Home > मॅक्स ब्लॉग्ज > …पियाका घर प्यारा लगे! - श्रीनिवास बेलसरे

…पियाका घर प्यारा लगे! - श्रीनिवास बेलसरे

गणेशोत्सव जवळ आला आहे आणि त्यानंतर लगेच नवरात्रौत्सव देखील आहे. आणि नवरात्रौत्सवात रंगणाऱ्या गरब्यात हमखास वाजणारं गाणं म्हणजे लता दिदींच्या आवाजातलं 'पिया का घर प्यारा लगे'! हे प्रसिध्द गाणं प्रत्येकाला ऐकल्यावर छान वाटतं पण या गाण्यामागचा इतिहास आणि त्यावेळेसची परिस्थिती पाहता हे पुर्णतः विरोधाभासी होतं पण का? हेच जाणून घेण्यासाठी वाचा श्रीनिवास बेलसरे यांचा हा लेख!

…पियाका घर प्यारा लगे! - श्रीनिवास बेलसरे
X

गुजराथी कादंबरीकार गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांच्या 'सरस्वतीचंद्र' नावाच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा सिनेमा आला होता १९६८साली. नूतन आणि 'मनीष' (मुळचे बंगाली नाट्यकलाकार अशीमकुमार) यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही शोकांतिका दिग्दर्शित केली होती गोविंद सरैयांनी! सुरवातीला ते कुमुदच्या भूमिकेसाठी निम्मीचा विचार करत होते. तर सरस्वतीचंद्रसाठी चक्क दिलीपकुमार आणि राजेंद्रकुमारचाही विचार झाला होता. हा सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात असण्याचे मुख्य कारण त्यातली शामलाल बाबू राय उर्फ 'इंदीवर' यांची भावमधुर गाणी! इंदीवर आणि कल्याणजी आनंदजी यांनी ती अजरामर केली आहेत. मात्र गंमत म्हणजे सुरवातीला गीतकार म्हणून गोविंद सुरैयांच्या मनात होते पंडित ओमकारनाथ ठाकूर पण दुर्दैवाने त्यांचे १९६७लाच निधन झाले.

सिनेमात रमेशदेव, सीमा, सुलोचना हे मराठी कलाकारही होते. सरस्वतीचंद्रने चार पुरस्कारही पटकावले! राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (१९६९) शिवाय सर्वश्रेष्ठ छायांकनासाठीचा पुरस्कार नरीमन इराणी यांना तर सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार कल्याणजी-आनंदजीना मिळाला! शिवाय १९६९चा फिल्मफेयरचा संवादलेखनाचा पुरस्कार मिळाला अली रज़ा यांना!






सरस्वतीचंद्र ही एक तरल पण अपयशी ठरलेल्या प्रेमाची कहाणी होती. यात इंदीवर यांना त्यांच्या खास शैलीत भावविव्हल कविता लिहिण्याची जणू पर्वणीच मिळाली! मुकेश आणि लतादीदीने एकेकदा गायलेले, 'चंदनसा बदन चंचल चितवन, धीरेसे तेरा ये मुसकाना', असो किंवा मुकेशच्या नितळ आवाजाने अस्वस्थ करणारे 'हमने अपना सबकुछ खोया प्यार तेरा पानेको' असो किंवा मुकेश आणि दीदीचे द्वंद्वगीत 'फुल तुम्हे भेजा हैं खतमे, फुल नही मेरा दिल हैं' असो ही गाणी मनाला आतून बाहेरून मोहरून टाकत.

असेच एक गाणे होते दीदींच्या निरागस आवाजातले- "मैं तो भूल चली बाबुलका देस, पिया का घर प्यारा लगे." कल्याणजी-आनंदजींचे संगीत, विशेषत: चाल इतकी जबरदस्त आहे की १९६८पासून आजतागायत हे गाणे गरब्याच्या प्रत्येक कार्यक्रमात वाजतेच वाजते! गंमत म्हणजे गाण्यातील प्रत्येक ओळ साफ खोटी आहे.

नायिका कुमुद (नूतन) आपल्या सासरचे असे वर्णन करते आहे की ऐकणा-याला वाटावे मुलगी सासरी अतिशय सुखाने नांदते आहे. तिला माहेरची आठवणही येत नाही. ती 'बाबुलका देस' पूर्णपणे विसरुन गेली आहे. सिनेमात परिस्थिती अगदी वेगळी आहे.





कुमुदला सासरी तिळमात्र सुख नाही. तिचा पती असलेला प्रमाद (रमेश देव) हा दारुडा, बाहेरख्याली आहे. त्याला कसलीच लाज वाटत नाही. तो पत्नीला आपल्या व्यसनाविषयी सांगून हे सगळे मुकाट चालवून घे असे म्हणतो. पत्नीचा सन्मान हे शब्द त्याच्या शब्दकोशातच नाहीत. तरीही कुमुद आपला संसार छान चालला आहे असे भासवण्यासाठी हे गाणे गाते. सासरी सगळे अगदी स्वप्नवत सुंदर आहे असे भासवताना ती म्हणते- "मैं तो भूल चली बाबुलका देस, पियाका घर प्यारा लगे, कोई मैकेको दे दो संदेस, पियाका घर प्यारा लगे..!"

खरे तर त्याकाळी ही घराघरातलीच कहाणी होती. विवाहित महिला सासरचे मनमोहक चित्र उभे करून गरीब आईवडिलांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून अनेकदा खोटेच बोलत. समाजात अनेक कुप्रथा रूढ असल्याने कुणाही स्त्रीचे सासर असे असणे जवळजवळ अशक्य होते. याला अपवाद नेहमीच असतात तसे तेंव्हाही होते. मात्र सर्वसाधारण चित्र हे गाण्यात वर्णन केलेल्या परिस्थितीच्या नेमके उलटे असायचे.






नणंद म्हणजे पतीची बहिण आपल्याला बॉसिंग करायला एक हक्काचे पात्र मिळाल्यासारखे वहिनीला वागवायची. तिच्याबद्दल तक्रारी करणे हे जणू आपले कर्तव्य आहे असे तिला वाटे. दुस-या कुटुंबातून आलेल्या, नव्या घरात बावरलेल्या या मुलीने अंतर्ज्ञानाने आपले मन ओळखून आपल्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, आपली सेवा करावी अशीच सासू आणि नणंद नावाच्या दुस-या स्त्रियांची अपेक्षा असे!

फारशा स्त्रिया नोकरी करत नसल्याने त्यांना २४तास घरातच राहावे लागे. सर्वांची सेवा, आज्ञापालन, भरपूर शारीरिक कष्टाची कामे हा त्यांचा दिनक्रम असे. घरात सदस्यसंख्याही मोठी असल्याने पतीची एकट्याची भेटसुद्धा क्वचित होई. अनेकदा तर त्यालाही पुरुषी अहंकाराने घेरलेले असे. तो स्वत:ला पत्नीचा मालकच समजे. गीतकार इंदीवर यांनी समाजमनाच्या फळ्यावर असलेले हे सर्वसाधारण चित्र ओल्या फडक्याने पुसून भिजवलेल्या खडूने एक सुंदर स्वप्नचित्र उभे केले होते-

ननदीमें देखी है बहनाकी सूरत, सासूजी मेरी है ममताकी मूरत, पिता जैसा, ससुरजीका भेस... कुमुद म्हणते माझा दिवसही खूप सुखात जातो आणि रात्रही आनंदात जाते. कारण माझा पती मला अतिशय प्रिय आहे. माझे मन आणि त्याचे मन इतके एकरूप झाले आहे की त्याच्या मनातली गोष्ट मला नुसते त्याच्या डोळ्याकडे बघूनही कळते...

चँदा भी प्यारा है सूरज भी प्यारा, पर सबसे प्यारा है सजना हमारा, आँखें समझे जियाका संदेस, पियाका...पतीला मी इतकी आवडते, की ते सतत डोळ्यात डोळे घालून एकटक मलाच पाहत बसतात. त्यांना माझा सहवास सतत हवा असतो, मला क्षणभरही एकटे सोडत नाहीत. खरेच माझ्या जीवाला सासरी काहीही त्रास नाहीये. मी माहेर पूर्णपणे विसरून गेलेले आहे-

बैठा रहे सैयां नैनोंको जोड़े, इक पल वो मुझको अकेला ना छोडे, नहीं जियाको कोई क्लेश, पिया का घर प्यारा लगे...

आज परिस्थिती बदलली आहे. अनेक घरात तर चक्क स्त्रीराज्यही अवतरले आहे. पण कधीकधी जुन्या आठवणी प्रियच वाटतात. इंदीवरजी, आपका लिखा हुवा 'पिया का घर, आज भी बडा प्यारा लगे!'

*

©श्रीनिवास बेलसरे

७२०८६३३००३

Updated : 15 Aug 2022 6:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top