Home > मॅक्स ब्लॉग्ज > "शिवसैनिक कडवे तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले थंड नी निष्क्रिय का?"

"शिवसैनिक कडवे तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले थंड नी निष्क्रिय का?"

राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष राज्यभरात पहायला मिळतो आहे. पण या सर्व गदारोळात भाजपच्या घटनाविरोधी कृत्यांचा निषेध करणाऱ्या गैरराजकीय व्यक्तींना विरोधकांचा हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याची खंत प्रा. हरि नरके यांनी व्यक्त केली आहे.

शिवसैनिक कडवे तर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले थंड नी निष्क्रिय का?
X

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. सर्वच पक्षात मित्र आहेत. एक अभ्यासक या नात्याने राजकारणाचा वेध घेण्याचा छंद आहे. माझ्या प्रागतिक, लोकशाहीवादी भूमिका काँग्रेस - राष्ट्रवादीला झुकते माप देतात, मी भाजप विरोधी आहे असा आरोप होतो. माझ्या मांडणीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. पण माझा हेतू तो नाही. मी संविधान वैऱ्यांचा विरोध करतो, करणार. त्यामुळे जे जे भाजपविरोधी आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल तर तो समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, सर्वधर्म समभाव, लोकशाही यांच्याबद्दलचा आहे. राजकीय पक्षांसाठी नाही.

गंमत अशीय की मी जेव्हा वाहिन्यांवर बोलतो किंवा वृत्तपत्रात लिहितो (ओबीसी आरक्षण - श्रेय वादाची धुळवड, रविवार सकाळ, सप्तरंग, मुखपृष्ठ कथा ) तेव्हा काँग्रेस वा राष्ट्रवादीचे काळे कुत्रेसुद्धा प्रतिक्रिया देत नाही. ते इतके थंड, निष्क्रिय नी मुर्दाड आहेत की ते राजकीय दृष्ट्या जिवंत तरी आहेत का हा प्रश्न मला वारंवार पडतो.

ती केवळ निवडणूक यंत्रणा, यंत्र आणि तंत्रं आहेत. सत्तेची मस्ती, सुस्ती आणि हाडीमासी भिनलेली मग्रुरी यामुळे हे लोक कायम परग्रहावर असतात. ते संवेदना हरवलेले लोक आहेत. अत्यंत विचारशून्य. मात्र ज्यांच्याविरुद्ध मी लिहितो ती श्वापद अंगावर येतात. शिव्याशाप, हेत्वारोप करतात. त्यात पाकीट मिळाल्याचा आरोप ते शंभरातले ९९ करतात. जे काँग्रेस,राष्ट्रवादी वाले मुखदुर्बळलोक फुकटची प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत ते पाकीट सोडा साधा चहासुद्धा विचारत नसतात. अर्थात त्यासाठी मी लिहीत नाहीच.

पण हे बोलणे, लिहिणे म्हणजे जोखीम स्वीकारणे. मी का करतो हे? तर स्वत:ला वाटते,पटते. म्हणून. मात्र शिवसैनिक कडवे आहेत. लढाऊ, संवेदनशील आहेत. फेसबुक, ट्विटरवर प्रतिक्रिया देतात. ट्रोलना अंगावर घेतात. अशांसाठी लढायला उमेद येते.

मी गेली ४५ वर्षे पुरोगाम्यां साठी लढतो, बोलतो. पण त्यातले बरेच म्हातारे झालेत, थकलेत, थंड पडलेत. आजारी असतात. बहुतांश कायम नामानिराळे राहतात. त्यांनाही कातडी बचावूपणाचा संसर्ग झालाय का? (अपवाद आहेत..असतात.)

माझे आवडीचे विषय अभिजात मराठी, सामाजिक न्याय, ओबीसी, भटके, संविधान, फुले, शाहू, आंबेडकर, गांधी.... यात ना काँग्रेस, ना राष्ट्रवादीना रस. परिणामी संपूर्ण गारठा वाट्याला येतो. संघ, भाजप मात्र डूख धरून हल्ले करतो. अशावेळी स्वत: ला वाटतं म्हणून लढायचे, लिहायचे. इतर प्रतिक्रिया देवोत न देवोत, चार भले तटस्थ लोक सोबत असतात तेव्हढे बळ पुरेसे आहे. लडेंगे, जीतेंगे...

उद्याचा दिवस आपला असेल..

प्रा. हरी नरके

Updated : 26 July 2022 12:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top