Home > मॅक्स ब्लॉग्ज > 45 वर्ष दारू न प्यायलेलं गाव...

45 वर्ष दारू न प्यायलेलं गाव...

शहरात शिकलेली लोक फॅशन म्हणून दररोज दारू पितात. मात्र, धनगर वाड्यातली माणसं 21 व्या शतकातही 45 वर्षांपूर्वी घेतलेली शपथ निश्चय आणि विश्वासानं पाळत आहेत. वाचा 45 वर्ष दारूमुक्त असलेल्या धनगरवाड्याची कहाणी विनायक कदम यांच्याकडून

45 वर्ष दारू न प्यायलेलं  गाव...
X

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याची ओळख डोंगरी भाग अशी आहे. उंचच उंच डोंगररांगा, शंभर दोनशे लोकांची निसर्गाच्या कुशीत कोकणाप्रमाणे वसलेली गावं! शेती भाताचीच अधिक, मात्र पावसाचं प्रमाण अधिक व मुबलक चारा असल्यानं घरोघरी दुभत्या गाई म्हशी असल्यानं दुधाचा महापुरच की! मानसं म्हणाल तर खूप मनमिळावू मनानं आणि भाषेतही गोड. चांदोलीच्या घनदाट जंगलात कित्येक वर्षांपासून मोजक्याच लोकसंख्येनं जंगलातल्या प्राण्यांशी, निसर्गाशी एकरूप होऊन राहिलेलं गाव म्हणजे खुंदलापूर उर्फ धनगरवाडा!




नवं काहीतरी शोधणाऱयांसाठी अभ्यासण्यासाठी हा धनगरवाडा खूप काही देणारा होता. सांगली जिल्ह्याशी कमी संपर्क असलेल्या या वाड्यात 45 वर्षांपासून दारूबंदी आहे. येथील एकही पुरुष महिला नशा करत नाहीत आणि अव्याहतपने सुरू असलेल्या या यात्रेचा मेळा दरवर्षी हनुमान जयंतीला चांदोलीच्या जंगलात भरतो. चांदोलीच्या जंगलातील धनगरवाड्याला भेट द्यायला एवढी माहिती पुरेशी होती. धनगरवाड्याचा रस्ता वेड्यावाकड्या वळणाचा, दोन्ही बाजूला किर्रर्रर्र झाडी, कधी मोठी चढण तर कधी तीव्र उतार, बाजूला करवंदाच्या जाळ्यात डोंगराची मैना खुणावत होती.

जंगलातील वाघांच्या प्रकल्प कमानीच्या उजव्या हाताला धनगरवाडा जणू चांदोलीच्याच जंगलाला जागता पहारा देत होता. सकाळी व संध्याकाळी एक बस येणाऱ्या व मोबाईलची रेंज नसल्याने जगाशी संपर्क तुटलेला धनगरवाडा नजरेस पडला. बैठ्या पद्धतीच्या घरांचा. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गेल्याने मंदिर सजवलेलं होतं, गावासह पाहुण्यांनाही प्रसाद असल्याने मंदिराच्या समोरच मोठाली पातेली पडली होती. कचरा, पत्रावळ्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. रात्रभर जागरण झाल्यानं बरीच मंडळी दुपारी 12 वाजेपर्यंत झोपली होती. गंगाधर गायकवाड मंदिरासमोर खुर्चीवर वाऱ्याला बसले होते.

रामराम घालत आम्ही का आलो आहे? हे सांगितलं आणि मंदिराच्या पायरीवर आम्ही बसलो. तोवर गावात कुणीतरी नवीन आली ह्यो मेसेज गेलेला, तरण्या पोरांसह काही जण कायतरी कारण देऊन मंदिरासमोर आम्हाला टकमक न्हायाळत हुती. आणि साठीच्या गंगाधर गायकवाड धनगर वाड्याचा इतिहासाची पाने उलगडू लागले.

पूर्वीच्या काळी बरं हुत, मुंबईच्या जीवावर आमचं जगणं हाय बाबानू! इथं 4 ,5 ते 50 ,100 एकर जमीन हाय. पूर्वीच्या काळी जवस नाचणी पिकायची, आमच्यासोबत जंगलात 14 गाव हुती आता त्यांचं पुनर्वसन झालं!




पाऊस पाणी असल्यानं चारा मुबलक त्यामुळं जनावर भरपूर. गावची दारूबंदी सुंदर महाराज उर्फ भिकाजी बुवा यांनी 1973 ला केल्याचे सांगितले. आणि ते गावात असल्याचे सांगितले. त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी म्हणून त्यांच्या घरी निघालो. जवळच रस्त्याच्या कडेला, घाणीने भरलेल्या गटाराच्या शेजारी, घराच्या ओसरीवर 85 ते 86 वर्षांचा, गळ्यात माळा, तोंडात दात नसलेला, भिकाजी बुवा झोपलेला होता.

नमस्कार, रामराम झाले. ऊन मी म्हणत हुत बुवांन सारी सावलीत बसवली आणि दारु मुक्तीचा अध्याय सुरू झाला. 1975 ला लोकांच्या घरी ब्यारेलन दारू काढली जायची, घरोघरी हाच उद्योग असल्यानं लोकांच्या बुध्या काम देत न्हवत्या. खायला धान्य मिळायचं न्हाय. मात्र, पुरुष दारू पिऊन लोड होत महिलांना धोपटायचे.

भीतीने बायका करवंदाच्या जाळीत लपून बसायच्या. सर्वजण या दारूला कंटाळले होते. भिकाजी बुवांच्या सांगण्यांन दोन पोरांनी आपल्या व्यसनी बापालाच फाशी द्यायचं ठरवलं आणि बापाचीच काय साऱ्या गावाची नशा उतरली. नशामुक्तीची गावानं शपथ घेतली ती अव्याहतपणे 45 वर्षे गाव प्रामाणिकपणे पिढ्यान पिढ्या पाळत आहे. राष्ट्रपतींनी याची दखल घेत गावाला बक्षीस दिलं.

प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीला या नशामुक्तीची यात्रा भरते. रात्रभर भजन, कीर्तन व सोंगी भजनाचे कार्यक्रम होतात. शाहूवाडी, पाटण तालुक्यातील अनेक जण इथं येतात. भिकाजी बुवा व आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर गावाची मोठी निष्ठा!

8 जणांची ग्रामपंचायतीची बॉडी कायम बिनविरोध. 5 वीत शिकणारा, फुटबॉल पटू रोनॉलडो प्रमाणे केसांची स्टाईल मारणारा चुणचुणीत शिवाजी काळे आमच्या सर्व घडामोडीवर लक्ष देऊन होता. जंगलात वाघ हायती त्यामुळं गाई व अन्य जनावर तो मारून खातो वन अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केल्यास आमचा वाघ इथंच राहील असे उत्तर मिळते.

दुनियेचा संपर्क तुटलेली ही लोक ठराविक सुविधा मिळूनही आनंदात होती. नात्यात प्रेमाचा गोडवा होता, गावात फेरफटका मारायला निघालो, प्रत्येक घरासमोर शासनानं दिलेले पाणी तापवायचे बंब होते. कोंबड्याची खुराड,पावसाळ्यात सोयीसाठी तोडून व्यावस्थित ठेवलेलं जळंन, परसबागेत भाजीपाला, घरासमोर फिरणाऱ्या कोंबड्या, घरात असणाऱ्या गोठ्यात माणसांपेक्षा शांतपणे बसलेली जनावर, गाईच्या शेणाने सारवलेल्या जमिनी, दूध काढायला पांढऱ्या शुभ्र घासून ठेवलेल्या किटल्या, वाळत घातलेली कपडे, महिलांच्या अंगावर पूर्वीच्या कालच्या सोन्याचा साज, माणुसकीची व प्रेमळ मानस व या लहान गावात असणार प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलंच भावलं!



भिकाजी बुवा येताना म्हणले बोकडाच मांस खाऊन त्याच्यागतच मस्तीची भाषा तुमच्या सांगलीकडच्या लोकांची हाय? का? ररर! लगीच भांडण व हातघाईवर...वाघांच्या प्रकल्पामुळं गाव उठवून त्याच पुनर्वसन होणार हाय.

व्यवस्थित सोय करून दिली तर आम्ही जायला तयार असल्याचं गावकरी सांगतात. पुनर्वसनाचा इतिहास काळाकुट्ट आहे. मात्र, आमदार नाईक साहेबांवर त्यांचा मोठा भरोसा आहे. आज शहरात शिकलेली लोक फ्याशन म्हणून दारू ढोसतात. मात्र, धनगर वाड्यातली माणसं विश्वास व निश्चयानं 45 वर्षांपूर्वी घेतलेली शपथ आजही 21 व्या शतकात पाळतात. डोंगराच्या पलीकडे पावसाचे काळेकुट्ट ढग जमा होत होते. थंडगार वारा सुटला होता, दिवस मावळतीकडे झुकला होता. घाटात वेडीवाकडी वळण घेत आमची गाडी जंगलातील नशामुक्तीच गाव माग टाकून नशा करणाऱ्या सिमेंटच्या जंगलातल्या माणसांकडे धावत होती.

विनायक कदम

Updated : 22 Sept 2021 12:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top