मोदींविरोधात कोण? प्रादेशिक शहेनशहांचा नवा पर्याय
Max Maharashtra | 28 April 2019 8:55 AM IST
X
X
राजकारण हा अविश्रांत, जीव तोडून करायचा उद्योग आहे. त्यात आजारपण किंवा एखादं शारीरिक दुखणं याला जागाच नाही आणि ते देखील निवडणुकांच्या काळात आलं तर त्याकडे दुर्लक्षच करावं लागतं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या आजारपणाच्या अफवा उठल्या. सततच्या त्या अफवांना खोडून काढण्यासाठी एरवी कॅमेरापासून दूर पळण्यासाठी अनेक युक्त्या करणा-या या मुख्यमंत्र्याने चक्क जिम वर्कआऊट करतानाचा स्वत:चा व्हिडिओ प्रसारित केला. यातच सर्व काही आलं. ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा थांग अद्याप कोणालाही पूर्णपणे लागलेला नाहीये. असे नवीन पटनायक हे भारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिलेले नेते आहेत; मागील काही महिने त्यांनी भयानक उष्णतेचे दिवस असतानाही ओडिशाचा काना-कोपरा त्यांच्या दौ-यांमधून पिंजून काढलाय. पटनायक नेहमी एसी बसने प्रवास करतात. सभेत लोकांसमोर लिफ्टने त्यांचा प्रवेश होतो आणि भाषण संपताच पुन्हा एकदा ते अनाकलनीयरित्या त्यांच्या जगात नाहिसे होतात. त्यांना ओरिया भाषा फारशी चांगली बोलता येत नाही, ते उत्तम वक्ते नाहीत, त्यांच्याकडे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी चकाचक मार्केटिंग माध्यम नाही आणि एवढं असूनही ते ओडिशाच्या राजकीय पटलावर गेले दोन दशकं सत्ता गाजवत आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणुकांच्या काळात मोदींना अनुसरून उच्चाराचे राजकीय तमाशे जिथे सुरू आहेत, अशा वेळी नवीन पटनायकांना शह देण्यासाठी भाजपकडे ‘हिमालयाहूनही उत्तुंग‘ अशा जोषात ज्याचा उदय घडवून आणता येईल असं कोण आहे?
या लोकसभा निवडणूका सुरू झाल्यापासून एकच प्रश्न सतत विचारला जातोय तो म्हणजे, मोदींच्या विरोधात कोण असेल? राहुल गांधींचा आताच्या काळातला एकूणच वावर, वागणं उत्स्फूर्त आहे. परंतु देशातल्या जनतेने मांडलेल्या लोकप्रियतेच्या फूटपट्टीवर ते मोदींपेक्षा कोसो दूर अंतरावर आहेत. राहुल गांधींची राजकीय कारकिर्द ही अपरिहार्यपणे त्यांना कौटुंबिक वारसा म्हणून मिळालेली असल्यामुळे अजून तरी त्यांना स्वत:वरचा ‘राजकीय विरासतीचा राजपुत्र’ असल्याचा शिक्का पुसून काढता आलेला नाहीये. खरं तर उपहासाची गोष्ट म्हणजे नवीनबाबू हे देखील ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि धारदार नेते बीजू पटनायक यांचे सुपुत्र, ज्यांच्या आयुष्याच्या मालिकेतला ऐषआरामी गर्भश्रीमंत दिल्लीत घडणारा सीझन वन हा १९९७ साली अचानक मुख्यमंत्री वडील वारल्यानंतर अचानक संपला आणि भुवनेश्वरच्या रूक्ष वातावरणात नवीन निवासमध्ये आयुष्याच्या मालिकेचा सीझन टू सुरू झाला. अशा प्रकारे राजकीय वारशाने राजपुत्र झाल्यानंतर देखील राज्यात स्वत:ची दमदार सद्दी निर्माण करणारा हा नेता. भाजपच्या एक राष्ट्र, एक पक्ष व एक नेता अशा हट्टाला आवाहन देत उभ्या राहिलेल्या देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या महाआघाडीत देखील सामील झालेला आहे. ही बाब महत्त्वाची ठरते. सध्यापुरतं का होईना पण तेलंगणातून के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जीपासून ते ओदिशाच्या नवीन पटनायकांपर्यंत या आघाडीतील प्रत्येक नेता स्वत:च्या बालेकिल्ल्यातून मोदींच्या सत्तेविरोधात राजकीय आखाडा लढवत आहे.
जनतेनेच निवडून दिलेल्या या सत्ताधीशांबाबत गैरसमज ठेऊ नका. कारण या देशाच्या बिग बॉसला जे प्रांतीय नेते आरोपीच्या पिंज-यात उभं करतायत तेच हे नेते स्वत: त्यांच्या राज्यांमध्ये पाहायला गेलं तर बिग बॉससारखीच सत्ता गाजवत आहेत असंही दिसून येईल. ओडिशात बिजू जनता दल हा ‘वन मॅन शो’ आहे जसा तो तृणमूल काँग्रेसचाही प.बंगालात आहे आणि हेच चित्र तेलंगणा राष्ट्र समितीमध्येही दिसून येतं. या नेत्यांच्या अगदी खास जवळकीच्या गोटात प्रवेश हवा असेल तर तुम्ही या नेत्यांचे नातेवाईक असणं अगदी जरूरी आहे. नवीन पटनायक या प्रकाराला थोडेसे अपवाद म्हणता येतील कारण ओडिशाच्या राजकीय पटावरल्या ‘सिंगल मॅन’ शोचे तेच कर्ते-धर्ते आहेत आणि त्यामुळेच की काय पण त्यांच्या नेतृत्वाशिवाय पक्षाचं भवितव्य अंधकारमय व अनिश्चित असं दिसतं. पटनायकांच्या अगदी विरूद्ध असं ममतादीदींचं आहे, त्यांनी ‘एकल स्त्री’ म्हणून राजकारण करताना हळूहळू त्यांच्या पुतण्यासाठी स्वत:चा वारस म्हणून पश्चिम बंगालच्या राजकारणात जागा निर्माण केली आहे. तिकडे तेलंगणात देखील राव यांनी पक्षातील सर्व महत्त्वाची पदं ही केवळ आप्तांच्या हाती सोपवलेली आहेत. अनेकदा प्रादेशिक पक्षांतील या प्रांतीय नेत्यांची दादागिरी त्यांचा त्यांच्या मतदारांमध्ये चांगला जनसंपर्क असल्यामुळे खपून जाते. त्यांचे जनतेशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित होण्यात त्यांचा स्वत:चा प्रभावी करिश्मा किंवा सहसा कोणत्याही परिस्थितीत निष्ठा न सोडणारे अनुयायी यांचं मोठं योगदान असतं. ज्यामुळे या प्रादेशिक नेत्यांची कारकिर्द टिकून राहाते आणि त्यांना एखाद्या राष्ट्रीय नेत्यापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळते. उदाहरणार्थ तेलंगणात केसीआर यांनी कोणतंही सक्रिय मंत्रीमंडळ नसताना डिसेंबर २०१८ नंतर तब्बल दोन महिने राज्यकारभार चालवला. किंवा तिकडे ममता बॅनर्जी स्वत:ची मनमानी करत बरेचदा त्यांच्या राजकीय शत्रूंना साधी राजकीय बैठकही घेऊ देण्याची परवानगी देत नाहीत.
राज्यातील प्रशासकीय कारभारावर संपूर्ण नियंत्रण मिळवलेले असल्यामुळेच हे प्रादेशिक नेते एवढे प्रभावी व शक्तीमान झालेले असतात. राज्यातील सर्वोच्च सत्ताधीश असणा-या या नेत्यांच्या ठायी अतिशय ठाम निष्ठा दाखवणारे प्रशासकीय कारभारात अत्यंत पारंगत असे सनदी अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्या अगदी खास वर्तुळातूनच या नेत्यांची कामं चालतात. ओडिशामध्ये देखील मुख्यमंत्र्यांनंतरचा सर्वात शक्तिशाली माणूस हा त्यांनी स्वत: खास निवड केलेल्या सनदी अधिका-यांपैकी एक आहे. हे आता एक उघड सत्य आहे. हे बाहुबली प्रादेशिक नेते त्यांच्या राजकीय सहका-यांपेक्षाही अशा सरकारी अधिका-यांवर अधिक विश्वास ठेवतात कारण राजकीय सहकारी हे भविष्यात राजकीय शत्रूरूपी आव्हान बनण्याची शक्यता असते.
परिणामी राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक लक्ष्यकेंद्रीत आणि वेळेस गुप्त ठेवत (भले काही वेळेस विक्षिप्त व हुकूमशाही कारभाराचे आरोप झेलत) एक हाती कारभार यशस्वी करणं या नेत्यांना शक्य होतं. त्यांचं राजकारण हे एखाद्या राज्याच्या क्षेत्रफळाइतक्याच लहानशा प्रदेशातलं असल्यामुळे इतर कोणत्याही राष्ट्रीय नेत्यापेक्षा त्यांचा जनसंपर्क हा अधिक वेगवान व प्रभावी असतो. राष्ट्रीय नेत्यांना नेहमीच एका गुंतागुंतीच्या संघटनात्मक यंत्रणेत आणि हजारो नियमांच्या चौकटीत राहून काम करावं लागतं, परंतु प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचार आणि आप्तस्वकियांची भलाई केल्याचे आरोप झाले तरी त्यांना वरील यंत्रणांना टाळून जनतेची कामे मार्गी लावण्यात अधिक यश येतं. त्यामुळेच भाजप आणि काँग्रेसने शेतक-यांसाठी आणलेल्या योजनांपेक्षा तिकडे ओडिशामध्ये पटनायकांची लहान आणि मर्यादीत शेती करणा-या शेतक-यांना, भूमीहिन मजूरांना आणि संघटीत शेतक-यांना थेट पैसे मिळवून देणारी ‘कालिया’ योजना किंवा केसीआर यांची कृषीक्षेत्रासाठीची ‘रायतू बंधू’ योजना या जास्त यशस्वी ठरल्या यात नवल नाही. पश्चिम बंगालमध्येही ममतादींच्या ‘कन्याश्री” योजना खूप यशस्वी झाली ती याच कारणांमुळे.
हे प्रांतीय नेते त्यांच्या मतदारांना आवाहन करतात तेव्हा त्यांना त्यांचा ‘लक्ष्य’ वर्ग उत्तमरित्या माहिती असतो, अगदी लहान-सहान बाबींचा विचार करून केलेली धूर्त खेळी करत राजकीय-प्रशासकीय यंत्रणा निर्माण करत त्या वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे हे ही त्यांना माहित असतं. अशा या नेत्यांमुळेच पुन्हा एकदा तोच प्रश्न मनात उभा राहातो- मोदींच्या विरूद्ध कोण? या प्रादेशिक नेत्यांची ‘महा राजकीय मिसळ’ इतकी मोठी आहे की, भाजप अशा नेत्यांशी युती करण्याच्या विचारातच नाही आहे. ज्यांच्यावर मी हे सदर लिहिलंय. अशा कोणत्याही एका नेत्यांच्या जोडीला डिएमके, जगन मोहन रेड्डी किंवा चंद्राबाबू नायडू घ्या किंवा अगदी अखिलेश आणि मायावती ठेवून त्रिकूट बनवा. त्यातूनही त्यांना लोकसभा निवडणूकांमध्ये १५० जागा मिळण्याची शक्यता निर्माण होते. ज्यामुळे कोणत्याही बड्या राष्ट्रीय नेत्याला ते आव्हान ठरू शकतात. असं झालं तर महान संघटनात्मक देश बनू पाहाणा-या भारताची ती थट्टा असेल. काळाची विसंगती अशी की यावेळेस जर मोदी त्यांच्या २०१४ सालच्या भक्कम यशाची पुनरावृत्ती करू शकले नाहीत तर त्यांना देखील (जे एकेकाळी स्वत: गुजरातमधून उदयास आलेले प्रादेशिक नेते होते) या प्रादेशिक नेत्यांशी हातमिळवणी करत भविष्यातील मित्रपक्ष बनवावे लागेल. आणि म्हणूनच सध्या १९९० सालाप्रमाणे संयुक्त आघाडी सरकारसारखी स्थिती उद्भवणार नाही असा विचार केला तरी देखील २३ मे नंतर अस्तित्वात येणा-या सत्ताकारणात बड्या प्रादेशिक नेत्यांचा मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ता.क- अविवाहित राहिल्यामुळेच अहोरात्र स्पर्धा आणि संकटं असणा-या राजकारणाच्या खेळात यश मिळवणं शक्य होतं का असा प्रश्न नेहमी मला भंडावत होता, मात्र नवीन पटनायक यांची मुलाखत घेताना मी तो प्रश्न विचारण्यास विसरलो. थोड्याच दिवसांनी पटनायकांनी ट्विटरवर याचं उत्तर असं दिलं की अविवाहित राहणं हा कोणत्याही यशाचा मंत्र नाही किंवा तो मनुष्य एकटा आहे असंही नाही. ओदिशाची साडे चार कोटी जनता हे माझंच कुटुंब आहे. केवढं आश्वासक आणि चपखल उत्तर आहे हे ! मोदी देखील याच गटात मोडतात आणि कदाचित त्याचमुळे त्यांच्या समर्थकांना ते आदर्श म्हणून आकर्षक वाटत असावेत.
स्वैर अनुवाद- विशाखा शिर्के (या वरिष्ठ पत्रकार व भाषा संपादक असून त्यांनी सेज पब्लिकेशन्स इंडिया, ईटिव्ही मराठी न्यूज, आयबीएन लोकमत न्यूज, जोश १८ हिंदी न्यूज, सहारा समय न्यूज, दूरदर्शन सह्याद्री बातम्या, प्रहार, नवशक्ती या सारख्या वृत्तमाध्यमांमध्ये काम केलेले आहे.)
Updated : 28 April 2019 8:55 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire