Home > मॅक्स ब्लॉग्ज > महसूल प्रशासनातील भाषा

महसूल प्रशासनातील भाषा

आपण तलाठ्याच्या ऑफिसमध्ये, तहसिलदारांच्या ऑफिसमध्ये, मंत्रालयात गेल्यानंतर काही विशिष्ट शब्द कानावर पडत असतात. नक्की हे शब्द कोणते आहेत. या शब्दाचा अर्थ काय आहे. वाचा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा लेख...

महसूल प्रशासनातील भाषा
X

मराठी भाषा दिन साजरा करीत असताना शासनाचा सर्वात जुना असलेला महसूल विभाग व त्यामधील वापरले जाणारे काही शब्द अभ्यासणे अतिशय उद्बोधक ठरेल. ब्रिटिशांच्या काळात जंगलामधील उत्पादन आणि जमीन महसूल याचे उत्पन्न या दोन महत्त्वाच्या उत्पन्नाच्या बाबी होत्या. स्वातंत्र्यानंतर मात्र विकासात्मक कामांना महत्त्व आले. तसे महसूली शब्दांचा वापर आणि महत्त्व देखील बदलत गेले. स्वातंत्र्याच्या पूर्वी न्याय देण्याचे काम सुद्धा महसूल अधिकाऱ्यांकडे होते. त्यामुळे क्षेत्रीय महसूल अधिकारी म्हणून तर कधी न्यायाधीश म्हणून त्यांना काम पहावे लागले. त्यामुळे देखील अनेक महत्त्वाचे शब्द शासकीय परिभाषेत आले. महसूल प्रशासन यामधील हे शब्दच गेल्या १५० वर्षाचे समाजाचे स्थित्यंतर दर्शवू शकतील. अशा शब्दांत मुळेच प्रशासनाचे इंद्रधनुष्य अधिक सप्तरंगी झाले आहे.

"गायरान" हा शब्द गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना मुक्तपणे चारण्यासाठी ठेवलेली सार्वजनिक जागा दर्शवितो. प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनी बागायत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांची गुरे चरण्यासाठी अशी जागा मोठ्या गावांमध्ये ठेवण्यात आली. हळूहळू या काळातच प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील एक माणूस हा गुराखी म्हणून गुरे राखण्यासाठी सकाळी भाकरी बांधून घेऊन जात असे. एखाद्या वाडीवरील सर्व शेतकऱ्यांची जनावरे त्यामुळे एकत्रित रीत्या मोठ्या जंगलामध्ये किंवा गायरानामध्ये चरायला नेत.

अशावेळी गुराख्यांचे मुख्य काम हे जनावरे वळणे व कोणाच्या शेतात न जाऊ देणे असे असायचे. हळूहळू जनावरांची संख्या कमी होत गेली. तसतशी गुरे राखणाऱ्यांची संख्या पण कमी झाली. काही शतके घरातला अडाणी असलेला भाऊ हे काम करीत असे. परंतु एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आल्यानंतर व मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्यामुळे लोक स्थलांतरित होत गेले. आणि गुरे राखण्यासाठी सुद्धा माणूस शेतकऱ्यांच्या शेतात उरला नाही. आता शंभर वर्षानंतर "गायरान" शब्दाकडे बघायचे झाल्यास गवताची काडी देखील न उगवणारी व तरीसुद्धा जनावरांना चरण्यासाठी ठेवलेली जागा अशी तिचे स्वरूप उरलेले आहे. गावातील प्रस्थापित लोकांनी हक्काने अतिक्रमण करून या जागेचा वापर केल्याने देखील स्पष्ट होते.

दवंडी - दवंडी हा असाच एक केवळ कागदावर उरलेला शब्द. तब्बल पाच हजार वर्षापूर्वी सुद्धा व राजाचा काळात सुद्धा राजाचा हुकूम दवंडीने लोकांना सार्वजनिक रित्या सांगण्याची पद्धत होती. दवंडी देण्यासाठी खास गावात माणूस नेमला जाई. नवीन आलेला कोणताही नियम किंवा हुकूम लोकांना सांगण्यासाठी जसा दवंडीचा वापर केला. तसेच तो स्वातंत्र्यानंतर विविध प्रकारचे आजार, साथीचे रोग, जमिनींचे लिलाव, विक्री इत्यादी. कामे करताना महसूल यंत्रणेकडून दवंडी देऊन लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला.

गेल्या 30 ते 40 वर्षात ही दवंडी कोणी पाहिलेली नाही किंवा ऐकलेली पण नाही. तरीसुद्धा सर्रासपणे विविध न्यायालयात सुद्धा दवंडी चा उतारा मागितला जातो. आणि तलाठी सुद्धा सदर गावात दवंडी द्वारे नोटीस प्रसिद्ध केल्याचा अहवाल कागदोपत्री सादर करतात. प्रत्यक्ष कातडी लावून तयार केलेली दवंडी ही कशी दिसते हे माहित सुद्धा नाही.

पांढरी आणि काळी –

हे दोन शब्द सुद्धा असेच आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत. गावठानामध्ये पांढरी शाडूची माती आणून धाब्याची घरे बांधण्याची पद्धत होती. पांढरी माती ही रंगाने पांढरी व निब्बर असते. आणि ती पाणी धरून ठेवत नाही आणि त्यामुळे धाब्यांचा घरावर लाकडी रिफाडाच्या वर पांढरी माती टाकण्याची पद्धत होती. त्याविरुद्ध शेत जमीन मात्र, काळ्या रंगाची असते. म्हणूनच तिला काळी, काळी आई किंवा रान किंवा शिवार असे म्हणतात. यावरून "मी या पांढरीत जन्माला आलो आणि काळीमध्ये राबलो" असा वाक्यप्रचार आला.

जुन्या कागदपत्रांमध्ये काळी आणि पांढरी मिळून झालेला गावाला "देह" असे संबोधले जाते. गावाचे काळी आणि पांढरी जसे भाग पडतात तसे लोकवस्तीचे 'कुणबी' आणि 'आडानी' असे भाग पडतात. कुणबी याचा अर्थ शेतकरी आणि अडाणी म्हणजे बिगर शेतकरी. कुणबी म्हणजे कोणीबी असे संबोधले जाते. कुणबी, कणबी, किरसान हे शब्द संस्कृत कृषी किंवा कृषीवर शब्दांपासून निघाले असावेत. तर काही लोक म्हणतात कुणबी म्हणजे 'कुनमी' म्हणजेच पृथ्वीला नमन करणारा.

अकबराच्या काळात राजा तोरडमल यांनी जमिनी मोडल्या आणि जमिनीवर कर वेगळा बसविला. निजामशाही मध्ये चांद बिबीचा नोकर मलिक अंबर याने मोजणी करून प्रतवारी ठरविली. जमीन करणाऱ्या कुणब्यांची मालकी बनवून त्यांना जमिनीच्या खरेदी विक्रीचा हक्क दिला पाटील, कुलकर्णी व गावातील काम करणारे इ. यांचे वेतन 'मिरास' करून वंशपरंपरेने करून दिले. त्यामुळे कुटुंबांकडे असलेल्या जमिनीला मिरासदार किंवा वतनदार असे म्हटले जाऊ लागले. पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने मिळत राहणाऱ्या या जमिनीला त्यामुळे "मिरासी" असे म्हणत. त्यामुळे तुकोबा म्हणतात,

"हे माझे मिरासी। ठाव तुझा पापाशी।।"

मुंबई प्रांतात १८७९ साली मुंबई जमीन महसूल कायदा आला. त्यामध्ये जनतेला जमिनी देताना काही अटी शर्तीवर देण्याची तरतूद आली. परस्पर अशा जमिनी लोकांना विकू नये. हा त्यामागे हेतू होता. अशा जमिनी परस्पर विक्रीचा हक्क ज्या लोकांना आहे. त्यांना जुनी शर्त व ज्यांना नाही त्यांना नवीन शर्तीची जमीन असे मानले गेले. महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन समृद्ध करणारे अलूते, बलुते, थोरली, मधली, धाकटी, कास मुकादमांना असे गाड्यांमध्ये अनेक शब्द आहे.

राजेशाही पासून इंग्रजांचे राज्य येईपर्यंत गावचा कारभार पाहणारे कारभारी व त्यांची नावे पाहिले तर मराठी मध्ये किती तरी शब्दांची भर पडलेली दिसून येते. राव, प्रधान, पाटील, नाईक, खोत, महालकार, देसाई, मुकादम, मानकर, कारभारी, महाजन, मेहतर, हवालदार, कोतवाल, मामलेदार असे अनेक शब्द प्रशासनामध्ये आणि जनमानसामध्ये सुद्धा रुजले !

जमीन महसूल नियंत्रित वेगवेगळी पदे सुद्धा हळूहळू विकसित होत गेली. भूमिधारी, भूमिस्वामी, सनदी, इनामदार, सरंजामदार, दुमालदार असे अनेक शब्द आले. भौगोलिक क्षेत्र ठरवणारे असे अनेक शब्द सुद्धा प्रशासकीय कामांमुळे यथावकाश स्थिरावले. त्यामुळे महाल, तालुका, तरफा, वाडी, वस्ती, असे शब्द आले. म्हणून या शब्दांवरून त्यांच्या अंमलदाराचे पाटील, देशपांडे, देशमुख, महालकरी, नाईक, सरदेशपांडे, सरदेशमुख, सरपाटील, सरमामलेदार, मोकाशी, मजुमदार अशी वेगळे शब्द आले.

सरकार उपयोगी वतनदारांनमध्ये गावकरी मुकादम, शेट्टी, नाईक, पटवारी, खोत, रयत, वतनदार, जंगम, जोशी, सुतार, लोहार इ. अनेक शब्द आहेत. जमिनी महसुलाचा एकत्र एका गावचा पूर्ण हिशोब झाला की, त्याला जमाबंदीचा हिशोब म्हणत. हा हिशोब पाटलांनी मान्य केल्यानंतर त्याला कबूल किताब देत. फौजदारी व्यवहाराचा निर्णय करणारा गोतू, दशक, न्यायाधीश व राजा या संस्था होत्या.

पंचनामा हा सुद्धा पाच जबाबदार नागरिकांनी एकत्र येऊन वस्तुस्थितीची खरी जाणीव व्हावी म्हणून केलेला दस्तऐवज आहे. आजही हे पंचनामे पोलीस आणि महसूल यंत्रणेकडून सर्व महत्त्वाच्या प्रकरणी केले जातात. जमिनीच्या रेकॉर्डची या संदर्भात शेतावर पत्रक, खतावणी, लावणी पत्रक, कीर्द, चलन, ताळेबंद, ठरावबंद असे शब्द आजही तलाठी दप्तरात नोंदलेले आहेत .

स्वातंत्र्यानंतर तर जमीन महसूल कायदा १९६६ आला. त्यामध्ये वहिवाटदार, भूमापन क्रमांक, पैसेवारी, आणेवारी, फेरफार, पोटखराब, भूमिहीन व्यक्ती पोट हिस्सा, आकार, दंड, नागरीक्षेत्र, शासकीय पट्टेदार असे अनेक शब्द जमिनींचा रेकॉर्डमध्ये व गाव दप्तरामध्ये आले.

महसूल खात्यात शब्दांच्या वापराबद्दल अनेक किस्से आहेत. एकदा एका तहसीलदारांकडे वीटभट्टीला रॉयल्टी भरून माती नेण्याची परवानगी मागण्यात आली. त्यावर तहसीलदार यांनी "या माणसाला पूर्वी कधी माती दिली होती?" अशी विचारणा केली. मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करीत असताना अशा प्रत्येक शब्दाबद्दल आणि या शब्दामागे असलेले महत्त्व हे सांस्कृतिक ठेवा म्हणून नव्या पिढीला समजेल नाही तर शब्दांबरोबरच त्यामधून मिळणारा एक समृद्ध वारसाला देखील आपण मुकू असे उगाचच वाटून जाते.

Updated : 27 Feb 2021 3:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top