तुम्हाला लाज कशी वाटत नाही
X
राज्याच्या सत्तास्थापनेच्या तिढ्यावर तोडगा निघेल अशी शक्यता आता दिसते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू केल्याचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. या फोटोंकडे बारकाईने पाहिलं तर अस्वस्थ व्हायला होतं. सत्तास्थापनेच्या या तिढ्यामध्ये पुरूष नेत्यांचाच सहभाग दिसतोय. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी महिला नेत्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. महिला धोरण राबवणाऱ्या राज्यामध्ये महिला नेत्यांना अशी वागणूक देणाऱ्या सर्वच पक्षांना खरंतर लाज वाटली पाहिजे.
‘बाळासाहेबांची शपथ घेतो, खोटं बोलणार नाही!’
राष्ट्रपती राजवट लागली पण पत्रकारांचा गोंधळ थांबेना !!
सरकारशी लढून मरु, पण आता आत्महत्या करणार नाही !
राज्यातील जवळपास सर्वच पक्षांकडे महिला आघाड्या आहेत. त्या महिला आघाड्या या केवळ शोभेच्या बाहुल्या आहेत की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकांच्या वेळी ज्या महिला नेत्यांना आवर्जून प्रचाराला बोलवलं जायचं त्यांना सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये महत्ताचं स्थान देण्यात जवळपास सर्वच पक्ष उदासिन दिसतायत. महिला नेत्यांचा उपयोग केवळ नावांसाठी करायचा असं हे राजकीय पक्षांचं महिला धोरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.
महाशिवआघाडीचं सरकार बनत असताना या आघाडीचा किमान समान कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेतर्फे सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांचा समावेश आहे. या सर्व नामावलींमध्ये जाणत्या राजांपासून त्यांच्या पिट्टूंपर्यंत कुणालाच एकतरी महिला या समन्वय समितीत असायाला हवी असं वाटलं नाही. राज्याच्या राजकारणाचा गाडा फक्त पुरुषांनींच हाकायचा असं जर या सर्व पक्षांना वाटत असेल तर महाराष्ट्रासारख्या राज्याच्या दृष्टीकोनातून ही मोठी शोकांतिकाच आहे.
राज्याची मुख्यमंत्री महिला कधी होणार, महिला मुख्यमंत्री कोण होणार अशा स्वरूपाच्या बातम्या आणि ठेवणीतले प्रश्न सुप्रिया सुळे-पंकजा मुंडे-यशोमती ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांना हमखास विचारले जातात. याचाच अर्थ या महिला नेत्यांना पत्रकार मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये पाहतात. या रेसमधल्या महिला नेत्यांनी तरी उघडपणे समोर येऊन अशा कृत्यांचा जाहीर निषेध करायला हवा. राज्याचं राजकारणात महिलांना काय किंमत आहे, हे जवळपास सर्वच पक्षांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. हे सगळं पाहून सगळ्याचं राजकीय पक्षांना मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो, तुम्हाला लाज कशी वाटत नाही.