लालबहादूर शास्त्री एक अविश्वसनीय दंतकथा उरली आहे का?
साधेपणा, भ्रष्टाचार हा मुद्दा तुमच्या देशात आऊटडेटेड झालाय का? गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची मूल्ये इतिहास जमा झाले आहेत का? महापुरुषांच्या विचार, मूल्ये फक्त फेसबुक, व्हॉट्सअपवर शेअर करण्यापूर्ती मर्यादित झाले आहेत का? जनतेनं भ्रष्टाचारी व्यवस्था स्विकारली आहे का? वाचा हेरंब कुलकर्णी यांचा लेख...
X
साधेपणा व भ्रष्टाचार हा मुद्दा तुमच्या देशात आऊटडेटेड झालाय... गांधीजींबरोबर आज लालबहादुर शास्त्री यांचे स्मरण होते आणि विश्वास बसणार नाही अशा अनेक साधेपणाच्या त्यांच्या कहाण्या अनेक जण लिहितात सांगतात. लालबहादूर हे त्या साधेपणाने प्रतिक झाले आहेत परंतु गांधी आणि लालबहादूर शास्त्री ज्या साधेपणासाठी आपल्या लक्षात राहतात. तो मुद्दा आता जवळपास आऊटडेटेड झालाय.
ममता बॅनर्जी किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे काही प्रयत्न हे वगळता एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारी नसणे संपत्तीची उधळण न करणे आणि साधेपणाने राहणे ही मूल्य जवळपास बाद झाली आहे की काय असेच वाटत राहते. गणपतराव देशमुख नष्ट होणाऱ्या प्रजातीतील शेवटची वनस्पती असे मी लिहीलं होतं तेच दुर्दैवाने आज खरे आहे.
पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री या सर्वांची घरे कार्यालय आणि राहणीमान यासाठी सरकारला करावा लागत असलेला प्रचंड खर्च, मंत्रीमंडळ स्थापन झाले की, हमखास फर्निचरसाठी होणारा प्रचंड खर्च याच्या बातम्या, दिल्लीतील प्रत्येक कार्यक्रमातील प्रचंड उधळपट्टी हे सारे बघितले की गांधी- लालबहादूर यांच्या त्या मूल्याचे काय झाले असा प्रश्न पडतो.
दिल्ली-मुंबईतली उदाहरणे सोडा अगदी ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार हे सुद्धा या साधी राहणे पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. अनेकांच्या गाड्या बदलतात घरे पाडून नवी बांधली जातात हातातील मोबाईल पासून सगळ्या गोष्टी बदलत जातात हे सारे करण्यासाठी पैसा कुठून येतो हा मुद्दाच आता राजकारणात बाद झाला आहे. तुम्ही साधे आहात म्हणजे तुमची राजकीय शक्ती नाही असाच एक समज सर्वसामान्य माणसांमध्ये ही पसरला आहे. त्यामुळे राजकीय नेतेही अनैतिक मार्गाने संपत्ती कमावणे आणि त्या संपत्तीचे प्रदर्शन करून आपली ताकद दाखवणे असे करत राहतात.
निवडणुका महाग होत गेल्या. त्यामुळे निवडून येण्यासाठी आम्हाला हे करावेच लागते अशी क्लीन चिट गाव पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत राजकीय नेत्यांनी स्वतःला देऊन टाकली व जनतेनेही ते स्वीकारले आहेत अशीच आजची स्थिती आहे. नेता भ्रष्ट असला तरी चालेल पण तो कार्यक्षम आहे ना अशा प्रकारचे समर्थन कार्यकर्ते गावपातळीवर करत राहतात व त्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रार करण्यापेक्षा त्या व्यवस्थेत वाटेकरी होण्याचा प्रयत्न करतात. त्यातून नोकरशाही अधिकच बेताल झाली व राजकीय कार्यकर्ते व नेते अधिकारी दोघे मिळून आज भ्रष्टाचार करत आहेत.
त्यामुळे नेत्यांच्या मुला मुलींच्या लग्नाची मध्ये संपत्तीचे प्रदर्शन, जेवणावळी, त्यांचे होणारे वाढदिवस यात खर्च होणारा पैसा नेते कुठून आणतात ? हा प्रश्न्ही कुणाला पडत नाही.
भ्रष्टाचाराचा मुद्दा ही बाद झालाय. जीप खरेदी वरून पंडित नेहरू यांच्या सरकारवर प्रचंड टीका झाली होती फक्त 65 कोटीच्या बोफोर्स दलाली चर्चेवरून या देशातील सरकार गेले होते पण आज राफेल,सिंचन घोटाळा, इतर अनेक प्रकरणांच्या बद्दल चर्चा सुद्धा होत नाही. इतका सन्नाटा आहे याचे कारण सर्वसामान्य माणसांनी हे हतबल होऊन ही व्यवस्था स्वीकारली आहे व समोर पर्याय म्हणून लालबहादूर शास्त्री ही दिसत नाहीत त्यातून एक अगतिकता जाणवत राहते आणि एखाद्या गणपतराव देशमुख यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करणे किंवा लालबहादूर शास्त्री सारखे इतिहासातले आदर्श आठवत राहणे इतकेच सामान्य माणसांच्या हातात उरले आहे..
महात्मा गांधींचा एकदा रुमाल हरवला तर आश्रमातून नवा रुमाल घ्यायला त्यांनी नकार दिला कारण तो जनतेचा पैसा आहे. त्यामुळे मी कसेही वागू शकत नाही असे ते म्हणाले होते. हे प्रसंग काही दिवसांनी व्हाट्सअप किस्से विनोद म्हणून फिरतील... ' मी नाही तर माझ्या पुढच्या पिढ्या सुद्धा जनतेच्या पैशावर जगतील अशा महत्त्वाकांक्षेने झपाटून टक्केवारी आणि हप्ते करीत आयुष्य काढणाऱ्या राजकारणात गांधी विनोबा, लालबहादूर यांना आठवणे ते खूप वेदनादायक असते...
व्यवस्था बदलायला निघालेले राजकीय नेते त्या व्यवस्थेचा भाग कधी होऊन जातात ते त्यांनाही कळत नाही. त्यामुळे लालबहादूर शास्त्री एक अविश्वसनीय दंतकथा उरली आहे.......
हेरंबकुलकर्णी
8208589195