Home > मॅक्स ब्लॉग्ज > या काळ्या टोपीखालचा मेंदू कुणाचा? सुनील सांगळे

या काळ्या टोपीखालचा मेंदू कुणाचा? सुनील सांगळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका मागून एक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पण ही वक्तव्य बोलण्याच्या ओघात आली आहेत, की एका अमराठी माणसाला राज्यपाल नेमून काही डाव साधण्याचा प्रयत्न आहे, याचे सडेतोड विश्लेषण केले आहे सुनिल सांगळे यांनी....

या काळ्या टोपीखालचा मेंदू कुणाचा? सुनील सांगळे
X

" समर्थ ना होते तो शिवाजी महाराज को कौन पूछता?" असं तो एक दिवस बोलतो. सहनशील मराठी लोक ते विसरून जातात.

नंतर एक दिवस उठून तो जाहीररीत्या कुत्सित हसत, महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या सावित्रीबाई फुल्यांच्या बालविवाहाबद्दल अश्लील वक्तव्य करतो. दहा वर्षांच्या सावित्रीबाई आणि १३ वर्षांचे जोतिबा लग्नानंतर काय करत असतील असा घाणेरडा प्रश्न विचारतो.

हे सांगोवांगी नाही. याचे व्हिडीओ आजही न्यूज लोकमत वर दाखवले गेले आहेत. हे सगळे होऊनही या राज्यात त्या वेळी त्याचे फार काही पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे या राज्यपाल महोदयांना निदान आता यापुढे तरी अधिक जबाबदारीने वागावे असे वाटायचा प्रश्नच उद्भवला नाही.

त्यामुळेच आज ते गुजरात आणि राजस्थानचे लोक मुंबई ठाण्यातून निघून गेले तर मुंबईत पैसा राहणार नाही; मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे म्हणाले. थोडक्यात या लोकांशिवाय महाराष्ट्र दरिद्री होईल असे ते सांगतात. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी का आहे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण गुजरातमध्ये सगळे गुजराती आणि राजस्थानमध्ये सगळे मारवाडी असतांना देखील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी का आहे, त्याला काय ऐतेहासिक व भौगोलिक कारणे आहेत याचा शोध कोश्यारींनी निवृत्त झाल्यावर घ्यावा.

पण राज्यपालांच्या या वक्तव्यावर आमचे राजकारणी काय बोलत आहेत ते पाहणे उद्बोधक आहे.

समस्त मराठी लोकांच्या या अपमानावर आपले मुख्यमंत्री म्हणाले की ते राज्यपालांचं वैयक्तिक मत आहे आणि आम्ही त्याच्याशी सहमत नाही. हे देखील सगळं ते एक कागद वाचून बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मराठीत अतिशयोक्ती असा एक अलंकार आहे. त्या प्रकारे राज्यपाल एका समाजाच्या कार्यक्रमात बोलले असतील. मी त्यांच्याशी सहमत नाही.". बस एवढीच प्रतिक्रिया? ते सुद्धा आडून समर्थन करून? भाषा विषय शिकायचा क्लास मुंबईतील मराठी लोकांनी कोश्यारीकडे लावायचा आता?

आशिष शेलार यांनी ट्विट केले की ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाहीत. ते दुसरे काय बोलणार? राज्यपालांवर ते काय टीका करणार? अर्थात या लोकांकडून राज्यपालांवर टीकेची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

राज ठाकरे काहीतरी वेगळेच बोलत आहेत. ते म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर असे वक्तव्य राज्यपालांनी का केले व कोणाच्या सांगण्यावरून केले हे न कळण्याइतकी जनता दूधखुळी नाही. म्हणजे काय? गुजराती व मारवाडी मते भाजपला मिळण्यासाठी ते असे बोलले? जणू काही ती मते शिवसेनेला मिळणारच होती!

या विषयावर अर्थातच उद्धव ठाकरे खूप कडक बोलले. ते अपेक्षितही होते. राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे असेही ते म्हणाले. पण राज्यपालांनी आजच एक खुलासा केलाय आणि ते आता माफी मागायची शक्यता नाही. आणि त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेना काय करणार? आंदोलन करणार? मोर्चे काढणार? याबाबत उद्धव ठाकरेंनी काहीच सांगितले नाही.

आणि एवढा सगळा गदारोळ झाल्यावर आता राज्यपाल काय सारवासारव करत आहेत? ते म्हणतात "नेहेमीप्रमाणे माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला.". विपर्यास? शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्याबद्दल कोश्यारी जे बोलले त्याचे आणि आज ते जे बोलले त्याचाही व्हिडीओ उपलब्ध असूनही हा माणूस बिनदिक्कत असं बोलतोय. रेटून खोटे बोलण्याबद्दल आणि कुजबुज मोहीम चालवून प्रचार करण्याबद्दल या लोकांचे संस्कार कुप्रसिद्ध आहेत. ते त्याला जागताहेत एवढेच यातून पुन्हा एकदा दिसले.

असली वक्तव्ये दक्षिणेतील राज्यात किंवा बंगालमध्ये तिथल्या दैवतासमान असलेल्या व्यक्तींबद्दल किंवा संपूर्ण तामिळ वा बंगाली समाजाबद्दल कोणी करायची हिम्मत करेल का? आणि केलीच तर त्याचे परिणाम काय होतील?

यावरून एक दिसते की महाराष्ट्र एवढा सुसंस्कृत आहे की इथले राजकारणी, राज्यपाल पदाच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवणाऱ्या या काळ्या टोपीखालचा मेंदू असलेल्या व्यक्तीच्या राजीनाम्याची साधी मागणीही करत नाहीत. अतिसुसंस्कृतपणा, अति सहनशीलता आणि षंढपणा यातील सीमारेषा फार पुसट असते. मराठी समाज सध्या त्या सीमारेषेच्या कुठे आहे हे तपासून पाहायची वेळ आता आली आहे.

Updated : 31 July 2022 8:24 AM IST
Next Story
Share it
Top