Home > मॅक्स ब्लॉग्ज > दूध प्राणिज पदार्थ आहे का?

दूध प्राणिज पदार्थ आहे का?

दूध प्राणीज असल्याचा जावई शोध एका महाशयाने लावला आहे. अलिकडे कोणी काय खावं? कोणता वेश परिधान करावा. अमुक अमुक पदार्थ व्हेज नाही. असे ज्ञान पाजळणारे अनेक लोक असतात. या लोकांचा लेखक आनंद शितोळे यांनी घेतलेल्या समाचार

दूध प्राणिज पदार्थ आहे का?
X

भारतातल्या दूध आणि दुधाच्या पदार्थांच्या बाजारपेठेचे मूल्य ११,३५७ बिलियन म्हणजे ११,३५,७०० कोटी रुपये एवढे अतिप्रचंड आहे. कोट्यावधी शेतकरी, दूध उत्पादक, त्याची वाहतूक करणारे, दुधावर प्रक्रिया करणारे, त्याचे पदार्थ बनवणारे, पशुपालन करणारे लोक ज्यांची या व्यवसायावर अवलंबून असलेली संख्या तेवढीच मोठी आहे.

बेभरवशाची शेती पावसावर अवलंबून असताना दुग्धव्यवसाय हा जोडधंदा म्हणून नव्हे तर संपूर्ण घराला जगवायला उपयोगी असणारा व्यवसाय आहे. सहकाराच्या मदतीने या व्यवसायाची पाळेमुळे देशभरात पसरलेली आहेत. हा व्यवसाय शेतीचा पूरक असला तरी ग्रामीण अर्थकारणाचा भक्कम कणा आहे.

पोषण आहारात दूध अतिशय महत्त्वाचे आहे. सहज उपलब्ध असलेला कॅल्शियमचा सोर्स म्हणून दूध उपयुक्त आहे. सर्वसामान्यपणे गाई आणि म्हशीचे दूध सगळ्यात जास्त वापरले जाते. भौगोलिक बदलानुसार काही भागात शेळ्या, मेंढ्या, उंट, याक या प्राण्यांचे दूध सुद्धा वापरले जाते. एकुणात दूध हा भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातल्या लोकांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे.

दूध प्राणिज पदार्थ आहे म्हणून तो निषिद्ध मानावा आणि आहारातून वर्ज्य करावा. अशी मागणे करणे मूर्खपणाचे आणि अशास्त्रीय आहे. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी विसाव्या शतकात वनस्पती, झाडे यांच्यात सुद्धा प्राण असतात, त्यांना भावना असतात हे सिद्ध केलेलं आहे. वनस्पती-झाडे स्वतःहून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना आवाज करण्याची क्षमता नसते. हा मुलभूत फरक इतर जीवसृष्टी आणि वनस्पतीमध्ये आहे.

जर दूध प्राणिज म्हणून नाकारायचे असेल तर आपल्या आहारातल्या एकूण एक वस्तू वनस्पती किंवा झाडांचा भाग आहेत. ऊस-गहू-तांदूळ गवताचे प्रकार आहेत, फळे वेगळी आहेत, पालेभाज्या वेगळ्या आहेत. पण सर्वाना जीव आहे. हे सूत्र समान आहे. उलट दूध काढताना आपण किमान प्राण्याला मारून टाकत नाहीत, शिजवत नाहीत किंवा थेट खाऊन टाकत नाहीत.

पालेभाज्या, फळ, तृणधान्य हे आपण खाऊन संपूर्णपणे नष्ट करतो ? मग दुधापेक्षा ही हिंसा जास्त क्रूर नाही का? जीव असलेला कुठलाही प्राणी, वस्तू, फळ, भाज्या खाऊ नयेत असं ठरवलं तर काही दिवसात मानवजात भुकेने मरून जाईल किंवा एकमेकांना खायला लागेल.

मानवी शरीरात पचनक्रिया, चयापचय सुरळीत चालावे. म्हणून अनेक रस स्त्रवत असतात, आपल्या आतड्यात, जठरात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वास करत असतात. जे पचनक्रिया सुलभ करतात, त्यांच्या विना आपण खाल्लेले अन्न पचवू शकणार नाहीत.

आणि बेसिकली कुणी काय खावे, काय प्यावे हे तुम्ही कोण ठरवणार रे? कायद्याने यावर कुणीही बंधन घालू शकत नाहीये हेही कळत नाही ? कुठल्याही संघटनेने अश्या स्वरुपाची दुधाच्या वापरावर किंवा अन्नपदार्थ म्हणून सेवनावर कायदेशीर बंदीची मागणी किंवा नैतिक बंदीचे आवाहन हा वेडगळपणाचा कळस आहे. या माणसांना सहानुभूतीची आणि योग्य मानसोपचाराची जास्त गरज आहे.

(आनंद शितोळे)

Updated : 1 Jun 2021 4:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top