Home > Election 2020 > पराभव कुणाचा…?

पराभव कुणाचा…?

पराभव कुणाचा…?
X

देवेंद्र फडणवीस यांच्या एकहाती नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. भाजपाच्या जागा शंभरीत अडकल्या आणि वाघ 55 जागांच्या पिंजऱ्यात अडकला. 56 इंचाची छाती अर्थातच या निराशाजनक निकालांसाठी जबाबदार नसल्यानं एकच प्रश्न उरतो, महाराष्ट्राच्या जनतेनं नाकारलं हा पराभव नक्की कुणाचा..? देवेंद्र फडणवीस की नरेंद्र मोदी? अवघड प्रश्न आहे. पण, आता तो भाजपातल्या बाजूला सारलेल्या नेत्यांनीही हा प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी स्वतः महाराष्ट्राच्या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. अमित शहा यांनी आपला विजयी फॉर्म्युला लढवला. अनेक केंद्रीय नेते प्रचारात उतरले होते. या प्रचारात राष्ट्रीय मुद्दे आणि त्याला देशभक्तीचा तडका ही लावण्यात आला होता. कलम 370 आणि 35 ए, ट्रीपल तलाक पासून भारत – पाकिस्तान अशा अनेक मुद्द्यांवर निवडणूक लढली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केलेले हे मुद्दे प्रचाराचे मुद्दे होऊ शकतात का? महाराष्ट्राच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांचा संबंध काय असा सवाल विरोधी पक्षांनी विचारला. राष्ट्रीय मुद्दे निवडणुकीत आणण्याने भावनिक मुद्द्यांवर लोक मतदान करतील हे ठोकताळे संपूर्णतः चुकले. ही रणनिती आखणारे मोदी चुकले का.. 370 नंतर झालेल्या निवडणुका या प्रमाण मानल्या तर हरियाणा, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश येथील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे महाजनादेश यात्रा काढून सरकारने केलेली कामं लोकांसमोर मांडली. शेतकरी, कामगार, बेरोजगार, महिला या सर्व क्षेत्रात भरघोस काम केलं असा देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता. कदाचित हे लोकांनी मान्य केलेलं दिसत नाही. या निवडणूक निकालाने देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा दावा जनतेने मान्य केलेला दिसत नाही. हाच काहीसा प्रकार शिवसेनेसोबत ही झाला आहे.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील निराशाजनक निकालांसाठी दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हेच जबाबदार आहेत. ही जबाबदारी या दोघांपैकी एकाने स्विकारली पाहिजे.

Updated : 24 Oct 2019 8:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top