मी कधी माफी मागितली?
गुजरात दंगलीसाठी, नोटाबंदीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी, कोरोना काळात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेल्या लोकांच्या मृत्यूंसाठी कधीही माफी न मागणाऱ्या मोदींनी खरंच शेतकऱ्यांची माफी मागितली आहे का? वाचा 'मी माफी कधी मागितली'?
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेताना देशवासियांची माफी मागितली. मात्र, ही माफी मागताना मोदी यांनी आपल्या हातून चूक झाली. किंवा हा कायदा केल्यानं 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतो आहे? असा कुठलाही उल्लेख केलेला नाही. उलट त्यांनी शेतकऱ्यांना दोष देत आपण देशवासियांची माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.
ते हिंदी मध्ये म्हणतात... 'मैं आज देशवासियों से क्षमा माँगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूँ कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी जिसके कारण दीए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए।'
मोदी यांच्या मते सरकारने केलेले कायदे योग्यच होते. मात्र, हे कायदे काही शेतकऱ्यांना समजले नाही. किंवा हे कायदे आम्ही शेतकऱ्यांना समजून सांगू शकलो नाही. म्हणून मी देशवासियांची माफी मागत आहे. म्हणजे या ठिकाणी देखील मोदी आपली चूक मान्य करत नाही.
मोदी यांनी जाहीरपणे आत्तापर्यंत कधीही कोणाची माफी मागितल्याचं दिसून येत नाही. कदाचित सार्वजनिकरित्या अशा प्रकारे माफी मागण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, माफी केव्हा मागितली जाते. जेव्हा तुम्ही चूक करता किंवा तुम्ही चूक केली असा तुमचा विश्वास असतो. मोदी कधीच चूक करत नाहीत. आणि जरी केली तरी ते कधी मान्य करतात? त्यांनी चूक झाली असं मान्यच केलं नसेल तर मग माफी कसली?
असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मोदी यांनी कधीही देशवासियांची माफी मागितली नाही... मोदींनी गुजरात दंगलीसाठी देशवासियांची माफी मागितली का? नोटाबंदीमध्ये कित्येक लोकांचा रांगेत मृत्यू झाला. देशाचं लाखो कोटी रुपयाचं नुकसान झालं? लाखो कारखाने बंद पडले. करोडो लोक बेरोजगार झाले. त्यासाठी त्यांनी कधी माफी मागितली का?
कोणतीही तयारी नसताना देशात अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे करोडो लोक अन्न पाण्यासाठी वंचित झाले. काही लोकांचा प्रवासात मृत्यू झाला. त्यासाठी मोदींनी कधी देशवासियांची माफी मागितली का?
कोरोना काळातील ढिसाळ कारभारामुळे हजारो लोकांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. त्यासाठी त्यांनी कधी देशवासियांची माफी मागितली का? स्वत:च्या चुकांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला तरी मोदी यांनी कधीही देशवासियांची माफी मागितली नाही. ते मोदी शेतकऱ्यांची माफी कशी मागणार? सध्या काही लोक असं समजत आहेत की, मोदी यांनी शेतकरी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांची नाही तर देशवासियांची माफी मागितली आहे. आणि ही माफी त्यांनी आपण काही शेतकऱ्यांना हे कृषी कायदे समजून सांगू शकलो नाही. त्यांचं हित समजून सांगू शकलो नाही. म्हणून आपण देशवासियांची माफी मागत आहोत. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. थोडक्यात मी कोणतीही चूक केलेली नाही. तरीही मी देशवासियांची माफी मागतो. असं पंतप्रधानांना या ठिकाणी म्हणायचं आहे.
शेतकऱ्यांना 'दीए के प्रकाश जैसा सत्य' दिव्याच्या प्रकाशा इतकं सत्य समजलं नाही. म्हणून आपण माफी मागत आहोत. आता कोणी खरं लोकांना समजलं नाही म्हणून माफी मागत का? किंवा ज्या लोकांना खरं समजत नाही. त्या लोकांना आपण काय म्हणतो? म्हणजे आम्ही समजून सांगत होतो. मात्र, मुर्ख लोकांना ते खरं समजलं नाही. असं तर मोदींना म्हणायचं नाही ना?
एकंदरीत काही लोक मोदी यांनी देशवासियांची माफी मागितली म्हणून आनंदोत्सव साजरा करत असले तरी ती माफी होऊ शकत नाही. कारण माफी आपण जेव्हा मागतो. तेव्हा आपण आपली चूक मान्य केलेली असते. इथे चूक मान्य केलेली नाही. आणि ते कधीही करणार नाहीत...