Home > मॅक्स ब्लॉग्ज > एक मोर्चा होऊन जाऊ दे!

एक मोर्चा होऊन जाऊ दे!

एक मोर्चा होऊन जाऊ दे!
X

मराठा कुणबी समाजातील एका मुलीने लग्नाच्या कारणावरून आत्महत्या केली. एरवी मला स्वत:ला कुणाची जात लिहिणे पटत नाही, पण या मुलीने स्वत: पत्रात जातीचा उल्लेख केल्यामुळे मी ती इथे लिहितोय. कारण तिची आत्महत्या आणि त्यानंतरची चर्चा यात ही जात हा महत्वाचा मुद्दा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंती दिनाच्या दिवशी आत्महत्या केलेल्या शीतलचं शेवटचं पत्र सगळीकडे व्हायरल झालं. डॉ. आंबेडकरांनी म्हटलं होतं. कुठल्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांची प्रगती किती झालीय यावरून लक्षात येते. काहीच काळापूर्वी मराठा समाजाचे राज्यभर अभूतपूर्व मोर्चे निघाले. आयोजनकर्ते जरी पुरूष असले तरी या मोर्चाचे नेतृत्व महिलांना देण्यात आलं. मराठा समाजातील क्रांती जर कुठली असेल तर ही होती. या मोर्चातून अपेक्षेप्रमाणे काहीच हाती लागलं नाही, नेतृत्व निर्माण झालं नाही, पण मराठा महिला मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडल्या, जे अनेकांना अशक्य वाटत होतं.

या मोर्चामुळे मराठा समाज एक झाला, जागृत झाला वगैरे वगैरे अनेकांनी दावे केले. मला मात्र तसं वाटत नव्हतं. शितलच्या आत्महत्येने माझा समज अधिक दृढ झाला. इतक्या मोठ्या प्रमाणावर समाज रस्त्यावर उतरल्यानंतर समाजामध्ये जागृतीही व्हायला हवी होती. मराठा समाजाच्या वैभवशाली परंपरांना आणि गत इतिहासाला चिटकून बसलेले अनेक जण हळूहळू प्रतिगामी होत चालल्याचं दिसत आहे. अनेक वाईट चालीरिती समाजामध्ये रूढ आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये याचं विशेष प्रतिबिंब पाहायला मिळतं.

हिंगोलीत डिसेंबर २०१५ ला एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो. त्या घरी पोहोचत असताना मध्ये एक लग्न घर ही लागलं. गावाला जेवण होतंच. त्याबाबत कुणाला काहीच वावगं वाटत नव्हतं. भर दुष्काळ त्यात गावजेवण... आपण दुसऱ्यांच्या लग्नात जेवलो तर परतफेड करायला हवी ही भावना. त्याही पेक्षा भयानक म्हणजे मुलगा तलाठी होता, त्यामुळे त्याचा जितका पगार तितकी जमीन हुड्यांमध्ये द्यायची, सोने, गृहोपयोगी वस्तू आणि पैसे वेगळेच. हाच कॉमन रेट आहे, त्यापलिकडे जाता येत नाही असं स्थानिक गावकऱ्यांनी सांगीतलं. शिक्षण घेतलेली मुलं जर असं वागत असतील, आणि दिवसेंदिवस शिकलेल्या मुलांची संख्या वाढणार असेल तर अशा किती शितलचा बळी जाणार आहे याचा विचार आपण करणार की नाही. तिथून पुढे आत्महत्याग्रस्त शोतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटलो. अंगावर कर्ज म्हणून आत्महत्या केली असं सांगीतलं गेलं होतं. खोलात जाऊन चौकशी केली तर कुटुंबाकडे पाच लाख रूपये होते असं कळलं. पाच लाख असून ७५ हजारासाठी आत्महत्या का केली असेल? घरात दोन मुली. त्याच्या लग्नातच तजवीज होती, त्यामुळे जीव गेला तरी त्या पैशांना हात लावायचा नाही. पैसे हातात असून आत्महत्या केलेले असे किती जण असतील?

मध्यंतरीच्या काळात औरंगाबादला डोळे दिपवून टिकणारे दोन लग्न सोहळा झाले. हातात पैसे होते किॅवा सोहळ्यावर पैसे लावणारे लोक होते म्हणून इतका खर्च केलाही असेल. पण या लग्नाच्या निमित्ताने त्यांच्या सामाजिक प्रभावावरही चर्चा व्हायला पाहिजे. अशा कोट्यवधी रुपयांच्या लग्नसमांरभ, त्यांची माध्यमांमध्ये होणारी चर्चा याचा एखाद्या गरीब शेतकरी, त्यांचा परिवार यावर काय प्रभाव पडत असेल? आपल्या बापाला पण इतका खर्च करावा लागेल का? याचं किती मुलींवर दडपण येत असेल? आम्ही नाही, मुलीकडच्या लोकांनी खरच केला असं बालिश खुलासे करणाऱ्या नेत्यांना याची जाणीव तरी असेल का? की यामुळे किती ठिकाणी आता मुलींकडच्याकडून खर्च करण्याची अपेक्षा वाढली असावी?

या राज्याने समाजसुधारणांच्या क्षेत्रात जगाला मार्गदर्शन केलं आहे. त्याच राज्यात ज्यांच्यावर सामाजिक, वैचारिक मार्गदर्शन करायची जबाबदारी आहे असे नेते आपल्या भिकार ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवतात. त्याचं समर्थन घडवतात. माध्यमांची तोंडं गप्प करतात. हे सर्वच चिंताजनक आहे. शितलच्या वडिलांकडून हुंडा मागणाऱ्या, लग्नांमध्ये भरमसाठ खर्च करणाऱ्या, तसंच खर्च करायला भाग पाडणाऱ्या, या प्रथांवर गप्प बसलेल्या समाजकारणी-पत्रकार-शिक्षक-प्रशासन-न्यायव्यवस्था या सर्वांवर शितलच्या खुनाचा दोष येतो.

मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने एकवटलेल्या मराठा तरूणांनी समाजातील अशा जीवघेण्या रूढी-परंपरांना तोडायला पुढे यायला हवं. नाहीतर तुमचे लाखाचे मोर्चे निरर्थक आहेत. तुमचे लाखाचे मोर्चे शीतलचा लाखमोलाचा जीव वाचवू शकले नाहीत. कोपर्डीतल्या बहिणीसोबतच शीतल ही तुम्हाला न्याय मागतेय. बघा काही जमलं तर!

  • रवींद्र आंबेकर

Updated : 15 April 2017 3:46 PM IST
Next Story
Share it
Top