"जान सानू ही मानसिकता एका व्यापक क्रोनॉलॉजीचा भाग, तुम्ही काय उखाडणार ते बोला?"- डॉ. नरेश शेजवळ
एखाद्या प्रदेशात तुम्ही कित्येक वर्ष राहता आणि तुम्हाला स्थानिक भाषा येत नाही असे सांगता तेव्हा एकत्र तुम्ही खोटं बोलता किंवा तुम्ही जाणीवपूर्वक द्वेष करून त्या भाषेला डावलत आहात अगदीच अपवादात्मक स्थितीत तुम्ही मानसिकरित्या पंगू असू शकता. मुंबईत हि कीड का आहे? आणि हे लोण पुण्यासारख्या ठिकाणीही का पसरू लागलं आहे? कोण आहेत हे लोक? याच्या खोलात गेलं कि जाणवतं की "मराठी बोलायचीच नाही, शिकायचीच नाही" असा अट्टाहास इतर प्रांतातील, खास करून शहरातील हिंदी- गुजराती भाषिक लोक जाणीवपूर्वक जोपासतात. आणि त्यांची नवी पिढी तर याबाबत फार आग्रही आहे कारण मराठी माणसाने "त्यांना भाषा शिकण्याची गरज" भासूच दिली नाही, हेच स्वानुभवातून सांगताहेत डॉ. नरेश शेजवळ ...
X
काल Prasanna Joshi यांनी "जान सानू प्रकरणावर" "माझा" वर संवाद घडवून आणला. खरं तर जान सानूचा मराठीद्वेष हा वैयक्तिक टिपण्णी नसून तो दीर्घकालीन व्यापक विकृत क्रोनॉलॉजीचा भाग आहे यात दुमत नाही. मराठीचा गौरवशाली इतिहास, अस्मिता आणि मराठी भूमीवर असणारं देशाचं आर्थिक केंद्र, हीच ती खदखद अमराठी बांधवांची. ती वेळोवेळी बाहेर पडते इतकंच. जान सानू च्या मातोश्री म्हणाल्या त्या मुंबईत ३५ वर्षांपासून राहत आहेत आणि तरीही त्यांना मराठी येत नाही हे खरे तर न पटण्यासारखं आहे. मराठीत बोललेच पाहिजे अशी मागणी आली की मग ती भाषिक दडपशाही, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वगैरे अंगाने जातं आणि मूळ दुखणं तसेच मागे राहते.
माझा वैयक्तिक अनुभव आहे की तुम्ही तुमची मातृभाषा बोलली जात नाही अशा प्रदेशात वर्षभर जरी राहिलात तर तेथील भाषा किमान व्यवहारापुरती नक्कीच येते. आणि पाच एक वर्ष काढली तर उत्तम बोलू शकता. माझे एमएस्सी बेंगळूरु ला झाले. तिथे कानडी भाषेसोबतच भारतातील जवळपास सर्वच भाषा प्रांतातील विद्यार्थी संस्थेत होते. तसेच इराण, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान येथीलही विद्यार्थी होते.
साधारपणे किमान इतर सर्व भारतीय भाषिक विद्यार्थी कानडी वर्षा दोन वर्षात उत्तम बोलत. दाक्षिणात्य चटकन शिकत. मी स्वतः रस घेऊन कानडी भाषा जाणीवपूर्वक शिकण्याचा प्रयत्न केला. Vishu Kalagi विश्वनाथ कालगी हा कानडी मित्र मला शुद्ध कसे बोलायचे ते शिकवी. माझ्याबरोबर असणारे सर्वच मराठी, उत्तरभारतीय, दक्षिणभारतीय इतकंच काय तर नेपाळी, काश्मिरी, बंगाली असे सर्वच मुले उत्तम कानडी समजत, बऱ्यापैकी बोलत. त्याचे व्यवहारात फायदे असतंच पण लोकल कनेक्ट वाढणे, सांस्कृतिक आदानप्रदान होणे यास मदत झाली. उत्तरेकडील काही मित्र मराठीत उत्तम शिव्या देत, पण त्याचाही कधी कुणाला राग येत नसे. दमदम च्या Indrajit Dey इंद्रजित डे कडून बंगाली समजली, कलकत्यास गेल्यावर घरी आग्रहाचे निमंत्रण आजही असते. आसामचा Prodip Deori प्रोदीप कडून काही असामी शिकलो. सर्व रेडियो चॅनल्स वर दिवसभर कानडी गाणी प्राधान्याने वाजतात आणि ऐकून तोंडपाठ होतात, आवडूही लागतात. काश्मीरच्या अनंतनागाच्या Kowsar Malik कौसर सोबत शेरोशायरी करणे, काश्मिरी संस्कृती समजून घेणे यामुळे "त्या लोकांबद्दल" (आपल्यालेखी) बरेच भ्रम दूर झाले. श्रीलन्केच्या Wasundara Divisekera Rajapaksa वसुंधरा दिवासेकरा या मैत्रिणीने मला सांगितले की सिंहला भाषेत लाडूला, "लडू" म्हणतात, दहा ला "दहाया" म्हणतात (थोडक्यात दहाया साठी हिंदी , संस्कृत किंवा कोणत्याही इतर दाक्षिणात्य भाषेत साधर्म्य असणारा शब्द नाही पण मराठीत तो आहे). या मुलीला बऱ्यापैकी मराठी समजत होती व पूर्ण हिंदी बोलताही येत होती.
गमतेची गोष्ट अशी कि नागपूरची गॅंग Abhishek Belsare अभिषेक बेलसरे, सुरेंद्र इर्पनवार हे पहिल्यापासून हिंदीतच बोलत असत (घरी मात्र आई वडील मराठीत बोलत आणि हे हिंदीत), आमच्यासोबत राहून उत्तम मराठीत बोलू लागले (ते ही महाराष्ट्रा बाहेर). दिवाळीला अभिषेकने घरी फोन करून चक्क मराठीत बोलत आईवडिलांना बुचकाळ्यात टाकले होते. बंगुळुरुच्या नागरभावी सर्कल (रिंगरोड) भागात आमचे वसतिगृह, शैक्षणिक संकुल होते. इथे ८० टक्क्यांहून अधिक किराणा व्यावसायिक राजस्थानी होते. आणि सर्व अस्खलित कानडीत बोलत. त्यांच्या कानातील ती बाळी, आणि दुकानातील देव देवता यांवरूनच काय ती त्यांची ओळख पटे. आजही आपल्याकडे खेडोपाडी, लहान शहरात व्यापार करणारे मारवाडी, जैन समाज हे ते कोण आहेत हे ओळखूही येणार नाहीत इतकं शुद्ध मराठी बोलतात. थोडक्यात आपण जिथे वर्षानुवर्षे राहतो ती आपली भाषा असलीच पाहिजे हे नैसर्गिक आहे.
महाराष्ट्रात ग्रामीण भागात डाळिंब, द्राक्ष पट्ट्यात कित्येक बांगलादेशी बागवान आहेत. ते नुसतंच मराठी नाही तर घाटावरच मराठी बोलतात. तेही दोन एक वर्षात. निष्कर्ष काढता येईल की एखाद्या संस्कृती , समाजाबाबत आदर प्रेम असेल तर त्यांची भाषा तुम्ही नक्कीच आत्मसात करता. किंवा अगदीच तसे नसेलही तरीही तुम्ही ती शिकता कारण तुम्हाला त्या प्रदेशात, भाषेत व्यवहार करायचा आहे.
सांगण्याचा प्रपन्च हाच, की एखाद्या प्रदेशात तुम्ही कित्येक वर्ष राहता आणि तुम्हाला स्थानिक भाषा येत नाही असे सांगता तेव्हा एकत्र तुम्ही खोटं बोलता किंवा तुम्ही जाणीवपूर्वक द्वेष करून त्या भाषेला डावलत आहात अगदीच अपवादात्मक स्थितीत तुम्ही मानसिकरित्या पंगू असू शकता. मुंबईत हि कीड का आहे? आणि हे लोण पुण्यासारख्या ठिकाणीही का पसरू लागलं आहे? कोण आहेत हे लोक? याच्या खोलात गेलं कि जाणवतं की "मराठी बोलायचीच नाही, शिकायचीच नाही" असा अट्टाहास इतर प्रांतातील, खास करून शहरातील हिंदी- गुजराती भाषिक लोक जाणीवपूर्वक जोपासतात. आणि त्यांची नवी पिढी तर याबाबत फार आग्रही आहे कारण मराठी माणसाने "त्यांना भाषा शिकण्याची गरज" भासूच दिली नाही.
मुबंईत रुईयाला २००९-२०१३ दरम्यान रिसर्च चे काम करत असताना, येता जाता मला रेल्वे फलाटावर, डब्यांतील सुचनांमध्यें चुकीची मराठी खटकत असे. त्याबाबत मात्र काही बोलले की मुंबईचे मित्र "तुम्ही पुणेरी" म्हणून टोमणे ऐकवत. Cancer Patient साठी डब्याची जी फलाटावर पाटी असते त्याचे सर्वत्र भाषांतर "कर्क रोगग्रस्त" आहे, म्हणजे चक्क "आजारी खेकड्यांसाठी" चा डबा झाला हो तो. पण आम्हाला ते चालून जाते. आणि मराठी भाषा "ही कशीही लिहली तरी चालते", त्यानंतर, "ती चुकीची चालते म्हणजे तिची तशीही काही उपयोगिता नसावी" असा समज रुजू करायला योगदान हे माझ्यासकट सर्व मराठी भाषिकांचे नाही काय? याबाबत तक्रार करायची असे मी DrNitin Ghadge या मित्रास चार वर्षे, रोज रात्री सुनावत असे पण त्याबद्दल माझी निष्क्रियता आज प्रकर्षाने खटकत आहे.
२०१६ ला सप महाविद्यालयात सहा. प्राध्यापक म्हणून रुजू झालो तेव्हा टिळकरोडच्या "महाराष्ट्र बँकेत" पगारासाठी खाते उघडायला सांगितले. तिथे असणारा अधिकारी माझ्याशी हिंदीतच बोलत होता, आणि माझ्या प्रश्नांना त्याने "मराठी आता नहीं " असे बिनदिक्कत उत्तर दिले. २०१८ मध्ये पुण्यातील औंध मध्ये एका कोवर्किंग स्पेस मध्ये माझे कार्यालय वर्षभर होते. तेथील मालक गुजराती होते. तिथे येणारी वर्तमानपत्रे ही इंग्रजी, हिंदी व चक्क गुजराती होती. मी एकदा त्याबाबत विचारणा केली व मराठी वृत्तपत्र असायला हवेच हा आग्रह केला तर ते म्हणाले मराठी वृत्तपत्राची गरजच काय?
"ग्राहक सेवा" अधिकाऱ्यांशी रोज किती वेळा भांडून मराठीचा आग्रह करायचा? किती कंपन्यांना "तुमचे उत्पादन घेणार नाही असे बजावायचे?" आता तर ते चक्क म्हणतात, "महाराष्ट्रामें होकर हिंदी आती नहीं ऐसा कैसे हो सकता है सर? बापरे...... काय वेळ आणली आहे ही आपण स्वतःवर. प्रसन्न जोशींच्या आजच्या कार्यक्रमात उड्या मारून बोलणाऱ्या मनसे ने त्यांचं ग्राहक सेवा कर्मचाऱयांसाठीचे अवलंबविलेले "मराठी प्राधान्य धोरण" आणि "संबंध प. मुंबईत लागलेल्या गुजराती पाट्यांचा" मुद्दा तडजोड करून मिटवलाय का? शिवसेनेनं वरळीत "केम छो वरली" चा प्रचार फलक लावून स्वतःहून मुंबई मराठी लोकांची नाही हे मान्य केलंय? भाजपने मुंबईची बदनामी करणाऱ्या भाडोत्री छपरी अभिनेत्रीला दिलेलं प्रोत्साहन, काय शिकवते? राजकारणी लोकांवर विसंबून हा प्रश्न सुटणार नाही. तर कोट्यावधी मराठी भाषिकांना हे काम हाती घ्यावी लागेल तेव्हा कुठे दशक दोन दशक भरात बदल दिसून येईल.
माझ्या अमराठी मित्र मैत्रणीना माझं मराठी प्रेम का खुपत हे कळत नाही. पण मराठी न येणं हे आता माझ्या लेखी इतकं "सरळ गणित नाही" आणि त्यामागे मराठीबाबतचा, महाराष्ट्रासाठीचा पराकोटीचा द्वेष मला स्पष्ट दिसतो. चित्रपट तारे तारका, त्यांची मुले पंचवीस पन्नास वर्षे मुबंईत राहून कधीतरी टाळ्या घेण्यासाठी एखादा शब्द, वाक्य मराठीत बोलतात, आणि आपण त्याचे कौतुक करून टाळ्या वाजवतो. खरेतर मुस्काटात मारायला हवी त्यांच्या. आमिरची बायको मराठी, पन्नास वर्षे तो मुंबईत वाढला आहे, मराठी न येणं केवळ अशक्य आहे. काजोल उत्तम मराठी बोलते, अजय देवगण ला येत नाही. इतरही कुणी असो. हे येत नाही नसून "आम्हाला बोलायचंच नाही" असे आहे. "ते का बोलायचं नाही" हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसणारे आहे का? हे बुद्धिजीवींनी तपासून पहावे.
मराठीभाषेचा द्वेष करणारी विकृती फोफावणे, हे पातक मराठीला महाराष्ट्रातच "पर्याय" देणाऱ्या मराठी भाषिकांचे आहे. मराठी माध्यमात शिकविणे कमी पणाचे वाटणे हे पातक नव्या पिढीतील मराठी पालकांचे. मुंबईत तर नवीन पिढीत मराठी नीटसे बोलता न येणं हे "स्टेट्स" म्हणून मिरवायला लागली आहेत पोरं, मित्रमंध्ये मराठीत बोलणेही टाळतात. तुम्ही "वांद्रे" ला "बांद्रा" का बोलता? शिव ला "सायन" का बोलता? मग तुमच्या नाकावर टिच्चून सर्वच सेलिब्रेटी मुंबईला "बॉंबे" म्हणता तेव्हा ते पातक तुमचं आहे हे का विसरता?
नव्याने वाढलेल्या "मुंबई/ नवी मुंबईत" तर व्यवहारात, शैक्षणिक संस्थांमध्ये, कार्यालयांत मराठी पूर्णतः हद्दपार आहे. सरकारी कामकाजात मराठी नाही. सार्वजनिक आस्थापनांमध्ये मराठी नाही. कर्मचारी, अधिकारी मराठीत बोलतच नाहीत. रुजू होण्यापूर्वी स्थानिक भाषा आत्मसात करण्याचा नियम महाराष्ट्रात गैरलागू आहे का? बँकांतील कागदपत्रे इंग्रजी आणि हिंदीतच असतात. मला तर ती पुस्तकी हिंदी अजूनही कळत नाही. माझ्या राज्यात मी मराठीचा आग्रह करायचा नाही तर कुठे करायचा? बरं माझी भाषा तांत्रिकदृष्ट्या दुबळी, अगदीच अलिकडल्या काळातील, कमी बोलली जाणारी, किचकट असली असे काही बाही असतं तर कदाचित एवढा त्रागा नसता. पण माझी भाषा प्राचीनतम भाषांपैकी एक, जगात १५ वि सर्वाधिक संख्येने बोलली जाणारी. देशावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या व्यवहाराची भाषा, हजारो वर्षापासुन साहित्य, लेखन पुरावे असणारी भाषा. खरेतर "राष्ट्रभाषा" होण्यास पूर्णपणे योग्य, सक्षम, लायक असणारी आणि शिकण्यास सहज सोपी अशी भाषा, तिचा आग्रह करूच नये असे पदोपदी मूकपणे राजरोस सुचवणारी हि व्यवस्था का आणि कुणाच्या सांगण्यावरून उदयास आली? ही व्यवस्था मग हिडीस रूप दाखवते आणि मराठी कलाकार, कामगारांना काम न मिळणे, कर्मचारी भरती करताना "जाणीवपूर्वक अमराठी" कर्मचारी कामावर घेण्याचे धोरण राबविणे. आणि हे इतकं अंगवळणी पडत चाललं आहे , कि चक्क लोक तशा छापील जाहिराती देतात, म्हणजे आता या सर्वाचा कडेलोट झालाय की. मराठी नेत्यांनाही दिल्लीत शिरकाव का करू दिला जात नाही हेही ओघानं आलंच.
स्थानिक भाषेचा आग्रह हवाच, आणि व्यवहारातही वापर हवा. हिंदी ही इतर राजभाषा पैकी एक असल्याने मराठी भाषेला ती पर्याय म्हणून थोपवणे हे भाषिक गळचेपी करणारे होईल. आणि ते अन्याय्यकारक आहे. कारण व्यवहारात एखादी भाषा मागे सारली जाते तेव्हा त्या भाषेला संपविण्याचे कार्य सुरु होते. त्या भाषेच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्या वर्गाची "अर्थार्जनाची" संधी जाते. आणि एकदा का ती भाषा "पोटापाण्यासाठी" कुचकामी ठरली तर त्या भाषेला अडगळीत टाकले जाते मराठी भाषा "अमृत" आहे वगैरे हाकाटी पिटणाऱ्या हुशार लोकांनी समजून घ्यावं "आता प्रकरण सुपातून जात्यात आलं आहे"
हिंदी भाषा सोयीची हे धोरण ठरवले कुणी? उत्पादनांची लेबले स्थानिक जनतेच्या बोलीभाषेत नसावीत तर "हिंदी इंग्रजीत" असावीत हे कुणी ठरविले? याबात मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या अनुषंगाने काही प्रकरणे सांगतात की लेबले, माहितीपत्रके, दस्त, हिंदी-इंग्रजीतच हवे असेही काही नाही, पण याबाबत हिंदी ला जाणीवपूर्वक झुकते माप दिले आहे. भारतात केवळ एफएमसीजी उत्पादने बनवणाऱ्या ३५ हजार उद्योग आहेत. म्हणजे किमान काही लाख उत्पादने आणि त्यांची माहिती दिली जाते. सेवा क्षेत्रात उत्पादनाची माहिती, युजर मॅन्युअल्स याबाबत लक्षावधी विविध दस्त तयार होतात. गम्मत म्हणजे मराठी ग्राहकास ती भाषा कळों न कळो पण त्याला त्या उत्पादन, सेवांचा वापर तशाच रीतीने करायचा आहे.
- २०१७ साली हिंदू मध्ये प्रकाशित एका लेखात बराच खल केला आहे.
- रिजर्व बँक सांगते कि ग्राहक सेवा स्थानिक भाषेत असावी. मात्र चेकबुक, बँकेचे दस्त हे इंग्रजी-हिंदीतच असावेत. हिंदीला झुकते माप हे ग्राहकांवर अन्याय करणारे धोरण आहे.
- केवळ महाराष्ट्रात आपण सर्वत्र लिखित माहितीमध्ये मराठीचा अंतर्भाव अनिवार्य केला तर कंपन्यांना लाखोंच्या संख्येने मराठी भाषेत लिखाण करणारी, भाषांतर करणारी, तांत्रिक माहिती असणारी प्रचंड मोठी कर्मचाऱ्यांची फौज लागेल. किमान काही लाख रोजगार नव्याने तयार होतील. आणि मराठी भाषा हा एक करियर चॉईस म्हणून पहिला जाईल. मराठी विभागांमध्ये ऍडमिशन साठी मेरिट लिस्ट्स लागतील. सर्वोत्तम गुणवत्ता असणारा युवा वर्ग या भाषेकडे आकर्षित होईल, त्यातूनच पुढे दर्जेदार साहित्य, कथा, कॉपीराईट मटेरियल लिहणारे पुढे येतील आणि भाषा समृद्ध होण्यासोबतच त्या भाषेचा व्यवहारातील आवाका वाढल्याने तिचा, महाराष्ट्राचा द्वेष करणारी व्यवस्था आपोआप उन्मळून पडेल.
- तामिळनाडूचा अझाई सेंथिल याला हाच प्रश्न पडला. तो इंग्रजीचे तामिळ भाषेत भाषांतर करून उत्पादनाची माहितीपुस्तिका, लेबल्स बनवतो. तेही सिंगापूर, मलेशिया, श्रीलन्केतील संस्थांसाठी. थोडक्यात तामिळचा आग्रह असणारे कुठेही जगभरात असोत, त्याचा लाभ हा त्या भाषेत सेवा पुरविणाऱ्या सेंथिल ला होतोय. मात्र त्याच्याच तामिळनाडू मध्ये त्याच्या या कौशल्याला ग्राहक नाही. कारण तामिळ भाषेची गरज बऱ्याच सरकारी व्यवहारात नाही. आता सेंथिल याबाबत एक चळवळ चालवतो. CLEAR या नावाने. तो तामिळी भाषेच्या वापराबाबत आग्रही आहे त्याचसोबत हा न्याय सर्व २२ भाषांना मिळावा यासाठी लढतो आहे. तामिळी लोकांचा हिंदी बाबत "नकार" कुठून आणि कसा आला हे इथे समजून घेता येईल. (आणि माझे पूर्ण समर्थन आहे उघडपणे सांगावेसे वाटते.)
- १९४५ चा औषधे आणि प्रसाधने कायदा सांगतो कि सर्व सुरक्षा माहिती, एक्स्पायरी डेट माहिती इंग्रजीत असावी, इतर माहिती लिह्ण्याबाबत उत्पादकांना स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रात खपणार प्रत्येक उत्पादन आणि सेवा यात मराठी अनिवार्य केल्याने वर सांगितल्याप्रमाणे मराठी हि उदरभरणाची भाषा होऊ शकेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने रोज झेंडे नाचवतो तेव्हा, त्यांनी जाणीवपूर्वक मराठी भाषेला कामकाजात का व कसे आणले हे आपणास समजेल तोच सुदिन.
- २०१६ साली अशा प्रकारचे भाषिक धोरण ठरविण्याबाबत केंद्राने २० भाषातज्ज्ञांची एक कमिटी बनविली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार उत्पादने, सेवा यांमध्ये चार भाषांचा वापर व्हावा. हिंदी, इंग्रजी, राज्याची भाषा (मराठी) आणि राज्य समूहाची स्थानिक भाषा. सदर अहवाल तसाच पडून आहे आणि स्थानिक भाषिकांवर अन्याय होतोय.
मराठीचे उत्थान होण्यासाठी तिची उपयोगिता वाढवायला हवी. त्यासाठी आपणा कोट्यावधी मराठी भाषिकांचा आग्रह हवा. आणि त्यासाठी राज्यकर्त्यांच्या मागे लागून ते घडवून आणावे लागेल. राज्यात काम करणारे, सेवा देणारे, उत्पादने विकणारे सर्वाना मराठी हि अधिक सोयीची व फायद्याची भासावी असे चित्र तयार झाले तर सर्वच प्रश्न निकाली निघतील. मराठी माणसाचा आत्मविश्वास किती उंचावेल याची फक्त एकदा कल्पना करून तर पहा. मग काय बिशाद कुणाला मराठीबाबत द्वेषाची भाषा करायची, आणि काय बिशाद कुणा दीड दमडीच्या भाडोत्री अभिनेत्रीची, मुंबईला "पाकव्याप्त काश्मीर" अशी उपमा द्यायची. आपल्या भाषेची गळचेपी म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्त्वाचा विनाश हे मनी ठसू द्या. तिच्या संवर्धनासाठी तुम्ही लढलात तर आणि तरच ते होईल. आजवर काही उखाडले नाही मग आता कधी उखाडणार रे मराठी माणसा????