Home > मॅक्स ब्लॉग्ज > वैद्यकीय व्यवसाय - काल, आज आणि उद्या.. (भाग २)

वैद्यकीय व्यवसाय - काल, आज आणि उद्या.. (भाग २)

वैद्यकीय व्यवसाय - काल, आज आणि उद्या.. (भाग २)
X

पुढचा मुद्दा म्हणजे, पूर्वीपेक्षा आज समाजातही खूप बदल झाले. हळूहळू व्यवसाय करण्यामागील हेतू 'पैसे कमावणे' हा होऊ लागला. कारण समाजातील व्यक्तीची 'पत' ही त्याच्या ज्ञान अथवा कौशल्यावरून न ठरता ती पैशावरून ठरू लागली. मग याला डॉक्टर तरी अपवाद कसे ठरणार?

डॉक्टरांमध्ये देखील 'पैसे कमावणे' ही भावना वाढीस लागू लागली आणि तिथूनच ख-या अर्थाने वैद्यकीय पेशातील 'मालप्रॅक्टिसेस'ना सुरुवात झाली. मार्केटिंगची सुरुवात झाली. अशातच 'ग्राहक संरक्षण कायदा' (CPA) लागू झाला आणि परिस्थिती आणखीनच बिघडली. डॉक्टरांना त्रास देण्याचं किंवा ब्लॅकमेल करण्याचं प्रमाण वाढलं.

नीट विचार केला तर असे लक्षात येते की समाजातील इतर व्यावसायिकांमध्ये ज्या पद्धतीचे बदल होत होते तसेच बदल वैद्यकीय पेशातदेखील होत होते. कारण डॉक्टर हा देखील त्याच समाजात वावरणारा समाजाचाच एक घटक आहे.

हे ही वाचा..

सार्वजनिक क्षेत्रात ‘दलाली’ ही चांगलीच फोफावली आणि तिला मान्यताही मिळाली, मग हळूहळू तिचा शिरकाव वैद्यकीय पेशात पण होऊ लागला. आता जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात एजंट आहेत. जमिनीचे व्यवहार असो किंवा साधं लायसन्स काढायचं असो, आपल्याला मदत मिळविण्यासाठी, आपलं काम सोपं करण्यासाठी, आणि योग्य ती दिशा दाखविण्यासाठी आपल्याला त्यांची मदत होते, हे जवळजवळ आपण मान्यच केलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात पण हेच घडलं.

दुसरं म्हणजे, समाजातील इतर सर्व घटकांप्रमाणे डॉक्टरदेखील प्रलोभनांना बळी पडतो, याचा वापर करून फार्मा कंपन्या डॉक्टरांना भेटवस्तू, परदेशवा-या इ. गोष्टी ऑफर करू लागल्या. यात चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्सदेखील टीकेचे धनी होऊ लागले. अशा सभ्य डॉक्टरांना पण जेंव्हा समाजाकडून वाईट वागणूक मिळाली, तेव्हा त्यांचीही मानसिकता हळूहळू बदलायला लागली. एकूणच वैद्यकीय व्यवसायातील अनिष्ट गोष्टींची चर्चा सर्वत्र होऊ लागली आणि समाजाने सरसकटपणे वैद्यकीय व्यवसायावर भ्रष्टतेचे लेबल लावले. परंतु असे केल्याने आपण चांगल्या डॉक्टरांवर, चांगल्या पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणा-यांवर अन्याय करत आहोत, याचा विचार समाजाने केला नाही आणि पर्यायाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला.

त्यात चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरू झाल्यावर बातम्या शोधण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. बातमी मिळत नसेल तर ती 'घडवली' देखील जाऊ लागली. एखाद्या घटनेमागची पार्श्वभूमी लक्षात न घेता सनसनाटी निर्माण करण्यात येऊ लागली. पूर्वीच्या काळात आपल्याला छोटी आणि साधी घटना कळणे हे केवळ आपल्या पंचक्रोशीपुरतं मर्यादित होतं, आता हजार किलोमीटरवरच्या दूर खेड्यातल्या हॉस्पिटल मधल्या छोट्या छोट्या घटनांच्या बातम्यांनाही ब्रेकिंग व्हॅल्यू मिळू लागली, अन् वैद्यकीय क्षेत्रात अपप्रवृत्ती अचानक बोकाळल्याची आपल्याला जाणीव झाली. त्यातच गल्लाभरू पिक्चर्सनी, मालिकांनी आणि 'सत्यमेव जयते' सारख्या कार्यक्रमांनी अर्धवट बाजू दाखवत अल्प प्रमाणात असलेल्या अपप्रवृत्ती ह्याच कशा साऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे 'वास्तव' आहेत वगैरे, अशा तऱ्हेने पेश केल्या. टीआरपीसाठी डॉक्टरांविषयीची समाजाची मनं कलुषित केली. प्रत्येकाच्या मनात संशय निर्माण केला.

त्यामुळं डॉक्टरांच्या ट्रीटमेंट ने गुण येत नसेल तर आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीला दोष देण्याऐवजी किंवा मेडिकल सायन्सच्या मर्यादा लक्षात घेण्याऐवजी लोक डॉक्टरच्या हेतूवरच शंका घेऊ लागले..

आणि "डॉक्टर तुम्ही तुमचे प्रयत्न करा, बाकी आमचं नशीब" असा विश्वास आपल्या फॅमिली फिजिशियन वर दाखविणारी पिढी हळूहळू लुप्त होत गेली.

डॉक्टरांमधील काही जण जी बदमाशी करतात त्याला इंटेन्सीफाय करून, अख्खे मेडिकल फिल्डच कसे भ्रष्ट आहे, याचा समाजावर भडक मारा करून डॉक्टरांविरुद्ध "सामाजिक युद्धाची" परिस्थिती निर्माण करण्यात या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. आणि गेल्या आठ दहा वर्षापासून तर जास्तच परिस्थिती चिघळवणे चालू आहे.

डॉक्टर हा सुद्धा या समाजाचाच भाग आहे. समाजाची मानसिकता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी डॉक्टरांत पण प्रतिबिंबित होतातच. डॉक्टरांची नैतिकता घसरणे, दुष्प्रवृत्ती वाढीस लागणे हे त्याचंच फलित आहे. समाज मात्र यासाठी डॉक्टरांना एकतर्फी जबाबदार धरतो, आणि स्वतःच्या जबाबदारीतून अंग काढून घेतो. सरकार दरबारी कुठलीच कामं बिना पैसे देता होत नाहीत किंवा त्याला काहीही सबसिडाइज्ड मिळत नाही. अक्षरशः एकही परवानगी किंवा सर्टिफिकेट बिना पैसे देता मिळत नाही, टेबलावरचा कागद पण हालत नाही. उलट डॉक्टर म्हणलं की चार पैसे जास्तच मागतात पालिकेत. आणि वर, "तुम्हाला काय कमी आहे राव" असं दात काढून म्हणतात. तरीही डॉक्टरनी अशा सगळ्यांची न तक्रार करता "सेवा"च करायची, अन वृत्तीत सेवाभाव ठेवायचा अशी साऱ्या समाजाची अपेक्षा आहे.!

डॉक्टरला लुटारू म्हणणाऱ्यांनी स्वतःला खात्रीने सांगावं की त्यांनी कधीच कोणाला लुटले नाही. संधी मिळेल तिथे पैसे खाण्यापासून, भेसळ करण्यापर्यंत आणि काटा मारण्यापासून, नाही ते धंदे करण्यापर्यंत सगळी पापं करताना, फक्त डॉक्टरलाच 'लुटारू' म्हणण्याचा नैतिक अधिकार आपल्याला कसा उरतो याचा पण विचार करावा. बरं डॉक्टरला शिव्या देणाऱ्या बहुतांश लोकांना स्वतःच्या मुलांना मात्र डॉक्टरच करायचं असतं हे विशेष!! आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं वाटणाऱ्या कोणत्याही पालकानं सांगावं की, वाट्टेल ते करून, वाट्टेल ती फी भरून त्यांना मुलांना गोरगरिबांची सेवा करण्यासाठी डॉक्टर बनवायचंय, की रग्गड पैसा कमविण्यासाठी?

असो..

हे पहा, आपल्याला कितीही वाटत असलं, की वैद्यकीय क्षेत्राने 'सोज्वळ' असावे, पण त्या आपल्या वाटण्याला आता काहीच अर्थ नाहीये. सध्या समाजात असं एकही क्षेत्र नाही जे बाजारीकरणापासून अलिप्त राहिलंय. आपल्या डोळ्यांसमोर आपण गावातल्या गुरुजीं सोबतच शिक्षणाचंही बाजारीकरण होताना पाहिलंय, तसंच आता वैद्यकीय क्षेत्राचंही होतंय..

'पैसे कमावणे' हे काही गैर नाही, पण "किती कमवायचे?" हा ज्याच्या त्याच्या conscience चा भाग आहे.. बहुतांश डॉक्टर्सचे रुग्णांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असतात, त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना देखील असते. आपण जर त्याच्यासोबत (बिलाच्या बाबतीत किंवा ट्रीटमेंट च्या बाबतीत) अन्याय केला तर तो पेशंट आपल्याकडे पुन्हा येईल का, असा विचार देखील डॉक्टरच्या मनात असतो.. आणि आपल्या नावाबद्दल जवळजवळ सगळ्याच डॉक्टर्सना काळजी असते. हा त्यातल्या त्यात आशेचा किरण आहे.

आता दुसरा मुद्दा आहे कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा.. हॉस्पिटल ही डॉक्टरांचीच असतात हा जमाना गेलाय.. जसं हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही स्वतः आचारी असण्याची गरज नसते, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी देखील तुम्ही स्वतः डॉक्टर असण्याची गरज नसते. जेंव्हा मोठमोठ्या कॉर्पोरेट लॉबीनं आणि कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला, तेंव्हा त्यांना यात फक्त "प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेन्ट" दिसलं, त्यासाठी थोडा सेवाभावाचा दिखावा केला की झालं! कुठल्याच बड्या बड्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे सगळे फायनान्सर आणि मालक हे डॉक्टर नसतात. अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये बेड चार्जेस, ऑपरेशन चार्जेस, हेच मालकच ठरवतात. इतकंच नव्हे तर डॉक्टरांची फी देखील मॅनेजमेंटच ठरवते. त्यांची स्वतःची medico legal advisory देखील असते, वकिलांची फौज आणि बाऊन्सर्स देखील असतात. इतर पॉलिसी आणि प्रोटोकॉल देखील मॅनेजमेंटच्याच हातात असतात. अमुक आजाराला कोणत्या तपासण्या करायच्या आणि किती दिवसांच्या अंतराने किती वेळा करायच्या हे देखील त्या हॉस्पिटल मॅनेजमेंटने ठरवलेल्या प्रोटोकॉलचाच भाग असते. तिथं काम करणारा डॉक्टर जरी तिथं पेशंट म्हणून गेला, तरी त्याला रीतसर पैसे भरावेच लागतात आणि ट्रीटमेंटबाबतचे सगळे प्रोटोकॉल पाळावेच लागतात. सामान्य माणसाला वैद्यकीय परिभाषा कळत नसल्याने त्याची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते..

डॉक्टर-पेशंट मध्ये हरवत चाललेल्या संवादासोबतच पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे समाजाचे 'मेडिकल सायन्स' विषयीचे अज्ञान हा आहे. यावर सविस्तर लेख मी गेल्या वर्षी 'डॉक्टर्स डे' च्या निमित्ताने पोस्ट केला होता..

प्रत्येक औषधाला, प्रत्येक आजाराला, प्रत्येक मेडिकल प्रोसिजरला आणि प्रत्येक ऑपरेशनला कॉम्प्लिकेशन्स आहेत.. आणि ते कधीही होऊ शकतात.. बऱ्याचदा ते होणं डॉक्टरांच्या हातात नसतं.. (योग्य ती खबरदारी घेऊन सुद्धा).. याची बऱ्याच जणांना जाणीव नसते, डॉक्टरनी सांगून देखील तेवढा सिरियसनेस लोकांच्यात येत नाही. ट्रीटमेंटच्या मर्यादा लक्षात न घेता, केवळ उपचार स्वस्त मिळावा, डॉक्टर रात्रंदिवस उपलब्ध असावा, आणि हॉस्पिटलमध्ये नेलेला प्रत्येक रुग्ण चांगला होऊनच बाहेर पडावा, अशी अवास्तव आणि अवाजवी अपेक्षा घेऊन भारतीय समाज वागतो आहे. काहीजण तर आपण जणूकाही डॉक्टरांमुळेच आजारी पडलोय असंच बोलतात. आजार झाल्याची स्वतःची जबाबदारी कोणालाच नको असते. दारू पिऊन लिव्हर आणि काहीबाही खाऊन आतडं खराब झालं असलं तरी ऍडमिट झालं की लगेच फरक पडावा, किंवा डॉक्टरला हमखास यश यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळं दहा पंधरा दिवस आयसीयूत प्रयत्न करून देखील यश नाही मिळालं तर आपल्या शरीराला दोष देण्याऐवजी लोक 'ट्रिटमेंट फेल गेली' असंच म्हणतात. आपले 'पैसे वाया गेले' अशीच भावना असते. डॉक्टरांनी आपल्याला लुटलं असंच वाटत राहतं..

अलीकडच्या काळातील धकाधकीचे जीवन, त्यात आहार नीट नाही, व्यसनाधीनता, वाढतं प्रदूषण, भेसळ, कीटकनाशकांचं वाढतं प्रमाण, पुरेशा झोपेचा अभाव, वाहने चालविण्याची शिस्त नाही, उपचारासाठी वेगळे बजेट काढून ठेवण्याची अक्कल नाही, स्वतःला म्हातारपणाचे आर्थिक नियोजन करता येत नाही.. आणि मग छातीत दुखायला लागते, तेव्हा आयसीयुत दाखल होतात, आणि जिवंत बाहेर आल्यावर 'डॉक्टरने कसे लुटले' हे सांगत फिरतात. इतकंच काय, पण सांगितलेल्या लॅब टेस्ट नॉर्मल आल्या तर खूश होण्याऐवजी पैसे वाया गेल्याचं वाईट वाटणारे बरेच जण आहेत.. अशा एक ना अनेक गोष्टींमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे शंभर टक्के समाधान होणे अशक्य आहे..

या बाबतची जागृती खरंतर महाविद्यालयीन शिक्षणापासून व्हायला हवी. मुलांच्या हॉस्पिटलला शैक्षणिक सहली काढायला हव्यात..

१. तिथलं कामकाज कसं चालतं?

२. ट्रीटमेंट कशी असते?

३. डॉक्टर आणि स्टाफवर इमर्जन्सी कशी हाताळतात? त्यांच्यावर कसले कसले ताण असतात

४. तिथं मशिन्स कोणत्या कोणत्या असतात,

५. बिलिंग कसं असतं,

६. सगळी सिस्टीम कशी चालते.. हे पाहायला लावावं वाटतं..

... आणि निबंधाचे विषय पण "डॉक्टरसोबतचा एक दिवस", "आयसीयु ड्युटीची एक रात्र" किंवा "मी डिलिव्हरीला मदत केली तेंव्हा.." अशा प्रकारचे असायला हवेत..

तरच जनता वैद्यक साक्षर होईल..

- डॉ सचिन लांडगे.

भुलतज्ञ, अहमदनगर.

Updated : 6 July 2020 11:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top