मांडवल्या बंद करा
Max Maharashtra | 31 July 2019 12:17 PM IST
X
X
विधानसभेच्या तयारी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या व्यग्र आहेत. दुसरी टर्म मिळावी म्हणून ते महाजनादेश यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांना सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून सर्टीफिकेट दिलेलं असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी नावापुरत्या काही जागा काँग्रेस-एनसीपी ला देऊ बाकी आम्ही 220 च्या पलिकडच्या जागा जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. 288 जागांपैकी 220 पार जागा जिंकायच्या म्हणजे त्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. फार मोठं काम त्यांच्या खांद्यावर आहे. त्यातच विरोधी पक्षांमधले आमदार-इच्छुक उमेदवार फोडायचे, त्यांना पक्षप्रवेश द्यायचा, इ.इ. लहानसहान नियोजन ही त्यांना पाहायचंय.
या सगळ्या गडबडीत राज्यात कुठे काय चाललंय याकडे लक्ष द्यायला कदाचित त्यांना फार वेळ मिळणार नाहीय. मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय की ते जरी यात्रेवर असले तरी राज्याचा गाडा ते सक्षमपणे हाकणार आहेत, आणि कुठेही राज्य बंद पडलंय अशी स्थिती येणार नाही. मुख्यप्रवाहातील माध्यमांमधील बातम्या वाचून त्यांना राज्य योग्य पद्धतीनेच चाललं असल्याची खात्री ही पटलीय.
एवढं सगळं सुरू असताना बीड मध्ये एका शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. मामाच्या घरी शिकायला आलेल्या या मुलीला सतत छेडछाडीला तोंड द्यावं लागत होतं. याची तक्रार तीने केली. गावाच्या समोर विषय झाला, समज देण्यात आली. मुलाच्या घरच्या लोकांना ही सांगण्यात आलं. त्यानंतर त्या मुलाने छेडछाड सुरूच ठेवली आणि बदनाम करायची धमकी दिली. या प्रकाराने त्रस्त मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. याआधी ही बीड मध्ये छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीने जीवन संपवलं आहे. बीडमध्ये भर रस्त्यात ऑनर किलींगच्या घटना घडल्यायत. गेल्याच आठवड्यात एका विवाहित महिलेचा हात पकडून एकाने तिला खेचलं. हे प्रकरण मांडवली करून पोलिसांनी मिटवून टाकलं. अलिकडेच रोजगार टिकावा म्हणून महिलांनी गर्भाशयं ही काढल्याच्या बातम्या जागतिक पातळीवर छापून आल्यायत. स्त्री-भृण ह्त्येच्या बाबतीत या जिल्ह्याचं नाव कायम आघाडीवर राहिलंय. मुलींचा जन्मदर वाढल्याचा आकडा फेकत सरकारने यावर कायम कव्हर चढवत ठेवलंय.
ही केवळ बीडची कहाणी आहे, त्यातही महिला अत्याचाराच्याच निवडक घटना. यापलिकडेही राज्यभरात अनेक गोष्टी घडतायत. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान आसपास कार्यकर्ता आणि तिकिटोच्छुक लोकांच्या गर्दीत लोकांचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्यापुरती मीच गृहमंत्री अशी भाषणं करणाऱ्या पंकजा ताईंना बीड मध्ये घडणाऱ्या या घटनांमुळे कधी जबाबदारी घ्यावी वाटली नाही, राजीनामा तर दूरची गोष्ट.
बीड मधील घटना कायदा-सुव्यवस्थेला मोठं आव्हान आहे. वारंवार बीडमध्ये अशा घटना घडतायत. दुसरीकडे बेटी बचाओ – बेटी पढाओ चा नारा सरकार देतंय. पण जो पर्यंत अशा घटनांमध्ये सरकार स्वतःहून लक्ष घालून कारवाई करत नाही तोपर्यंत गुन्हेगारांवर वचक बसणार नाही. बीड एक उदाहरण आहे, संपूर्ण राज्यभरातच ही परिस्थिती आहे. शासनातल्या-जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांनी भाषणबाजी आणि मांडवल्या बंद करून आपल्या कृतीतून आता संदेश दिला पाहिजे.
संतापजनक : बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या…
- रवींद्र आंबेकर
Updated : 31 July 2019 12:17 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire