ठाकरेंशिवाय शिवसेना आणि राजकारण अशक्य : अॅड. विवेक ठाकरे
भलेही ठाकरेंशी कोणाचे कितीही वैचारिक मतभेद असतील, मात्र ठाकरे घराणे टिकणे ही महाराष्ट्राची राजकीय गरज आहे. गेली पाच दशके ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड होता आणि आहे. त्यामुळे हा ब्रँड संपवण्यासाठीच उद्धव ठाकरेंना आणि पर्यायाने ठाकरेंना पक्ष फोडल्यानंतरही संपूर्ण नेस्तनाभूत करण्याचे मोदीशहांचे मनसूबे आहेत. पक्ष- चिन्ह काढून घेणे हा त्याच मनसुब्यांचा एक भाग आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात भाजपच्या सुनामीला रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त ठाकरेंमध्येच आहे... सांगताहेत अॅड विवेक ठाकरे..
X
आजपर्यंत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही इतके टोकाचे खुनशी राजकारण कधीच झाले नव्हते. प्रत्येक पक्ष कायम आपापली स्पेस वाढवण्याचा आणि आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र शिवसेनेचाच हात धरून महाराष्ट्रात मोठ्या झालेल्या भाजपाने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून ठाकरे कुटुंबाला मुळासकट उखडण्याची चूक केली आहे. अगदी पारंपारिक कट्टर विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसनेही आणीबाणीच्या काळात शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. भाजपाने शिवसेनेचे केवळ घरच फोडले नाही तर शिवसेना नावाच्या कुटुंबातून ठाकरेंनाच बेदखल करण्याचे महापाप केले आहे.
सुसंस्कृततेचे राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला कुणाचे घर फोडलेले किंवा स्वत:च्याच घरातून ठाकरे कुटुंबाला बेदखल केलेले आवडलेले नाही. येत्या निवडणुकीत याची जबर किंमत भाजपाला मोजावी लागू शकते. शेवटी काळाच्या गर्भातच या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.
आपल्या बरोबर आलेल्या देशभरातील सर्वच लहान - मोठ्या राजकीय पक्षांना संपवण्याचे प्रयत्न भाजपाने केले. म्हणूनच एनडीएतून बहुतांश मित्रपक्ष बाहेर पाडले आहेत. जेव्हा भाजपा शिवसेनेचेही अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय हे उद्धव ठाकरेंना लक्षात आले तेव्हा त्यांनी वेळीच राजकीय शहाणपणा करत भाजपापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि कणखरपणा दाखवत भाजपाशी उघड राजकीय लढाई स्विकारली. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी केवळ पक्ष सांभाळलाच नाही तर वाढवलाही. मात्र हीच गोष्ट अनेकांना खटकत होती, तर भाजपाला उद्धव ठाकरेंमुळे आपल्या मनसूब्यांवर पाणी फिरतेय ही बाब खदखदत होती.
राजकारणात प्रत्येक पक्षाला स्वतंत्र अस्तित्व असते आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र असते. इतर पक्षांचे अस्तित्व मान्य नसणाऱ्या व सुडाने पेटलेल्या भाजपाने मात्र आपल्या दरबारात शिवसेना फोडीची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली. पक्ष फोडण्याच्या संपूर्ण घटनाक्रमात भाजपा डायरेक्टर तर एकनाथ शिंदे फक्त अँक्टर आहेत. त्यामुळे जरी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे त्यांच्याकडे असला तरी आता व भविष्यातही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि बार्गेनिंग पॉवर त्यांना असणार नाही. पक्ष म्हणून भाजपाच्या नजरेत शिवसेनेचे अस्तित्व आता शून्य झालेले आहे. भविष्यात फक्त उद्धव ठाकरेंविरुद्ध लढण्यासाठीच आणि मराठी मतांचे विभाजन करण्यासाठीच शिवसेना पक्षाचा वापर होऊ शकतो. भाजपाच्या कमळात आणि कळपात सामावल्याने शिवसेना नावाची शक्ती आता संपुष्टात आली आहे.