MPSC परीक्षा पुढं ढकलली: काय आहेत विद्यार्थी आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया
MPSC परीक्षा पुढं ढकलली: काय आहेत विद्यार्थी आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया
X
राज्यात कोरोनाने रौद्र रुप धारण केलेले असताना पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या मुख्य शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, काही अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. मात्र, या निर्बंधांना काही ठिकाणी विरोध होत आहे. या निर्बंधाच्या काळातच MPSC आणि १० वी १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांना स्थगिती देण्याची मागणी सध्या समोर येत आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांचाच विचार केला तर ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. ही परीक्षा आज मुख्यमंत्र्यांनी पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता MPSC परीक्षा पुढे ढकला अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री, अधिकारी यांच्याबरोबर व्हीसी मार्फत ही बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अगोदर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांनी देखील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो. असं ट्विट केलं होतं.
या संदर्भात आम्ही काही विद्यार्थ्यांशी बातचीत केली.
गेल्या ५ वर्षांपासून पुण्यामध्ये MPSC चा अभ्यास करणाऱ्या भूजंग मिसाळ या विद्यार्थ्यांशी आम्ही बातचीत केली. ते म्हणाले...
सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य आहे.
बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागातून भूजंग येऊन पुण्यात अभ्यास करतात. वडील ऊसतोड कामगार आहेत. ते सांगतात. गेल्या १ ते दीड वर्षात सतत परीक्षा पुढं ढकलल्या जात आहे. कधी मराठा आरक्षण तर कधी कोरोना. वडील ऊसतोडीचं काम करून पोटाला चिमटा देऊन पैसे पाठवतात. आपला मुलगा काहीतरी होईल. ही त्यांची आशा आहे. मी त्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकदा प्रिलिअम देखील पास झाल्याचं भूजंग सांगतात.
मला यश मिळेल. मात्र, कोरोनापेक्षा राजकारण्यांच्या सततच्या बदलत्या भूमिकांनी आमचं मोठं नुकसान झालं आहे. काही मुलांचं सिलेक्शन झालं असलं तरी वर्ष होऊन गेलं तरी ऑर्डर हातात आलेली नाही. सध्या परीक्षा घ्यायचा विषय म्हणाल तर काही विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. तर बहुतांश इथंच अभ्यास करत आहेत. आज तुम्ही जर कोणालाही फोन लावला तर आज बहुतांश विद्यार्थ्यांचे फोन बंद असतील. सगळे फोन बंद करून अभ्यास करत आहेत. मी मेसला जेवन करण्यासाठी आलो होतो. माझाही फोन बंदच होता. हा काळ खूप महत्त्वाचा आहे. अनेक वेळा परीक्षा होत नाही. MPSC चा अभ्यास हा जीवन मरणाची लढाई झाला आहे. त्यातच फोन सुरु केल्यानंतर समजलं परीक्षा रद्द झाली आहे. संतप्त झालेले भूजंग म्हणतात.
पंढरपूर पोटनिवडणूक रद्द झाली का? 5 राज्यात निवडणूका होत आहेत. तिथं कोरोनाने माणसं मरत नाहीत का? MPSC चे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक घटकांची जाणीव आहे. त्यांना बदलणाऱ्या कोरोनाचं स्वरूप कळतंय. बदलणाऱ्या परिस्थितीत कशी काळजी घ्यावी हे कळतं. आमच्यातले अनेक विद्यार्थी उद्या अधिकारी होऊन सेवा करणार आहेत. अशा काळात आम्ही कोरोना आला म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याऐवजी घरी थोडेच बसणार आहोत. हीच खरी आमची परीक्षा आहे. अशा काळात परीक्षा देणं म्हणजे आम्ही आमच्या कर्तव्यच बजावत आहोत. कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही परीक्षाला जायला तयार आहे. वर्ष-वर्ष आम्ही अभ्यास करतो आहोत. आम्हाला इथं राहण्यासाठी खूप खर्च लागतो. परीक्षा झाल्या की, यातील काही विद्यार्थी पुढे अधिकारी होतील. त्यांचा खर्च वाचतो. आम्हालाही आमचा स्कोर कळतो. त्यामुळं सर्व काळजी घेऊन परीक्षा व्हायलाच पाहिजे. परीक्षा झाल्यावर आम्ही आमच्या गावाला निघून जाऊ. मात्र, परीक्षा होणं गरजेचं होतं. कोरोना किती दिवस आहे. माहिती नाही. तुम्ही किती परीक्षा पुढं ढकलणार आहात? असा सवाल भूजंग यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सरकारला केला आहे.
यानंतर आम्ही स्टुडंट हेल्पींग हँड संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांच्याशी आम्ही बातचीत केली. ते म्हणाले…
परिस्थिती गंभीर आहे. हे मान्य आहे. आता परिक्षेला दोन दिवस उरले आहेत. ज्या मुलांचा अभ्यास झाला आहे. अशी मुल सेन्टर असणाऱ्या शहराच्या ठिकाणी पोहोचली आहेत. आणि यात परीक्षा पुढे ढकलणं म्हणजे विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढवण्यासारखं आहे. त्यामुळं नियोजीत परीक्षा सरकारने पुढं ढकलून चूक केली आहे. कोरोना कधी संपणार माहित नाही. कोरोना आपल्या सोबत अनिश्चित काळासाठी आहे. त्यामुळे परीक्षा पुढं ढकलण्यात अर्थ नव्हता. सरकारने मुलांच्या होणाऱ्या खर्चाचा देखील विचार करायला हवा होता. परीक्षा अशा पद्धतीने पुढं ढकलल्याने मुलांवर मानसिक आघात होतो. ही सर्व मीडल क्लास मधील ग्रामीण भागातून आलेली मुलं आहेत. मुलांची वय वाढत आहेत. त्यामुळं ते परिक्षेतून बाद होण्याची भीती आहे. ही परीक्षा रद्द झाली. याचे दुरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या मनावर होतील. त्यामुळं परीक्षा रद्द करून सरकारने चूक केली आहे. सरकार योग्य ती काळजी घेऊन परीक्षा घ्यायला हवी होती. असं मत कुलदीप आंबेकर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.
११ मार्चला परीक्षा व्हाव्यात यासाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्याशी आम्ही बातचीत केली...
ते म्हणाले… आता ही परीक्षा रद्द करण्याची वेळ नाही. परीक्षा दोन दिवसांवर आल्या होत्या. आता परीक्षा रद्द झाल्यानं प्रामाणिक विद्यार्थ्याचं मोठं नुकसान झालं आहे. मुलांच्या मानसिकतेचा देखील आपण विचार करायला हवा. विद्यार्थी या परीक्षांसाठी रात्रंदिवस अभ्यास करत असतात. सरकारने कोरोनामुळं परीक्षा रद्द करायची होती तर परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच निर्णय घ्यायला हवा होता. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर नसते. तेव्हा परीक्षा रद्द केल्या जातात. आणि आता परिस्थिती वाईट आहे. तेव्हा सरकार दोन दिवसांवर परीक्षा आलेल्या असताना परीक्षा रद्द करण्याची भाषा करते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो.
हे सर्व ग्रामीण भागातील १८ पगड जातीतील गोर गरिबांची पोर आहेत. पोटाला चिमटा घेऊन इथं अभ्यास करतात. त्यांच्या मानसिकतेवर आघात होईल असा सरकारने निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलली जाईल. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी परीक्षा देणं सोडून द्यायचं का ? असा सवाल हाके यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केला आहे.
MPSC Students Rights अध्यक्ष महेश बडे सांगतात...
सध्या दोन गट निर्माण झाले आहेत.
परीक्षा रद्द करायला हवी आणि नको. यावर दोन गट निर्माण झाले आहेत. यावर आता सरकार ने जो निर्णय घेतला आहे. तो आम्हाला मान्य आहे. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सरकारने निर्णय देण्यास उशीर केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता नव्हती. मात्र, या निर्णयामुळे गोंधळ संपला आहे.
एकंदरित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोरोनाची भीती तर आहेच. मात्र, सरकार परीक्षा वेळेवर घेत नसल्यानं विद्यार्थी कोरोनासारख्या परिस्थितीतही परीक्षा द्यायला तयार झाले आहेत.