MPSC परीक्षा: विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा जांगडगुत्ता
X
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी आणि भवितव्याविषयी आपले धोरणकर्ते राज्यकर्ते किती गंभीर आहेत, हे गेले काही महिने आपण पाहत आहोत. परीक्षा घ्यावी की न घ्यावी, घ्यायची तर ती कशी घ्यावी या साऱ्या बाबतीत जो काही घोळ सुरू आहे तो अभूतपूर्व होता, आहे. MPSC च्या संदर्भानेही महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत.
गेले सात महिने आधीच अस्थिरता त्यात पुन्हा हा राजकीय कलगीतुरा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, रोजगाराची दयनीय अवस्था.. या साऱ्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा कोणी विचार करणार आहे की नाही?
या वर्गात भयंकर नैराश्य आलेलं आहे. आपल्या कृतिशील ध्येयधोरणामधून या वर्गाला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. विरोधक नतद्रष्ट आहेतच पण महाविकास आघाडीलाही ठामपणे निर्णय घेता येत नाहीयेत, हे स्वच्छ दिसत आहे.
विद्यार्थी, तरुण हे देशाची पुढची पिढी, आधारस्तंभ वगैरे भाषणं झोडायची आणि प्रत्यक्षात त्यांच्याबाबत निर्णय घेताना कमाल गोंधळ घालायचा, हा काय प्रकार आहे! परिस्थिती अभूतपूर्व आहे हे खरंय पण म्हणूनच त्यावरचा आपला प्रतिसादही अभूतपूर्व सामंजस्य आणि सूत्रबद्धता यातून आकाराला यायला हवा. अस्मितेच्या तव्यावर भाकर भाजू नका राजेहो. ना भाकर, ना सन्मान, उगा फुकाचा ताण. विनाकारण विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा जांगडगुत्ता करू नका, ही कळकळीची विनंती.
(श्रीरंजन आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून)