Home > मॅक्स ब्लॉग्ज > घरातील 'लक्ष्मी', आता झाली 'नकोशी'

घरातील 'लक्ष्मी', आता झाली 'नकोशी'

घरातील लक्ष्मी, आता झाली नकोशी
X

आधी "मुलगी झाली हो, घरात लक्ष्मी आली हो, असं म्हणत घरातल्या चिमुलकीचे स्वागत व्हायचं. मात्र, दिवसेंदिवस मुलींच्या जन्मदरात घट होतांना दिसतेय. कन्यारत्न प्राप्त झालं की घरात "लक्ष्मी" आली असं म्हणायचं. मात्र, तीच लक्ष्मी आता "नकोशी" झाल्यानं तिला दूर करत आहेत. आपल्या राज्यात मुलींसाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्या. "लेक लाडकी योजना" लेक वाचवा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘सुकन्या समृद्धी’अशा मुलींच्या भविष्यासाठी योजना सुरू करण्यात आल्यात. मात्र, मागील ३ वर्षात मुलींची घटणारी संख्या चिंताजनक आहे.

मुलगी झाली म्हणून गावभर हत्तीवरून साखर वाटणं असो की हेलिकॉप्टरमधून नवजात मुलीला, नातीला घरी आणणारे पालकही आपण पाहिलेत. अशी कन्येच्या जन्माचं मोठ्या उत्साहात स्वागत करताना आपण अनेकांना पाहिलंय. अशी आदर्श उदाहरणं आजही बघायला मिळतात. मुलींसाठी शिक्षण ते नोकरी, व्यवसाय आणि उद्योगात विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत. असं असतानाही देशातील अनेक जिल्ह्यात मुलांच्या आणि मुलींच्या जन्मदराचा समतोल साधता येत नाहीये. महाराष्ट्रातही काहीशी अशीच स्थिती असून २०२०-२१ मध्ये एक हजार मुलांमागे ९४० मुली अशी संख्या होती. मुलींची हीच संख्या २०२१-२२ मध्ये ही संख्या ९३३ होती. मात्र, आता २०२२-२३ मध्ये ही संख्या घटून ९३२ पर्यंत घसरलीय.

हम दो हमारे दो, लहान कुटुंब, सुखी कुटुंब या संस्कृतीत मुलगा हवा अशी मानसिकता अनेकांची पूर्वीपासूनच आहे. दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेल्या स्त्रियांच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हटलं जातं. २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे. मात्र, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागील काही वर्षात बेकायदेशीररित्या लिंग निदनाचे प्रमाण वाढले आहे. त्या कारणाने "मुलगाच हवा"या मानसिकतेनुसार मुलीचा गर्भ खुडला जातो. लिंग गुणोत्तराचे प्रमाण असेच सुरु राहिले तर यात समाजाचा समतोल बिघडू शकतो. सध्या मुलींचे प्रमाण कमी होत असल्यानं लग्नाला मुलीच नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

२०२१ च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, हिमाचलप्रदेश, मध्यप्रदेश , मणिपूर, महाराष्ट्र यांसारख्या अनेक देशात मुलींच्या संख्येत घट आहे. तर लडाख सारख्या केंद्र शासित प्रदेशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. देशभरातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण किती हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात...

राज्य २०२०-२१ -२०२१-२२- २०२२-२३

महाराष्ट्र- ९४०- ९३३ -९३२

आंध्र प्रदेश- ९४५ -९५२- ९४५

अरुणाचल प्रदेश -९३१- ९३३- ९३२

बिहार- ९१७- ९१५ -८९५

छत्तीसगड -९६५- ९६१ -९५८

दिल्ली -९२७- ९२४ -९१६

हरियाना- ९२७- ९२० -९१८

हिमाचल प्रदेश- ९४४- ९४१ -९३२

झारखंड -९३५ -९३५ -९३४

कर्नाटक -९४९- ९४०- ९४५

मध्य प्रदेश -९३९ -९२९ -९३२

ओडिशा -९३६ -९३८ -९३६

तमिळनाडू -९४८ -९४७ -९४७

पश्‍चिम बंगाल -९४९ -९४३ -९३२

आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता आहे असं म्हटलं जात. प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांना टक्कर देत आपल्या अस्तित्वाची लढाई देत आहे. मात्र, अशा सर्व घटनांमुळे मुलींचा घटता जन्मदर हा स्त्री शक्तीला कमकुवत करतांना दिसतोय. त्यादृष्टीनं सामूहिक प्रयत्नांतून जन्मदराची ही दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यानिमित्तानं जाणवतेय.

- गौरी बैकर


Updated : 17 Sept 2023 5:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top