राज ठाकरेंना 'मनसे' शुभेच्छा!
X
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तपपूर्तीच्या शुभेच्छा! राज ठाकरेंच्या मी कधीच प्रेमात नव्हतो. सदैव त्यांच्या सर्व राजकीय हालचाली मला नेहमीच अगम्य वाटत आल्या आहेत. त्यांची अनेक राजकीय पाऊले तर आत्मघातकीच होती. तरी सुद्धा आज मला राज ठाकरे यांच्या एकूण वाटचाली बद्दल त्यांचं अभिनंदन करावंस वाटतंय.
स्वत:चा पक्ष काढणं आणि तो चालवणं हे कठीण आहे. ते येऱ्यागबाळ्याचं काम नाही. राज ठाकरे यांनी ज्यावेळी पक्ष काढायचं ठरवलं होतं, त्यावेळी ते राज्यभर फिरले होते. विविध लोकांशी बोलले होते. त्यांच्या टीमने सतत काम करून महाराष्ट्राची ब्लू प्रिंट काढली होती. त्या ब्लू प्रिंटची प्रचंड थट्टा ही झाली. कदाचित बालीश वाटेल कुणाला हा प्रकार, पण महाराष्ट्राला नव्या नजरेने पाहण्याची-मांडण्याची दृष्टी तरी त्यांना आहे इतकं तरी त्या निमित्ताने दिसलं होतं. राज ठाकरे यांचं आणखी एक वैशिष्ट मला जाणवतं. ते म्हणजे त्यांना सल्ला द्यायला खूप लोकं आहेत. प्रत्येकालाच वाटतं की राज ठाकरे त्यांचं ऐकतात. विशेष करून राजकारणाशी संबंध नसलेलेही अनेकजण आपणच कसं राज ठाकरे यांना हे करा, ते करा असं सांगितलं याच्या कहाण्या सर्वांना सांगत असतात. माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो असं मी लहानपणी वाचलं होतं. राज ठाकरेंच्या संगतीत आणि बैटकीत असल्याचा दावा करणाऱ्या लोकांमुळे मला राज ठाकरेंबद्दल नेहमीच कुतुहल वाटत आलंय. मुंबई महापालिकेचं ही कधी कव्हरेज न केलेले पत्रकार आपण कसे राज ठाकरे यांचे सल्लागार आहोत असं सांगायचे तेव्हा मला नक्की कुणाची कीव करावी असा नेहमी प्रश्न पडायचा. राज ठाकरे यांना सल्ला देऊन ही काहीच बदल घडला नाही असं सांगून, ‘ऐकत नाही तो.. त्याचमुळे मी सध्या लांब गेलोय. बंद केलं मी त्याच्याकडे जाणं’ असं एकेरीत उल्लेख करत नाराजी व्यक्त करणारे अनेक राज ठाकरेंचे मित्र इकडे-तिकडे भेटत असतात. तेव्हा मला फार गंमत वाटते.
मध्यंतरी म्हणे एक संपादक न्यूजरूम मधून मुद्दाम ‘बरं, ऐक राज.....’ असं राज ठाकरे यांना फोन लावून गप्पा मारायचे. तर अशा विविध प्रकारच्या लोकांच्या गराड्यात असलेल्या राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीला वळण देण्यासाठी अजित पवारांचे काका ही त्यांना सल्ला द्यायचे. दुसऱ्याच्या काकाचा का होईना पण राज ठाकरे सल्ला ऐकतात हे त्यांनीच जाहीर कार्यक्रमात सांगितलेलं आहे.
तर असं हे वेगळं रसायन आहे. एकूणच राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व पाहिल्यावर मला वाटत नाही त्यांना कुणाच्या सल्ल्याची गरज आहे, किंवा ते कुणाचा सल्ला ऐकत असावेत. राज ठाकरे यांच्या राजकारणामध्ये अनेक चढउतार आहेत. संघर्ष आहे. पक्ष काढणं, तो चर्चेत ठेवणं, निवडणूका जिंकणं-हारणं, लढणं-माघार घेणं यासाठी राजकीय मुत्त्सद्देगिरी लागते ती राज ठाकरे यांच्यात आहे. पक्कं टायमिंग असलेल्या माणसाचं टायमिंग एकदा चुकलं की त्याला सूर गवसायला वेळ लागतो तसं राज ठाकरे यांचं झालंय. स्वत:ला महाराष्ट्रा प्रती अर्पण करणाऱ्या राज ठाकरेंना ज्यावेळी माझ्या राजाला साथ द्या असं केविलवाणं गाणं स्टेज वर उभं राहून ऐकावं लागतं यातचं त्यांचं टायमिंग कसं चुकलंय हे लक्षात आलं होतं. नरेंद्र मोदी यांची तारिफ हे ही त्यांचं टायमिंग कसं चुकतंय हे दाखवून देत होतं. अचानक निवडणूका न लढण्याचा अतर्क्य निर्णय घेऊन राज ठाकरे यांनी पक्षाचं एनजीओकरण केल्याचंही सर्वांनी पाहिलंय. यावरून टीका ही झालीय. पण एखादा माणूस पुरेशी रसद हाताशी नसताना किती लढू शकतो याचं ही भान टीकाकारांनी बाळगलं पाहिजे.
राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाच्या सुपाऱ्या वाजवल्या अशी मंत्रालयात अनेक राजकीय नेते चर्चा करत असतात. एक दिवंगत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तर आपण कसं राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी करायला मदत करायचो हे अँटीचेंबर मध्ये पत्रकारांना सांगायचे. शिवसेनेला रोखण्यासाठी राज ठाकरे यांचा वापर केल्याचं हे दोघेही सांगायचे. खरंही असेल असं माणून चालू, पण राज ठाकरे यांच्या भाषणासाठी गर्दी आपोआप होते हे आपण पाहिलेलं आहे. बाळासाहेबांच्या सभांनाही कधी माणसं आणावी लागली नाहीत. काही लोकं त्यांची भाषणं मनोरंजनासाठी ही ऐकतात. काही त्यांची शैली आवडते म्हणून. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. गर्दीतले लोक मतदान करतीलच अशातला भाग नाही. राज ठाकरेंना लोक मतदान करत नाहीत हे वास्तव आहे. आणि ते का करत नाहीत हे राज ठाकरे यांचे सल्लागार त्यांना सांगत असतीलच.
सध्या राज ठाकरे मध्ये-मध्ये सभा घेताना किंवा कार्यकर्त्यांमध्ये फिरताना दिसतात. मुंबईमध्ये त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना लांब ठेऊन दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या बैठका ही घेतल्या. व्यंगचित्र काढायला सुरूवात करून सोशल मिडीयावर फॉलोईंग ही त्यांनी जागृत ठेवलंय. फेसबुक पेज वर भाषणांचं लाइव्ह केल्यापासून त्यांची चर्चाही वाढलीय. हे सर्व पाहता येत्या निवडणूकीत राज ठाकरे प्रभाव टाकतील असं मला वाटतंय. ते जागा किती जिंकतील माहित नाही, पण ते शिवसेनेला त्रास जरूर देतील. त्यांची सर्व रणनिती किंवा पावलं ही त्या दिशेने पडतायत.
राज ठाकरे यांनी भाजपशी जवळीक केली असून निवडणूकीत शिवसेनेला रोखण्यासाठी त्यांचा वापर हत्यार म्हणून केला जाईल असं बोललं जातंय. शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र मुलाखतीचा कार्यक्रम घेऊन मोदींवर टीका केली तेव्हा ही शिवसेना विरोधी पक्षाची स्पेस घेतेय, ती शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची ही खेळी असल्याचं बोललं गेलं. नेमकी हीच प्रतिमा राज ठाकरे यांच्यासाठी घातक आहेत. कधी काँग्रेस-राष्ट्रवादी, कधी भाजप राज ठाकरे यांचा वापर हत्यारा सारखा करणार असेल तर राज ठाकरे यांच्या या तपपूर्तीला काहीच अर्थ नाहीय. युद्ध लढली जातात, जिंकली जातात, हरली जातात.. याच जय-पराजय हत्यारांचा होत नाही. हत्यारं फक्त वापरली जातात. राज ठाकरे आपला वापर होऊ देतात की स्वत:ची खेळी खेळतात यावर त्यांच्या पक्षाची पुढची वाटचाल अवलंबून आहे.