मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि हरी नरकेंचे विस्मरण
X
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे जाहीर झाल्यापासून गेल्या दोन तीन दिवसात वेगवेगळ्या व्यक्तींनी (राजकारणी आणि साहित्यिकांनी) त्याचे श्रेय आपल्याकडे घेतल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचा सेवानिवृत्त विभाग प्रमुख या नात्याने मी येथील सृष्टी सांस्कृतिक व विकास संस्थे साठी गेल्या दोन वर्षात हाती घेतलेल्या एका उपक्रमाच्या माध्यमातून मला आतापर्यंत मिळालेली माहिती आणि या बातम्या मधून आढळणारे दावे यात खूप तफावत दिसून येते.
माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा अभिजात दर्जा समितीचा अहवाल (मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेला) याचा मी अभ्यास केला आहे. दिवंगत प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांनी या कामासाठी स्वतःला किती वाहून घेतले होते हे मी पाहिले आहे.
समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रंगनाथ पठारे यांना गेल्या जानेवारी -एप्रिल या काळात दूरध्वनीवरून संपर्क साधून मला आवश्यक वाटलेली माहिती त्यांच्याकडून घेतली आहे.
या धडपडीतून सृष्टी संस्थेच्या वतीने “मराठी अभिजात भाषेचा दर्जा वास्तव की मृगजळ” या शीर्षकाची एक पुस्तिका प्रसिद्ध झाली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (frequently asked questions) आणि त्याची उत्तरे अशा स्वरूपाची ही पुस्तिका आहे. मराठी भाषेचे अभ्यासक, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक अशा सर्वांना या पुस्तिकेचा संदर्भ म्हणून भविष्यात देखील उपयोग होईल अशा विश्वास वाटतो.
अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली बारा पंधरा वर्षे प्रयत्न चालू होते. त्या प्रयत्नांची कदाचित आता आवश्यकता भासणार नाही. आताच्या या अखेरच्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना अभिजात भाषा हा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होऊ शकेल. त्यात खरे खोटे भविष्यासाठी नोंदवणे मला आवश्यक वाटते. येत्या काही दिवसात ती वस्तुस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात टेलिव्हिजन चॅनेल आणि सोशल मीडिया यावर आपण या मुद्द्यांचा परामर्श घ्यालच असे मी गृहीत धरतो. तुमच्या कार्यक्रमात अशा प्रश्नाचा आपण समावेश करावा अशी विनंती करण्यासाठी आपल्याला ही पुस्तिका पाठवीत आहे .
पीडीएफ स्वरूपात असलेली ही पुस्तिका विनामूल्य उपलब्ध आहे. त्यासाठी संपर्काचा पत्ता [email protected] [email protected]
वाचनात आलेले काही दावे आपल्या निदर्शनाला आणतो आहे:
१. अभिजात भाषेचा दर्जा हा विषय आपण हाती घेतला, लावून धरला, पाठपुरावा केला असे दावे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी केले आहेत.
२. गेल्या दशकातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांनी तसेच दावे केले आहेत असे वाचायला मिळते.
३. समितीच्या अहवालातील नोंदी नुसार श्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी समितीची स्थापना केली आणि दिल्ली आणि मुंबई येथे पाठपुरावा केला.
४. प्राध्यापक डॉक्टर हरी नरके यांनी महाराष्ट्रात मुंबई दिल्ली पुणे कोल्हापूर औरंगाबाद नागपूर अशा सर्व महत्त्वाच्या केंद्रात चर्चा घडवून आणल्या. मराठी अभिजात भाषा नाहीच असे म्हणत विरोध करणाऱ्या साहित्यिकांना चर्चेतून मराठी अभिजात असल्याचे पटवून दिले त्यातील दोघा तिघा ज्येष्ठ साहित्यिकांनी तर मग आपले समर्थन स्पष्टपणे जाहीर रित्या नंतर दिले. दिले. यूट्यूब च्या माध्यमातून त्या त्या वेळी उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
शेवटच्या आजारपणात देखील त्यांनी प्रदीर्घ मुलाखती दिल्या. भाषणे केली. दुर्दैवाने त्यांना अनपेक्षित मृत्यू आला. याची महाराष्ट्राने दखल घेतली पाहिजे. असे सृष्टीच्या आमच्या कार्यक्रमात आग्रहाने म्हटले आहे.
५ पाठपुरावा समितीने कसा पाठपुरावा केला?. त्याचा किती आणि कसा उपयोग झाला हे आपण विचारावे असा माझा आग्रह आहे.
ताजा कलम
हे आणि असे प्रश्न मराठी चॅनल च्या माध्यमातून उपस्थित करावे असा माझा प्रयत्न होता. तो फारसा यशस्वी झाला नाही. परंतु दरम्यान अभिजात दर्जा मराठीला दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी पुण्यात महाराष्ट्र शासनाने मोठा जंगी कार्यक्रम आयोजित केला. प्रधानमंत्र्यांचे आभार मानणे हे आवश्यक होते. हे तर खरेच.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक आणि मराठी भाषा मंत्री सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार असे सर्व उपस्थित होते.
प्रधानमंत्री यांचे भाषण खूपच प्रभावी झाले हे मान्यच केले पाहिजे. त्यांच्या स्पीच रायटरने मराठी भाषेचा इतिहास , त्यात असलेली महत्त्वाची नावे एकत्रित गुंफून खूपच प्रभावी भाषण लिहिले होते. हा स्पीच रायटर दिल्लीच्या केंद्र सरकारच्या शासकीय सेवेतील होता, पक्षाचा कार्यकर्ता होता की कोणी प्रोफेशनल रा रायटर होता हे कळणे अशक्य आहे.
पण जो कोणी होता त्याने एक अत्यंत महत्त्वाची चूक केली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी नेमलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत,
समितीचा, त्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ यांचा, दिवंगत प्राध्यापक हरी नरके यांचा आणि समितीचे उरलेले तितकेच ख्यातनाम मराठी साहित्यिक यांचा उल्लेख या भाषणामध्ये करणे अत्यंत आवश्यक होते. खरे म्हणजे या सर्वांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार करणे आवश्यक होते. हे शासकीय संयोजक मंडळींच्या लक्षात आलेले दिसत नाही .
कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये मराठी भाषेशी संबंधित संस्था यांच्याशी संबंधित साहित्यिक दिसलेच नाहीत. उपस्थितांमध्ये खूप उत्साह होता असेही दिसले नाही कार्यक्रम उरकून टाकला पाहिजे एवढीच भावना असावी.
तर ते असो.
हरी नरके या महान माणसाचे स्मरण मराठी कृतज्ञतापूर्वक करायला हवे होते .
मराठी भाषा अभिजात दर्जा या विषयाशी संबंधित प्रत्येकाने भविष्यात देखील त्यांचे स्मरण सातत्याने केले पाहिजे असे माझ्यासारख्या सामान्य माणसाला देखील वाटत राहिले.
प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे
सेवानिवृत्त विभाग प्रमुख,संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग
पुणे विद्यापीठ