Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठा आरक्षण आणि विषारी भाषा

मराठा आरक्षण आणि विषारी भाषा

कोण करतंय मराठा समाजातील तरुणांमध्ये विषाची पेरणी? तरुणांमध्ये नैराश्य का निर्माण होतंय? नेत्यांनो मतांची पोतडी भरण्यासाठी तरुणांना भडकावणं बंद करा... वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा प्रेरणादायी लेख

मराठा आरक्षण आणि विषारी भाषा
X

'मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर विष पिऊन मरू द्या', अशी निर्वाणीची भाषा एका नेत्याने नुकतीच केली आहे. 'आरक्षणाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला नाही, तर मराठा समाजातील तरुण वेगळं पाऊल उचलू शकतात', असं म्हणत या नेत्यानं विष पिण्याची भाषा केली आहे. हे नेते रोज काय पिऊन जगतात, हे जगजाहीर आहे. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे. त्यासाठी संविधानिक मार्गाने लढायलाही हवे. पण, नेत्यांच्या या अशा विषारी भाषेचा परिणाम तरूण मुला-मुलींनी स्वतःवर होऊ देऊ नये. आपल्या भावविश्वावर होऊ देऊ नये.

मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा. जगात काहीही झालं, तरी जगणं महत्त्वाचं. परवा परभणीच्या शुभम ऊगले या वीस वर्षांच्या पोरानं 'कोरोनानंतर आपलं कसं होणार', या चिंतेतून आत्महत्या केलीय. शुभम एकटाच नाही. असे अनेक चिंताग्रस्त तरूण आहेत. तरूण मुलं आधीच कावरीबावरी झालीत. त्यांना बळ द्यायला हवं. राजकीय फायद्यासाठी या मुलांना भडकवणं आणि असा आततायी विचार त्यांच्या मनात पेरणं, हा अपराध आहे.

सगळ्याच पक्षांनी हे लक्षात घ्यायला हवं. आरक्षण मिळाल्यानं काही फार मोठी क्रांती होणार नाही. आणि, न मिळाल्यानं विष प्यायची वगैरे पाळी येणार नाही, हे या मुला-मुलींना नीट पटवून द्यायला हवं. जात-धर्म-लिंग हा मुद्दा नाही, कोरोनानंतर एकूणच सगळे हळवे झालेत. तरूण तर फारच. घरा-घरात निराशा मुक्कामाला आलीय. होत्याचं नव्हतं होतंय. नोकरी गेली. जवळची माणसं गेली. नाती संपली. तरी कोरोना संपायला तयार नाही. काळ खरंच खूप कठीण आहे.

आधीच मानसिक ताण भयंकर वाढलेले. अवघे जग असे शतखंडित आणि भंजाळलेले. त्यात नोटाबंदी. मग कोरोना. बेरोजगारी. भयंकर महागाई. जगणं अवघड झालंय. लोकांच्या जगण्याला बळ देणं कोणत्याही राजकीय पक्षाला आणि नेत्याला शक्य नाही. त्यांची ती पात्रता नाही. पण, किमान मरणाच्या वाटेवर तरी लोकांना ढकलू नका. आणि, तुम्ही तरी कशाला त्यांच्या राजकारणाला बळी पडता, लोक हो? ज्यानं चोच दिली, तो चाराही देत असतोय.

थोडं इकडं तिकडं शोधत राहा. स्वतःवरचा विश्वास कायम असू द्या. मन-मेंदू-मनगटासह संकटाला भिडा. कसल्या-कसल्या कठीण परिस्थितीवर धीरानं मात करत माणसं जगताहेत, हे जरा आजूबाजूला पाहा. आणि, आनंदानं जगायला फार काही लागत नाही, हेही लक्षात ठेवा. अरे, अशा खूप मोठमोठ्या संकटांना, आपत्तींना तोंड देत 'माणूस' नावाची जात इथंवर पोहोचली आहे. भयंकर चिवट आहे ती. या जातीवर विश्वास ठेवा. सारं ठीक होईल.

- संजय आवटे यांच्या फेसबूकवरून साभार

Updated : 12 March 2021 9:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top