कमळाची शिकवण…!
X
कमळं खूप दिसली. मालनाड मधली माणिक-कमळांची तळी, अगदी बारकी, नेत्रावती नदी शेजारची. तिथे त्यांच्या भोवती केवडा आणि सोनटक्का होता, पलीकडे माडाची झाडं, भाताची शेती. आंबाबाईच्या देवळा समोरची, हुबळीला जाताना वाटेत लागणारी. इतकी देखणी! लाल-गुलाबी, पाण्यात ताठ उभी, आणि त्यांची ती अशक्य-अशक्य सुंदर पानं.
बालीला जिकडे बघावं तिथे कमळं: कमळ-पानांच्या वह्या, कमळाच्या उदबत्त्या, खोली बाहेर कमळाचे तळे. चंद्रपूरला सारस पक्ष्यांची जोडी होती. अशा एका कमळ-तळ्यामागे. सगळ्यात जवळचे नाशिकचे कुंड, त्र्यंबकला जाताना लागणारे. मखमली फुलं. मखमली पानं. काळा पाषाण आणि त्यात जर्द गुलाबी कमळं.
राजस्थानमध्ये, अगदी महाराष्ट्रात पण बायका हातावर विहीर गोंदवून घेतात: आयताकृती पायऱ्या, पाण्याची एक लहर आणि मध्ये कमळ. मिस्राजी म्हणायचे ते चिन्ह म्हणजे फक्त जीवनावश्यक गोष्टी: अन्न, पाणी आणि फुलं! पण या पसाऱ्यात तुला सांगायचं असं की कमळ अपरिग्रहाचे प्रतिक. अलिप्ततेचे. न गुंतण्याचे. हे सांगताना पण किती साठवलेल्या पसाऱ्याच्या गोष्टी सांगितल्या बघ. कपाळ अपरिग्रह कळणार मला अनेक धर्मात, मातीत, लोकात कमळ सांगते. स्वतःकडे साठवून ठेऊ नको. वाहू दे. पानांवरून ओघळू दे. जितकं धरून बसशील तितकं दूर जाणार तुझ्यापासून. मी ऐकून न ऐकल्यासारखं करते.
पण सगळ्या गोष्टी का निसर्गाकडून शिकायच्या? आपल्या भोवतीचे जग तर निर्गुण-निर्हेतुक. कोणतीही डोळस दिशा नसलेले. त्याला उगा माणसांचे नियम लावायला गेलो की गोंधळ होतात, चुका होतात. पण मग चुका होऊ देत की. त्यात काय घाबरायचे? प्रत्येक जण आपल्या भाषेत गोष्ट सांगत असतो. काही गणिताच्या भाषेत सांगतात, काही तर्काच्या, काही कवितांच्या, काही नद्यांच्या, जंगलांच्या, डोंगराच्या. ज्या भाषेत बोलता येते ती त्यांची भाषा. तेच काय ते अंतिम सत्य असल्याचा दर्प न मिरवता.
तर असो. गुंता करण्यात काही अर्थ नाही. पुढे जाता आले पाहिजे बघ. नद्यांचा स्वभाव तो. जर गंगेला वाटलं हिमालय मस्त आहे. कशाला मरायला जायचंय ते कानपूर, बिहारमध्ये, तर? गोमुख, देवप्रयाग, कानपूर, भागलपूर, राजशाही, कोलकाता, गंगासागर, बर्फ, डोंगर, जंगलं, शहरं, स्वार्थी भाविक, फाटके नावाडी, चामड्याचे उद्योग, वाराणसीची संध्याकाळ, घाटावरच्या आरत्या, वाहणारे अर्धवट अवशेष, मगरी, Otters, सारस, तो बघ डॉल्फिन!, बांध, पंप, फराका, एकाकी गाणारी बोट, धरणाच्या भिंतीवर आदळणारे हिल्सा मासे, अवजड गाळ, पाण्याची बदलती चव, मंदावणारी चाल, सुंदरबन, बंगाल टायगर, बोनबिबी, मीठ, मीठ, लाटा..
पुढे जाता आलं पाहिजे. कसा जमणार अपरिग्रह? इथे चालताना प्रत्येकं फांदीमागे चंद्र दिसतो, प्रत्येक फुलाचा वास घ्यावासा वाटतो, नदी खाली मुन्गुसांना खायला मिळते का? हे बघायला येणारे काका असतात, SD चे बंगालीतले अगम्य गाणे असते, मिस्सिस्सिप्पीची गोष्ट सांगणारे म्हातारे असतात, झोपाळलेले डोळे असतात.
याबद्दल अलिप्त झालो तर राहील काय मग ओंजळीत? मग अगदी अंतिम सत्य जरी ताटात ठेवून आणले तरी ते काय कामाचे? ठेवा तुमच्याकडे. नको ते. कमळं नुसती अलिप्त नसतात, बीव्हरना त्यांची पानं आवडतात, बीटल्सना, पक्ष्यांना, मधमाश्यांना, भ्रमरांना त्यांची फुलं जाम आवडतात, कमळ-पानं पाण्यावर सावली धरून पाणी गार करतात, माशांना अन्न देतात, लपायला गारेगार जागा देतात, कश्मीर, Vietnam, Cambodia मध्ये लाखो लोकांना ही अलिप्त फुलं रोजगार देतात.
कमळं एका पाणथळ जागेच्या अव्यक्त उर्जेचा व्यक्त उत्सव करतात. कदाचित भरती-ओहोटी, उन्हाळा-हिवाळा, पक्ष्यांची migrations, Whalesचे गाणे, हे चक्र आहे. अपरिग्रह आणि मोहासारखे. आपण कधी इकडे, कधी तिकडे. and that's ok.
दर्द भी हमें कबुल, चैन भी हमें कबुल,
हमने हर तरह के फुल हार में पिरो लिये