याला पहायला मिळते. किंबहुना "राजकारण" या संकल्पनेची नवी व्याख्या होण्याची आवश्यकता असुनही विचारवंत ती करण्याचा प्रयत्न करीत नाहीत असेही चित्र आपल्याला दिसते.

आजचे जग जेथे आहे तेथून समृद्धीकडे व समग्र मानवहिताकडे जाण्यात जे अडथळे आहेत ते मी येथे थोडक्यात विशद केले आहेत. आजचे जग हे दुखण्यांनी त्रस्त आहे. यावर इलाज म्हणून जर आपल्याला नवतत्वज्ञानाची संजीवनी हवी असेल तर ती कोणकोणत्या प्रकाराने पुढे येवू शकते, आम्ही भारतीय त्यात कोणत्या प्रकारे हातभार लावू शकतो व जागतीक मानव बनण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घेवू शकतो याचा विचारही आपण करणार आहोत!

Updated : 18 Dec 2020 10:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top