Home > मॅक्स ब्लॉग्ज > महाराष्ट्र बंद: फायदा कुणाचा?

महाराष्ट्र बंद: फायदा कुणाचा?

महाराष्ट्र बंदची झळ कुणाला बसली? श्रीमंतांना की सर्वसामान्यांना? शेतकरी आंदोलनाला या बंदचा काय फायदा झाला? वाचा मकरंद देसाई यांचा लेख

महाराष्ट्र बंद: फायदा कुणाचा?
X

बंद किती यशस्वी झाला किंवा कसा यशस्वी झाला याहून जास्त महत्त्वाचं हे आहे की बंद नक्की का केलेला आणि त्याची झळ नक्की कोणाला बसली! आज बँका बंद होत्या का ? शेअर बाजार बंद होता का ? आयटी कंपन्या ? यापैकी काहीही बंद नव्हतं. म्हणजे ते बंद करावं अशी मुळात इच्छाच बंदवाल्यांच्या डोक्यात नव्हती!

बंद काय होतं ? तर रस्त्यावरचे टपरीवाले बंद होते, लहान दुकानं बंद होती. ऍमेझॉन बंद होतं का ? जिओ मार्ट ? ते मात्र नीट सुरू होतं. या बंदची झळ फक्त सामान्यांना, गरिबांना आणि शहरातल्या हातावर पोट असणाऱ्यांनाच बसावी अशीच मुळात या बंदची योजना होती!!

या बंदची झळ अंबानीला पोचली नाही, टाटालाही पोचली नाही. जी काही झळ बसली ती सोसली सामान्य लोकांनी, गरिबांनी. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हजारो करोडचे वित्तीय व्यवहार सुरळीत चालू असताना- ऍमेझॉन-जिओमार्टला काडीचा फरक पडलेला नसताना, फक्त ज्यांना दिवसाचे दीडशे -दोनशे रुपये मिळवायची आशा असते त्या लोकांच्या दुकानांना, रिक्षाला, वडापावच्या गाडीला आणि चहा टपरीला टाळी लावून नक्की कोणाची मर्दुमकी गाजत असावी बरं ?

बरं, याचा नक्की शेतकरी आंदोलनाला फायदा किती आणि कसा झाला असेल याचा हिशोब कोणी देणार आहे की नाही ? या बंदचा कॉस्ट-बेनेफिट रेशो नक्की किती भरला याचं काही मोजमाप बंद वाल्यांनी केलं का ? कारण दिवसाला दीडशे-दोनशे कमावणाऱ्या लोकांनी एक दिवसाच्या कमाईवर पाणी सोडून या बंदची किंमत चुकवली आहे, बाकी दिवसाला शेकडो कोटी कमावणारे अंबानी-टाटा आणि झुणझुणवाला आजही कमवतच होते!!

आज दिवसभर जो दिसत होता तो बंदसमर्थक मंडळींचा "आमचा उद्देश चांगला आहे म्हणून आम्ही जे करतोय ते चालवून घ्या" हा खाक्या त्यांनी नोटबंदीवाल्यांकडून कॉपी केला असावा काय ? बंदसमर्थक पक्षांपैकी ज्या पक्षांनी संसदेत ही विधेयके पास होत असताना बोटचेपी भूमिका घेतली त्यांनी आज बंदच्या निमित्ताने का होईना, पण त्यावेळी आमचं चुकलं एवढं सांगायची तसदी घेतली का ?

किसान आंदोलन हे भारतातले अलीकडच्या काळातले अत्यंत महत्त्वपूर्ण आंदोलन आहे. त्याविरुद्ध भाजपकडून चालू असणारे पाताळयंत्री राजकारण आपल्याला अजिबात खपवून घ्यायचे नाही यात कोणताही वाद नाही. उत्तरप्रदेशात ज्या निर्मम प्रकारे भाजपच्या मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं ते अत्यंत संतापजनक आहे. त्या सांडलेल्या रक्ताचा जाब भाजपला आणि मोदी-शहांना विचारणं आपल्याला भारताचे नागरिक म्हणून भागच आहे.

मात्र किसान आंदोलनाचा मुद्दा तापलेला आहे म्हणून त्यावर आपल्या पोळ्या भाजण्यासाठी आजच्या बंदसारखे सामान्यांना उपद्रवी ठरणारे चाळे आपण गोड मानावे याला काही अर्थ नाही! त्यामुळे फक्त गरिबांच्या, निम्नमध्यम वर्गीयांच्या पोटावर पाय देणाऱ्या या उपटसुंभ बंदशाहीचा स्पष्ट विरोध करणे गरजेचे आहे.

यांचा उद्देश चांगला वाटतोय म्हणून वाट्टेल ते माकडचाळे चालवून घ्या ही प्रवृत्ती आधीच आपल्या देशाचे पुरेसे नुकसान करून बसली आहे. याच प्रवृत्तीने नोटबंदीसारखा शुद्ध गाढवपणा केलेल्या सरकारला दुसऱ्यांदा जास्त बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे किमान आतातरी आपण असल्या वेडाचाराला नव्याने बळी न पडायची जबाबदारी उचलली पाहिजे!

जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशी एक मराठीत म्हण आहे. पण आजच्या बंदचा थाट हा जखम मांडीला आणि तिच्याविरोधात म्हणून एक नवीन जखम दुसऱ्या मांडीला करून बसायची असा होता. असले मूर्खपणाचे प्रकार सुरू असताना ते बघत बसणे आणि अमक्याच्या विरोधात होतोय ना मग होऊ दे म्हणत याला मान डोलवत बसणे हे मेलेल्या मनाचे आणि गंजलेल्या बुद्धीचे लक्षण आहे. आणि असे कोणाच्या तरी बाजूला किंवा कोणाच्या तरी विरोधात राहायचे म्हणून मन आणि बुद्धीला दावणीला बांधणे आम्हाला रुचत नाही, म्हणून हा लेखप्रपंच...

मकरंद देसाई

Updated : 12 Oct 2021 1:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top