भीम कुळातील पहाडी आवाज हरपला....लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे यांचे दु:खद निधन...
|| भीम युगाचं तांबड फुटलं || ||या देशाचं गि-हाणं फिटलं || या आपल्या गीतातून उपेक्षित,वंचित, अलक्षित समूहाला जागे करण्याचे काम करणारे लोकशाहीर, लोककवी ,भीमकुळाचे सच्चे वारसदार प्रतापसिंग दादा बोदडे यांचे आज निधन झाले, प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी त्यांना वाहीलेली शब्दांजली....
X
मुंबईला रेल्वे विभागात सरकारी नोकरी करून देखील आपल्या परखड गीत लेखनाच्या सर्जनात ते कधीच मागे हटले नाही. "माझ्या शंभर भाषणापेक्षा शाहिरांचे एक गीत समाजामध्ये जागृतीचे प्रसार आणि प्रचाराचे काम जोमाने करते." या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक बनून दादांनी हजारो गीते लिहिली. त्या गीतांचे जलश्याव्दारे सादरीकरण करून हजारो वंचितांना जागे करण्याचे एक मोठे काम प्रतापसिंगदादांनी केले.
कष्टाच्या कामात
मजुरांच्या घामात
घामाच्या दामात
मला भीम दिसला |
मराठी,हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेवर दादांचे प्रभुत्व होते.दादांची या भाषेवर जबरदस्त पकड होती, पाकिस्तानामध्ये जाऊन उर्दू मुशायरा मध्ये त्यांनी आपल्या शायरीचा आणि शाहिरीचा दबदबा निर्माण केला होता.
निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता
जातियते करिता तलवार भीम होता
गेला तो करपलेल्या रानात खळखळूनी
पाषाण फोडणारा जलधार भीम होता...
लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य असलेले प्रतापसिंग बोदडे यांनी भीमगीतांचे शेकडो कार्यक्रम एकत्रितपणे लाखो जनसमुदायासमोर सादर केले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्य, समता ,बंधुता आणि न्याय अर्थात लोकशाहीवादी विचार समाजामध्ये प्रसारित करण्याचे एक मोठे काम प्रतापसिंग दादा बोदडे यांनी केले.
मानवतावादी विचार हाच मानवी कल्याणाचा विचार आहे. यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांनी गीत लेखन आणि गायन केले. उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात आणि परदेशात देखील त्यांनी आपल्या शाहिरीचा ठसा उमटवलेला होता.
खानदेशाच्या मातीमधला अर्थात मुक्ताईनगरला राहणा-या हया लोककवी आणि लोकशाहीराने आयुष्यभर वंचितांच्या वेदना शब्दबद्ध केल्या ; त्या गात राहिला.
दोनच राजे इथे गाजले
कोकण पुण्य भूमीवर...
एक त्या रायगडावर ,
एक चवदार तळ्यावर...
समाजामध्ये चेतना, ऊर्जा आणि स्फुल्लिंग पेटवण्यासाठी प्रतापसिंग दादाच्या गीतांचा खूप मोठा वाटा आहे. हे लक्ष्यात घेऊनच माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करणाऱ्या पहिल्याच विद्यार्थ्याला प्रतापसिंग दादांचा विषय दिला.हजारो गीतांची साहित्य संपदा असणा-या ह्या अवलियाच्या साहित्यावर संशोधन झाले पाहिजे म्हणूनआम्ही दोघांनी सविस्तर चर्चा केली.तसेच आद.प्रोफेसर डाॅ.म.सु.पगारे आणि आद.प्रोफेसर डॉ.आशुतोष पाटील यांच्याशी देखील बोललो.त्यांना देखील विषय आवडला. वडिलांच्या समान असणारे सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी आयु.भगवानदादा गायकवाड (भुसावळ) हे "लोककवी प्रतापसिंग बोदडे यांच्या गीतांचा चिकित्सक अभ्यास" हा विषय घेऊन संशोधन करीत आहेत.सध्या त्यांचे संशोधन कार्य जोमात सुरू आहे.दोन तीनदा ते दादांना प्रत्यक्ष भेटून आले.दूरध्वनी वरून ते नेहमी दादांशी संवाद साधत असतं ,आता दादांच्या निधनाची वार्ता कळवली, त्यांना प्रचंड धक्का बसला.
आपल्या गीतांवर एक विद्यार्थी जो ज्येष्ठ नागरिक आहे,तो पीएच.डी.करीत आहे, ही गोष्ट दादांना अप्रूप वाटायची आणि असं काही करता येतं का? असे विचारताना आश्चर्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसे.
भीमरूपे काय एक चक्रवर्ती आला
महानायकाचा झाला दुनियेत बोलबाला
आता प्रतापसिंगा होतील भिमाचे चेले
बुद्धाच्या भुमीवरती हे भिमयुग आले
त्यांच्या आकस्मिक जाण्याने उभ्या आंबेडकर चळवळीला मोठा हादरा बसला आहे. भीमकुळातील पहाडी आवाज आज हरपला, या भावपूर्ण अभिवादनाने त्यांना साश्रू नयनांनी विनम्र आदरांजली अर्पण करतो.
| प्रतापसिंग दादा अमर रहे |
साधू...साधू... साधू...!
© प्रा.डाॅ.सत्यजित साळवे.
जळगाव मो.9823380970