बिनडोक मुलाखतकार मुलाखतीची वाट लावतात- निखिल वागळे
खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी लोकमतच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवरून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक निखिल वागळे यांनी सडेतोड टीका केली आहे.
X
मुलाखत घेणं ही एक कला आहे.
तुम्ही तबस्सुमपासून कुणाल कामरा, निलेश मिश्रा ते करण थापरपर्यंत मुलाखती नीट ऐका. तुम्हाला त्यांची एकेक पाकळी उलगडण्याची शैली मोहात पाडते. ओरियाना फलाची ही थोर बाई. तिने खोमेनीपासून बुशपर्यंत सर्वांना आपल्या प्रभावाने जमीनदोस्त केलं.
मुलाखती विविध प्रकारच्या असतात. व्यक्तिमत्ववेधी मुलाखती, कोर्टमार्शल करणाऱ्या grilling मुलाखती, रॅपिड फायर, हलक्याफुलक्या मुलाखती….मुलाखतकाराचा अभ्यास, प्रश्नातून प्रश्न काढण्याचं कौशल्य महत्वाचं ठरतं. समोरच्या व्यक्तिमत्वाच्या पोटात तो शिरतो की नाही हे लगेच लक्षात येतं.
अमेरिकेत तर अशा मुलाखतकारांवर सिनेमे निघाले. मुलाखतकार हा तिथे हिरो बनतो. त्याच्या शोच्या appointment viewing साठी प्रेक्षक येतात. लॅरी किंग, डेविड लेटरमन, क्रिस्टियाना अमनपोर ही यातली काही बडी नावं. लॅरी किंग शो तर त्यांच्या वयाच्या ८९ वर्षापर्यंत चालू होता.
ग्रेट भेटच्या वेळी हा सगळा अभ्यास उपयोगी पडला. २५० च्या वर मुलाखती मी केल्या.
पण हल्ली सगळा चोथा झाला आहे.
मुलाखतीच्या नावाने बाजार मांडला जातो. काही शिस्त नाही, flow नाही, कंटाळा करत प्रश्न विचारतात. माझा कट्टा हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण. मुलाखत देणारे आक्षेप घेत नाहीत. कारण त्यांना स्वतःच्या प्रसिद्धीसाठी संधी मिळालेली असते.
कालची राज ठाकरेंची मुलाखत या सगळ्याच्या पलिकडची. निव्वळ चोथा. वास्तविक राज ठाकरे ही मुलाखतकारांसाठी मेजवानी आहे. पण बिनडोक मुलाखतकार अशा मेजवानीचीही वाट लावतो.
असो. अतिसामान्यांच्या सद्दीचे दिवस आहेत हे.
साभार- फेसबुक