कागदावर नसलेला देशातील पहिला घोटाळा
X
स्वतंत्र भारतापासून तर आतापर्यंत देशाने अनेक घोटाळे पाहिले आहेत. त्यात देशातील पहिला मोठा जीप घोटाळ्यापासून तर बोफोर्स घोटाळा,स्टॉक मार्केट घोटाळा,चारा घोटाळा,स्टॅम्प पेपर घोटाळा आणि शेवटी आदर्श घोटाळ्यापर्यंत हे सर्व घोटाळे चर्चेचे विषय ठरले आहेत. पुढे हे सर्व घोटाळे कागदावर आले आणि त्यात चौकशी सुद्धा झाली. पण कधी तुम्ही कागदावर नसलेला पण प्रत्यक्षात असलेला घोटाळा ( Non Paper Scam ) आयकलं किंवा पाहिला आहे का?, विशेष म्हणजे तोही 500 कोटी किंवा त्यापेक्षाही अधिक असावा.....
सद्या औरंगाबादच्या स्थानिक माध्यमांमध्ये आणि काही प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये 'तीस-तीस' नावच्या घोटाळ्याची चर्चा आहे. मुळात ह्या प्रकरणाची पोलखोल max maharashtra ने सर्वात आधी 8 फेब्रुवारी 2021 लाच केली होती. मात्र पुढे यात आलेली माहिती धक्कादायक आहे. कारण हा सर्व घोटाळा तोंडी झाला असून, याची कोणतेही कागदोपत्री नोंद नाही. आता तुम्ही म्हणाल कागदावर नसलेला घोटाळा कसा?, तर तुम्हाला तेच आम्ही आता या बातमीतून सांगणार आहे. मात्र त्यापूर्वी हा 'तीस-तीस' घोटाळा नेमका आहे तरी काय हे आधी जाणून घेऊ यात....
'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केलं.
काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 7 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पैसे मिळण्याची अपेक्षा सुद्धा कमी झाली आहे.
कागदावर नसलेला घोटाळा
'तीस-तीस हा घोटाळा हा किमान पाचशे कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा असण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पैसे घेतांना गुंतवणूकदारांची कोणतेही कागदी नोंद करण्यात आली नाही किंवा त्यांना पावती देण्यात आली नाही. हा सर्व व्यवहार फक्त तोंडी आणि रोख पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाली याची तक्रार कशी करणार असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे. त्यात राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने पैसे दिले असल्याने त्यांच्याकडूनही तक्रार न करण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावले जात आहे. जर भविष्यात पोलिसांनी चौकशी सुरु केली तरीही, व्यवहार कागदावर झालाच नसल्याने यात काय तपास करतील हा मोठा प्रश्न आहे. आणि याचाच फायदा फसवणूक करणारा तरून घेत आहे.
त्यामुळे प्रत्यक्षात घोटाळा झाला असला तरीही कागदानुसार झालाच नाही, असं म्हणावे लागेल. पण यातूनही काही पर्यायी मार्ग काढत शेतकऱ्यांना त्यांच्या पैसे परत मिळवून देता येईल का? किंवा यात काही तांत्रिकदृष्ट्या तपास करून पैसे परत आणता येईल का? यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवं, अन्यथा शेकडो शेतकऱ्यांच कोट्यावधीच नुकसान तर होणारच पण अनेक पिढ्या बरबाद होतील तेही तेवढच सत्य आहे.
पोलीस काय म्हणतात...
यावर बिडकीन पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक संतोष माने म्हणाले की, ग्रामीण भागात 'तीस-तीस' फसवणूक झाल्याची चर्चा आमच्याही कानावर आली असून, परिसरात चर्चा सुद्धा आहे. पण प्रत्यक्षात याबाबतीत अजूनही एकही लेखी तक्रार आमच्याकडे आली नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आवाहन करत आहोत की, कुणाचेही अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी आणि त्याची दखल नक्कीच घेतली जाईल.