जगणं महाग मरण स्वस्त
महिनाभरा पूर्वी तिचा नवरा गेला,घरातला एकमेव आधार गेल्यामुळे ती बाई कोलमडून गेली,.एक मुलगी आणी एक मुलगा, दोघेही वयाने लहान... मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश टिळेकरांनी व्यक्त केलेल्या या भावना नक्की वाचा. साभार मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या फेसबूक वाॅलवरून
X
काही दिवसांपूर्वी पुण्यात एका नातेवाईकांच्या घरी जेवायला गेलो होतो.आमच्या गप्पा सुरु होत्या, नातेवाईकांची लहान मुले टीव्ही वर कार्टून पाहण्यात रमली होती . त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या बाई मान वर न करता घरातील एक एक काम संपवत होत्या. त्यांच्या बरोबर आलेली त्यांची साधारण नऊ दहा वर्षाची मुलगी कोपऱ्यात एका स्टूला वर बसली होती, आमच्या गप्पा सुरु असताना माझं लक्ष तिच्याकडे अनेकदा गेलं, समोर टीव्ही वर कार्टून पाहणारी नातेवाईकांची मुले एन्जॉय करत होती, पण त्या कामवालीच्या मुलीची नजर एकदाही समोर टीव्ही कडे गेली नाही,शून्यात नजर लावून ती बसली होती, चेहरा पडलेला.
मी मुद्दाम तिच्याशी बोलता यावं म्हणून नातेवाईकांच्या मुलांसाठी जी मिठाई आणली होती, त्यातील तीला देण्यासाठी जवळ बोलावलं, तर ती तशीच बसून होती,दोन तीनदा बोलवूनही तर जागची तसूभरही हलली नाही..तिची आई पण सुतकी चेहऱ्यानं काम करत होती.. मायलेकी अश्या काय आहेत असा मला प्रश्न पडला चौकशी केली असता माझ्या नातेवाईकांनी मला सांगितले की महिनाभरा पूर्वी तिचा नवरा गेला,घरातला एकमेव आधार गेल्यामुळे ती बाई कोलमडून गेली,.एक मुलगी आणी एक मुलगा, दोघेही वयाने लहान ,बाप गेल्याच्या दुःखातुन् ती पोरं अजून सावरली नाहीत.
बाईंचा नवरा बांधकामावर मजूर म्हणून काम करायचा. इमारतीचं बांधकाम चालू असताना खालून वर डोक्यावरून विटा घेऊन जाताना तोल जाऊन तो खाली पडला आणी जागीच मरण पावला.कुणाचाही कसलाही आधार नसलेल्या कुटुंबातील एक कमावणारा माणूस गेल्यामुळे त्या बाई पुढे सगळा अंधारच.चार घरची धुनी भांडी करून एकटीच्या जीवावर ती पुढं चरितार्थ चालवणार कसा हा विचार मनात आल्यावर मी त्याबाईंना विचारलं "तुम्ही बिल्डर कडून काही भरपाई मागितली का? " त्यावर तीने उत्तर दिले " गरिबाला कोण दाद देतंय भाऊ? ." कामावर असताना तो गेला म्हणजे बिल्डरची पण जबाबदारी आहेच की " मी माझं मत मांडल्यावर तीने सांगितले की तीन चार वेळा बिल्डर कडे जाऊन तीने विनंती केली तरी बिल्डर एक लाख रुपयेच नुकसान देईन म्हणाला.
तिची आर्थिक परिस्थीती माहित असूनही बिल्डरला दया आली नाही. गेलेल्या माणसाच्या जीवाची किंमत फक्त एक लाख रुपये..हे ऐकून मी ज्यांच्या घरी बसून हे सगळं ऐकत होतो त्यामाझ्या नातेवाईकांना विचारलं तुम्ही का नाही त्या बिल्डरला भेटून दम दिला, यावर " आपण कशाला यांच्या भानगडीत पडा " असं उत्तर त्यांनी दिल्यामुळे त्यांना माणुसकीचे उपदेश देण्यात काही अर्थ नाही अशी मी माझीच समजूत काढत त्या बाईंकडून त्या बिल्डरचा नंबर घेऊन त्याला फोन केला " तुमचा काय यात संबंध " असं तिरकस पणे त्याने विचारल्यावर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिल्यावर, आणी कायदया ने काय काय करून पैसे कसे मिळवू शकतो हे सांगितल्यावर तो सुता सारखा सरळ झाला आणी तीन लाख रुपये भरपाई देईन म्हणाला, पण किमान पाच लाख तरी त्याने द्यावे यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.
हे पाच लाख रुपये मिळाले तरी गेलेला माणूस परत येणार नाही हे ही तितकंच खरं,माझ्याकडून खारीचा वाटा म्हणून त्या बाईंच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मी दिली आहे..पुढे जे जे शक्य आहे ते मी करीनच.. पण एक प्रश्न मला अजूनही सतावतोय काही श्रीमंतांच्या नजरेत गरीबाच्या जीवाला कवडीमोल किंमत का?