द ब्रीफ एन्काउंटर पाहून अनेकांना “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी” आठवला असणार
Max Maharashtra | 5 Dec 2018 12:49 PM IST
X
X
द ब्रीफ एन्काउंटर पाहून अनेकांना “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी” या दोन सिनेमांच्या प्रदर्शनात पन्नास वर्षाचे अंतर आहे. म्हणजे दोन पिढ्यांचे अंतर. द ब्रीफ एन्काउंटर १९४५ मध्ये रिलीज झाला. पंचेचाळीसच्या कालखंडात ब्रिटन सुद्धा सोवळे होते. नैतिकता, योनिशुचिता आणि त्याहीपेक्षा संसाराशी असलेली बांधिलकी या गोष्टी वादातीत होत्या. मनाने जवळ येऊनही नायक आणि नायिका शरीराने जवळ न येण्याचे ते एक महत्वाचे कारण होते.
स्त्री मुक्तीच्या कल्पनांशी नायिकेचा परिचय नाही. प्रतारणा करणे तिच्यासाठी गुन्हा आहे. शरमेची गोष्ट सुद्धा. शरीराची भूक असते, शारीरिक संबंध ती भूक भागवते असा व्यवहारिक विचार तेव्हा तरी रुजला नव्हता. लग्न, त्याचे पावित्र्य आणि शारीरिक संबंध यांचे घट्ट लागे-बांधे असतात ही कल्पना तेव्हा समाजात ठाम रुजली होती. त्याला प्रतिष्ठा होती.
लग्नबंधनाशिवाय राहणारी स्त्री म्हणजे रखेल किंवा चरित्रहीन स्त्री. त्यात नायिका ही चांगल्या, सुसंकृत घरातील गृहिणी आहे. ही गोष्ट तेव्हा तिला मानवणे शक्यच नव्हते. या रूढी परंपरा, संस्कार याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची तिची कुवत नाही आणि मानसिक तयारी सुद्धा नाही. प्रेमाच्या धुंदीत जरी ही गोष्ट घडलीही असती तरीही अपराधीपणा आणि लाज या खाली ती स्वतः दबून गेली असती. जो निर्णय ती घेते, तो केवळ तिच्या संसारासाठी नाही , तिच्या स्वतःसाठी सुद्धा आहे. तिच्या मर्यादा तिने ओळखून घेतलेला तो निर्णय आहे.
या नंतर पन्नास वर्षांनी रिलीज झालेल्या “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी” मधली नायिका पंचेचाळीस वर्षाची आहे. स्त्री मुक्ती, तिच्या स्वतंत्र अशा आणि आकांक्षा यांच्याशी परिचित आहे. संसारात आता आपल्याला तसा रस नाही आणि तो का नाही याची तिला पूर्ण जाणीव आहे.
ती म्हणते,
"When a woman makes the choice to marry, to have children; in one way her life begins but in another way it stops. You build a life of details. You become a mother, a wife and you stop and stay steady so that your children can move. And when they leave they take your life of details with them. And then you're expected move again only you don't remember what moves you because no-one has asked in so long. Not even yourself."
लग्न झाल्यानंतर बाईचे आयुष्य एका चक्रात फिरते. मुले, संसार, नवरा. त्याचे घर, त्याचे नाव आणि त्यामुळे मिळालेली ओळख. त्यात तिलाही आनंद वाटतो, मनापासून स्वतःला बाजूला ठेवून ती त्यांच्या आयुष्याला आकार देते आणि मग मुले पुढे सरकतात. तिच्या आयुष्यातून स्वतःला अलगद बाजूला काढतात आणि नंतर लक्षात येते, आयुष्य रिकामे झालेय. स्वतःची ओळख निर्माण करणे यात राहूनच गेले असते आणि मग अनोळखी आयुष्य जगणे जमत नाही. सवयच नसते. ती हरवून बसते स्वतःला. आणि यात जर तिला तिचा सूर मिळवून देणारा कुणी भेटला किंवा मी म्हणेन, एखादी नवीन करिअर तर आयुष्याचा केंद्रबिंदू बदलायला वेळ लागत नाही.
या दोन्ही सिनेमाचे कथा सूत्र तेच. नीरस कंटाळवाण्या आयुष्याच्या मध्यान्हीला दोन अनोळखी माणसे अपघाताने भेटतात आणि प्रेमात पडतात.
ही कथा आहे फ्रान्सेस्का नावाच्या एका इटालियन स्त्रीची. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या शेवटी ती रिचर्ड जॉन्सनला नेपल्स मध्ये भेटते. हा अमेरिकन तरुण एक सैनिक असतो. त्यांचे प्रेम जमते. इटली सोडून ती त्याच्याबरोबर अमेरिकेला जाते. ते लग्न करतात. मॅडिसन कौंटीला स्थायिक होतात. दोन मुले होतात. चारचौघांसारखा रिचर्ड सुद्धा एक कष्टाळू , प्रामाणिक, जबाबदार पती आणि पिता असतो. मुले मोठी होऊन लग्न करून निघून जातात. घरटे रिकामे होते. आई वडील एकत्र राहून त्या फार्मवरच शेवटचा श्वास घेतात. निदान त्यांच्या मुलांना तरी आपल्या आईची हीच ओळख असते.
मायकेल आणि कॅरोलिन, आपल्या आईच्या, फ्रान्सेस्काच्या मृत्यूनंतर, तिच्या अंत्यविधीसाठी, गावाकडे परततात. तिच्या सामानात त्यांना तिचे मृत्युपत्र सापडते. आपल्या मृत्यनंतर, आपले दहन केले जावे आणि आपल्या अस्थी रोजमन कव्हर्ड ब्रिज कडे विसर्जित कराव्या अशी तिच्या इच्छा असते. खरेतर गावाच्या कबरीस्थानात त्यांच्या वडिलांची कबर असते. त्यांच्या शेजारीच आईचे दफन करणे योग्य असे मुलाला वाटते. दहन करण्यास त्याचा विरोध आहे. आईच्या सामानात तिच्या डायऱ्या मिळतात. कॅमेरा, काही फोटो आणि रॉबर्ट बरोबर घालवलेल्या चार दिवसांच्या आठवणी.
पंचेचाळीस वर्षाची गृहिणी आणि बावन्न वर्षाचा फोटोग्राफर. त्यांची अचानक झालेली भेट, आकर्षण, प्रेम, त्यातून झालेली शारीरिक जवळीक. .….एक आयुष्य पूर्ण जगल्यानंतर आलेली जाग की मी दुसऱ्याचेच आयुष्य जगत होते आणि आता जे काही घडते आहे तेच सत्य आहे. रॉबर्ट च्या शब्दात सांगायचे तर , "This kind of certainty comes but just once in a lifetime." उशिरा आलेली ही वेळ आणि उशिरा झालेला हा एहसास ….
कळीचे फुल होणे हीच इतश्री असते ?
दोन मने एकत्र येतात, परिणती विवाहात होते आणि त्याची सांगता आई होण्यात … नंतर तिचे आयुष्य बांधले जाते पत्नी आणि आई होण्यात. शरीरे एकत्र येणे हे ही नंतर एक गरजेचा भाग होतो. रुटीन ज्याचा उद्देश असतो नाते बांधून ठेवणे. आपापल्या व्यापात पूर्णतः गुंतून गेल्यावर या रुटीनचीही सवय होऊन जाते. बांधिलकी असते, विश्वास असतो, प्रेमही असते पण रोमान्स हरवतो. जेव्हा तो हरवतो तेव्हा माणसे संभोग करतात… त्याला मिलन म्हणता येत नाही .
खरच मिलनाचा अर्थ या शारीरिक भुकेतून समजतो तरी का? बरीच जोडपी याचा विचार करण्याइतपत प्रगल्भ असतात ? आणि असली तरी स्वतंत्र असतात ?
विचारात, आचारात कसलेही साम्य नसलेली दोघे एकत्र राहतात… स्वत:च्या आवडी विसरुन, बदलून, प्रसंगी दुसऱ्यावर लादून … एक दुहेरी आयुष्य जगत. संसार चालू राहतो. या अपूर्णतेची जाणीव झाली नाही तर समाधानाच्या आभासात आयुष्य सरते आणि झाली तर; समजून उमजून केलं.
प्रिया प्रभुदेसाई
Updated : 5 Dec 2018 12:49 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire