कोरोनाचा मध्य साधायचायं : डॉ. प्रकाश कोयाडे
सध्या घरोघर लोक आजारी आहेत. सर्दी कि कोविड या संभ्रमात लोक असताना नेमंक काय केलं पाहीजे यावर मार्गदर्शन केलं आहे, डॉ. प्रकाश कोयाडे यांनी...
X
सध्या एकही घर असं नाही की जिथे आजारी माणूस नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक माणूस आजारी आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला आहेच! एका बाजूला रुग्णांची ही अवस्था असताना दवाखाने, खासकरून खाजगी कोविड स्पेशल दवाखाने ओस पडून आहेत. IPD सोडा... OPD मध्ये यायला रुग्ण तयार नाहीत! पहिल्या दोन लाटेत पोटाच्या शिरा तटतटून फुगे पर्यंत खाल्लेले काही प्राणी तिसऱ्या लाटेची वाट पाहत रवंथ करत होते. यामध्ये काही दवाखान्यांपासून, ऐम्बुलन्स ड्रायवर पर्यंत सगळेच आले. दवाखान्यांना फक्त तोरणं लावायची आणि दरवाजात रांगोळ्या काढायचं बाकी होतं.
ही कोविडची तिसरी लाटच आहे पण अत्यंत सौम्य स्वरूपात आहे. लोकांना जाणीव होतेय की आपल्याला कोरोना झाला आहे पण त्याची खात्री कोणाला करून घ्यायची नाही. चाराण्याच्या कोंबडीसाठी बाराण्याचा मसाला विकत घ्यायची आता कोणाची इच्छा नाही आहे... कोरोना इतका स्वस्त झाला आहे!
खरं सांगायचं म्हणजे कोरोना व्हायरसचा Virulence, त्याची ताकद फार कमी झाली आहे. या विषाणूने मानवी शरीराशी जुळवून घेण्यात जवळपास यश मिळवलं आहे. व्हायरस माणसाळला आहे असं म्हणण्यातही काही वावगं ठरणार नाही! आज लक्षणं असो की नसो, कोणत्याही पाच माणसांची टेस्ट करा त्यातील किमान दोन लोक कोविड पॉझिटिव्ह येतील. एखाद्याला कोरोना झाला, ही गोष्ट एखाद्याला सर्दी झाली एवढी सहज गोष्ट बनली आहे.
परवा १८जानेवारी रोजी भारतात active रुग्णांची संख्या १८ लाख तीस हजारावर पोचली आणि यादिवशीची मृत्यूसंख्या आहे ४४२. दुसऱ्या लाटेत ज्या दिवशी रुग्ण संख्या १८ लाख होती (१७ एप्रिल २०२१), त्यादिवशी मृत्यूसंख्या १६०० होती. गेल्यावर्षी एवढे रुग्ण पॉझिटिव्ह असताना एकाही दवाखान्यात बेड शिल्लक नव्हता. ऑक्सिजन तुटवडा सुरू झाला होता, नजरेसमोर वृद्ध, तरुण लोक मरत होते... आज संख्येने तेवढेच रुग्ण आहेत पण वरीलपैकी कोणतीही वाईट परिस्थिती सध्या नाहीये.
फार फार तर महिनाभरात ही कोरोनाची सौम्य लाट उतरेल. खरंतर कोरोनाच्या हातात हात घालून टायफॉइडही पसरतोय पण तिकडे फार कमी लक्ष दिलं जात आहे. घरातील वृद्ध माणसे, इतर आजारांनी (खासकरून डायबिटीस) ग्रस्त असलेली माणसे, इम्युनिटी कमी असलेली लोकं आपल्याला जपायची आहेत. सौम्य लक्षणं आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका... जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवा, त्यांनी पूर्ण तपासून तसा सल्ला दिलाच तर कोविड टेस्ट करा. सध्या जी घराघरात ताप, खोकला आलेली, नाक गळत असलेली माणसं दिसत आहेत ती चार-पाच दिवसांत उपचार घेऊन ठणठणीत बरी होतील... न घाबरता, पॅनिक न होता जवळच्या डॉक्टरांना दाखवा! आपल्याला साधी सर्दी-ताप आहे म्हणून आजार लपवूनही ठेवायचं नाही आणि घाबरूनही जायचे नाही... कोरोनाचा मध्य साधायचा आहे!
डॉ. प्रकाश कोयाडे
यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल
पिंपरी चिंचवड, पुणे