एक-पक्षीय हुकूमशाही ?
दोन दिवसांपुर्वी एका भाषणामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देशात यापुढे प्रादेशिक पक्षच नसतील केवळ भाजपच असेल असं विदान केलं. त्यांच्या या विधानावर विविध स्तरातून अनेक टीका झाल्या. पण एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाची ही भुमिका कोणत्या भविष्याकडे इशारा करतेय याचं सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी वाचा सुनिल सांगळे यांचा हा लेख...
X
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल एक असे विधान केले की देशातील सर्व प्रादेशिक पक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि राष्ट्रीय पातळीवर तर कोणताच पक्ष शिल्लक नसल्याने यापुढे फक्त भाजप हाच एक पक्ष देशात शिल्लक राहील. अर्थात अशी परिस्थिती निर्माण झालीच तर तिला लोकशाही म्हणताच येणार नाही. ती चीन व रशियासारखी एक-पक्षीय हुकूमशाही होईल
या गोष्टीवरून एक इतिहासातील एक गोष्ट आठवली. जागतिक इतिहासात सर्वात आधुनिक आणि विध्वंसक लष्करी हुकूमशहा हा जर्मनीचा एडॉल्फ हिटलर आहे. पण हिटलर हा काही सुरवातीपासूनच लष्करी हुकूमशहा नव्हता. तो आधी एका अल्पमतात असलेल्या पक्षाचा प्रमुख होता आणि इतर पक्षांच्या मदतीने सत्तेत आला. त्यानंतर त्याने हळूहळू सत्ता काबीज केली या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा होता देशात एक पक्षीय हुकूमशाही आणण्याचा! त्या साठी १४ जुलै १९३३ रोजी नाझी पक्षाने एक नवीन कायदा अंमलात आणला. या कायद्यानुसार नाझी पक्ष (National Socialist German Workers Party) सोडून इतर सगळे पक्ष बरखास्त केले गेले आणि त्याशिवाय नवीन कोणताही नवीन पक्ष स्थापन करण्यास बंदी करण्यात आली.
एकदा हे केल्यावर हिटलरला कोणीही विरोधक शिल्लक राहिले नाहीत. त्यानंतरच्या काळात हिटलरने अल्पसंख्यांक ज्यू समाजाविरुद्ध रान उठवून त्यांचे शिरकाण केले, कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदांच्या हत्या केल्या, स्वतःच्या पक्षातील विरोधकांच्या हत्या केल्या, स्वतःला देशाचा अध्यक्ष घोषित केले (तो चान्सलर आधीच होता), स्वतःला तिन्ही सेनादलांचा प्रमुख घोषित केले, नभोवाणी वरून एकतर्फी प्रचार सुरु केला, आणि नंतर शेजारील देशांवर आक्रमणे करून संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले.
अनेक समाजशास्त्रज्ञांना नंतरच्या काळात एक प्रश्न वारंवार पडायचा. तो म्हणजे जर्मन लोकांसारखे अत्यंत बुद्धिमान लोक (ज्यांच्यातून अक्षरशः शेकडो जागतिक कीर्तीचे शास्रज्ञ, कलावंत, लेखक इत्यादी निर्माण झाले होते) हिटलरच्या या सगळ्या नरसंहारात आणि जग जिंकण्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेत सहभागी कसे झाले? त्याची दोन उत्तरे त्यांना दिसली.
एक म्हणजे आपला जर्मन आर्य वंश हा जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे व त्यामुळे आपण जगावर राज्य करू शकतो ही भावना लोकांच्या मनात रुजविण्यात हिटलर अत्यंत यशस्वी झाला होता. इथे हे सांगणे आवश्यक आहे की हिटलरची आर्य वंशाची कल्पना ही आपली भारतीयांची जी आहे ती नव्हती. त्याच्या दृष्टीने आपण सगळेच आशियायी लोक हे मानवाच्याही खालच्या पातळीचे (sub-human) व म्हणून गुलामगिरीच्याच लायक होतो.
दुसरे म्हणजे हिटलरने जर्मन लोकांना हे पटवून दिले की ज्यू समाज हा जर्मनीच्या अनेक समस्यांचे मूळ आहे आणि ज्यू लोकांना नष्ट केल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. त्यामुळे ज्यू समाजाच्या पराकोटीच्या द्वेषाने आंधळे झालेले जर्मन लोक हिटलरच्या सगळ्या उद्योगात सामील होत गेले. इतके की अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ देखील ज्यू हत्याकांडाची आधुनिक तंत्रे शोधू लागली, ज्यातून गॅस चेम्बरसारखी कल्पना पुढे आली.
थोडक्यात सांगायचे तर आपलाच धर्म, जात, वा वंश हा सर्वश्रेष्ठ आहे हे एकदा लोकांच्या डोक्यात घुसवले आणि जोडीलाच परधर्मीयांच्या आत्यंतिक द्वेषाचे विष भिनवले, तर मग उच्चशिक्षित व विद्वान लोकही अतिरेकी बनू शकतात हा हिटलरच्या जर्मनीने दाखवून दिले आहे. या सगळ्या गोष्टींना लोकशाही पद्धतीने विरोध करायचा झाला तर त्यासाठी अर्थात विरोधक ही जमात निदान शिल्लक तर हवी. म्हणून नड्डा जी भविष्यवाणी करत आहेत ती खोटी ठरेल अशी आशा करूया.
लेखक
सुनिल सांगळे