Home > मॅक्स ब्लॉग्ज > पत्रकारितेमधील माझी उमेदवारी

पत्रकारितेमधील माझी उमेदवारी

``माझ्या विचारांना जी पत्रकारिता हवी होती ती मला इथे गवसली. तेव्हाच ठरवलं की या माध्यमावरुन काम करायचं, संधी मिळाली.. दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्यांना मी वाचा फोडू शकलो.``. MaxMaharashra च्या वर्धापन दिनानिमित्त दृष्टीबधित प्रतिनिधी गौरव मालक यांनी व्यक्त केलेल्या भावना...

पत्रकारितेमधील माझी उमेदवारी
X

``माझ्या विचारांना जी पत्रकारिता हवी होती ती मला इथे गवसली. तेव्हाच ठरवलं की या माध्यमावरुन काम करायचं, संधी मिळाली.. दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्यांना मी वाचा फोडू शकलो.``. MaxMaharashra च्या वर्धापन दिनानिमित्त दृष्टीबधित प्रतिनिधी गौरव मालक यांनी व्यक्त केलेल्या भावना...

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे प्रसार माध्यम. हे सर्वश्रुत असताना याच माध्‍यम प्रणालीमध्ये संविधानाला अपेक्षित असणाऱ्या देश हितासाठी निरंतर कटिबद्ध असणाऱ्या Max Maharashtra या परिवाराचा मी अविभाज्य घटक असल्याचा अगदी सार्थ अभिमान वाटत आहे. खरंतर पत्रकारिता म्हटल्यानंतर हे क्षेत्र अनेकांचा आकर्षणबिंदू असतं. अर्थात मी सुद्धा त्याला अपवाद नाही. माझी या क्षेत्रातील सुरुवात इयत्ता चौथीमध्ये असताना झाली. स्वतः दृष्टी बाधित असल्याने स्वतःमधील गुणवत्ता शोधण्याचा सकारात्मक दृष्टिकोन सहजच उमगला. प्रत्येकामध्ये काही ना काही गुणवत्ता असते मात्र स्वतःच्या अंतरंगात डोकावून त्या गुणवत्ते पर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे त्यावेळी लक्षात आलं. विकासापासून अद्यापही दुर्लक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांमध्ये असणारे करडा हे माझे छोटे खेडे गाव. याच गावातील कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत संचालित स्वर अनंत रेडिओ केंद्रावर मी सर्वप्रथम स्वतःला व्यक्त केलं.नंतर शाळेमध्ये असताना माझ्या मधील पत्रकार हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली.

प्रत्येक रविवारी चार-पाच मित्रांना एकत्रित करायचं व प्रत्येकाला वेगवेगळ्या पक्षांचा प्रवक्ता बनवायचं व तत्कालीन गाजणाऱ्या एखाद्या विषयावर चर्चासत्र भरवायचं. हा माझा त्या वेळेचा उपद्व्याप! त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की हाच उपद्व्याप भविष्यात जनतेचे प्रश्न मांडण्याचं ते सुवर्ण द्बार असेल. नंतर दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि या क्षेत्राबद्दल वास्तविकता माहित झाली आणि काही प्रमाणात मन खचलं, कारण लोकशाहीचा आधारस्तंभ असणारी माध्यमं निराधार बनत चालल्याचं चित्र जाणवत होतं. अनेक माध्यमांनी विशिष्ट पक्षाचा राजकीय अजेंडा चालवणं सुरू केलं होतं व मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांसह राजकारण इतकीच पत्रकारिता असते का? असा सवाल माझ्यातील पत्रकार सातत्याने मला विचारत होता.

मात्र प्रत्येक गोष्टीत नाण्याच्या दोन बाजू असतात ही बाब स्वतःला समजावत आपण सकारात्मकतेने पुढे जायचं. असं ठरवलं आणि काम करत राहिलो. 2020-21 या शैक्षणिक वर्षात बारावी मध्ये असताना कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना जसा फटका बसला तसा तो शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा बसला. दहावी बारावी मध्ये शिकणाऱ्या माझ्या दृष्टी बाधित मित्र-मैत्रिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यांचे अनेक प्रश्न होते. जे येथील निष्क्रिय राजकीय व्यवस्थेला माहीत नव्हते. मी यासंदर्भात अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोललो मात्र कोणीही या प्रश्नांची दखल घेतली नाही. उलट 'असे प्रश्न आम्हाला मांडता येत नाहीत व अशा बातम्यांना TRP सुद्धा नसतो' अशा पद्धतीची उत्तर मिळाली. हे ऐकताक्षणी खरंच खूप दुःख झालं. आम्ही दृष्टी बाधित आहोत म्हणजे आम्हाला सहानुभूती मुळीच नको. मात्र समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी संधी हवी हे येथील समाजाला दाखवून द्यायचं होतं म्हणून वाटचाल करत राहिलो.

दरम्यानच्या काळात Max Maharashtra पाहायला सुरुवात केली आणि माझ्या विचारांना जी पत्रकारिता हवी होती ती मला इथे गवसली. तेव्हाच ठरवलं की या माध्यमावरुन काम करायचं. त्यानंतर या चॅनेलचे संपादक रविंद्र आंबेकर यांना मी फोन केला. मला आपल्या सोबत काम करण्याची इच्छा आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यांनी माझ्यातील गुणवत्ता लक्षात घेऊन शिकाऊ उमेदवार म्हणून मला इथे काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. तदनंतर मी मांडलेल्या माझ्या दिव्यांग व सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्यांना मी वाचा फोडू शकलो. अनेक बातम्यांची मंत्रिमंडळात दखल घेतली गेली. हा प्रवास सुरू असताना फिल्डवर गेल्यानंतर दृष्टी बाधित असल्याने अनेक तांत्रिक आव्हान येतात. मात्र पडद्यामागची हिरो म्हणजे माझी बहीण गायत्री. ती मला या सगळ्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये सहकार्य करत आली आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा अनेक स्वप्न आहेत व त्या स्वप्नपूर्तीसाठी मी माझ्या प्रयत्नांसह कायम प्रयत्नशील असणार आहे. या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुम्हा सगळ्यांचे मार्गदर्शनरुपी आशीर्वाद पाठीशी असतील हाच माफक आशावाद.

आपलाच युवा पत्रकार गौरव मालक

8622862232

Updated : 26 Jan 2022 2:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top