ऊसाच्या मळीची गोष्ट
ग्रामीण भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मजूर मिळत नाहीत. अशातच जर मळी उचलायची असेल तर... मजूर किती पैसे वाढवून मागतात. आणि शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागतात. याचा अनुभव लेखक आणि शेतकरी महारुद्र मंगनाळे यांनी शेअर केला आहे.
X
आमचे शेजारचे शेतकरी लक्ष्मण सारोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतात साखर कारखान्यातील ऊसाची मळी (प्रेसमड)घालतात. उत्पन्नही विक्रमी काढतात. त्या मळीचा काही दिवस भयंकर घाण वास येतो. त्या वासानं आम्हाला अस्वस्थ व्हायचं. चार वर्षांपूर्वी ते थेट शेजारी नव्हते. मळीचं अंतर लांब होतं. येता-जाता त्या मळीचा वास यायचा. पण नंतर त्यांनी त्यांच्या भावकीची रुद्राहटच्या बाजुचीच दोन-अडीच एकर जमीन विकत घेतली. ते शेजारी बनले. या जमिनीतही दरवर्षी मळी पडू लागली.
याचा पहिली दोन वर्षे तरी खूपच त्रास झाला. मात्र, पुढे याचा मला बऱ्यापैकी सराव झाला. गतवर्षीपासून हर्ष रुद्राहटला राहू लागलाय. त्याच्यासाठी हा वास नवीन होता. तो म्हणायचा, त्यांना ही मळी टाकू नका असं सांगा ना बाबा... किती घाण वास येतोय.
मी त्याला समजावून सांगीतलं की, ही मळी म्हणजे पिकाचं अन्न आहे. याच्यामुळं उत्पन्न वाढतं... आणि काही दिवसातच हा वास आपोआप बंद होईल. त्याला ते पटलं असावं. खरं तर, त्याच्यापेक्षा मलाच अधिक त्रास व्हायचा. पण मी ते स्वीकारलं होतं.
आमच्या मळ्यातील तीन एकर रान चिबाड आहे. या जमिनीच्या डोक्यावर विहीर आहे. सरासरीपेक्षा थोडासा जरी जास्त पाऊस झाला तरी, वावरात पाणी लागते. चिखल होतो. तिन्ही बाजूने खोल कालवे काढले तरी फारसा फरक पडला नाही. कोणाच्या तरी शिफारशीवरून जिप्सम नावाचा खत टाकून बघितला पण त्याचाही उपयोग झाला नाही. पाणी लागतयं म्हणून एकदा ऊस लावला. सलग दोन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. मोठा फटका बसला. पुन्हा सोयाबीनकडं वळावं लागलं.
ऊसाच्या मळीत खूप उष्णता असते. चिबाड रानात ती टाकली तर, पाणी लागायचा त्रास कमी होईल, असं बऱ्याच जणांनी सुचवलं होतं. त्यामुळे या रानात मळी टाकायचा किडा वळवळत होता. पण योग येत नव्हता. यावर्षीही शेजारी सारोळे यांची मळी वाहतूक चालू होती.
नरेश म्हणत होता की, त्यांच्या सोबत आपल्या ट्रँक्टरने मळी आणतो. आमच्या २८एचपी च्या ट्रँक्टरमध्ये जास्तीत जास्त ४ टन मळी येणार होती. २५किलोमीटर अंतरावरून दर खेपेला ४ टन मळी आणणं व्यवहार्य नव्हतं. तो विचार रद्द केला. कारखान्याशी संपर्क साधला. त्यांनी शेतात मळी येऊन पडण्याचा दर सांगीतला ७८६ रूपये टन. मी होकार दिला. तीन एकरमध्ये ८० टन मळी टाकली. वावरात प्रत्येक ट्रकमधील मळीचे त्यांनी चार ढिग टाकले. दोन दिवसात त्याचं काम संपलं.
गेल्या आठवड्यात शेतात ही मळी पडली तेव्हा पावसाळी वातावरण होतं. त्यामुळे ही मळी सगळ्या वावरात पसरवणं गरजेचं होतं. रोजंदारीवर बायका मिळणं मुश्कील होतं. मी गुत्ते पध्दतीने काम करणाऱ्या माझ्या ओळखीच्या दत्ता नावाच्या व्यक्तीला फोन केला. त्यांची सहाजणांची टोळी आहे. तासाभरात मोटारसायकलवर एका सोबत्याला घेऊन तो आला. मी म्हटलं, तुम्हाला प्रत्येकी ५०० रुपये रोजगार देतो. दोन दिवसात काम होईल. तो म्हणाला,रोजाचं नकोच, गुत्याचं बोला. मी म्हटलं, सहाशे रूपये एका ट्रकचे देतो. दत्ताचा सोबती म्हणाला, दीड हजार रुपये ट्रीप भाव चालू आहे. तुम्ही बाराशे रूपये द्या....
यावर बराचवेळ चर्चा झाली. मी म्हटलं, ८००रूपये ट्रीप देतो. करायचं तर करा. दत्ता म्हणाला, आम्हाला अँटोचं भाड दररोज पाचशे रूपये वेगळे द्या. मी तयार झालो. ही सगळी चर्चा वावरात झाली. मी पुढे निघून गेटकडं आलो. दहा मिनीटांनी ते दोघेजण आले.
जवळ आल्याबरोबर दत्तासोबतचा माणूस म्हणाला, ८००रूपये ट्रीप परवडत नाही. १०००रूपये देणार असाल तरच काम करतो. दहा मिनीटातच त्यांचा दर बदलला होता. मी मनात हिशोब घातला. सोळाशे रूपये वाढणार होते. मला हे काम शक्य तेवढ्या लवकर संपवायचं होतंच. मी म्हटलं, ठीक आहे. सकाळी लवकर या. दोन दिवसात काम संपवून टाका. ते होकार देऊन निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मला दत्ताचा फोन आला....मळीच्या ट्रकचा भाव दीड हजार रूपये निघालाय. सोबतच्या माणसांशी आताच बोललो. ते म्हणतात की,दीड हजाराला ट्रीप असेल तरच काम करू.... माझ्या डोक्यात तीव्र सणक आली. ही सरळ सरळ अडवणूक होती. त्याला मी बळी पडणारचं नव्हतो. मी शांतपणे म्हटलं, दत्ता तुम्ही येऊ नका. माझं मी बघतो.
गवंडी काम करणारा आमचा मित्र दीपक रणक्षेत्रे ला सविता रोजंदारीच्या माणसांबाबत बोलली. त्यांच्या कामावर प्रत्येकी ४००रू.मजुरी असते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चार जणांना पाठवण्याचं मान्य केलं. दरम्यान मी ,नरेश, अनिता आणि मावशी, असं चौघांनी मळी टाकण्याचं काम सुरू केलं.
सकाळी चार तास आणि सायंकाळी दोन तास, असं सहा तासात आम्ही दिड ट्रकचं काम संपवलं.आम्हा सगळ्यांचा प्रत्येकी दोनशे रूपये रोजगार धरला तर आठशे रूपयात हे झालं. मी मळी टाकणं,टोपली भरून देणं,अशी दोन्ही कामं मजेत केली.त्याचा शारीरिक त्रास झाला पण मी कुठलंही काम सहज करू शकतो याचा आनंदही झाला.
दुसऱ्या दिवशी ते चार मजूर आले.त्यांनी दोन दिवसात हे संपवलं.त्यांचा ३२००रूपये रोजगार झाला. त्यांना २००रूपये बक्षीसी दिली.त्यांचे ३४०० आणि इतर १२०० असे ४६००रूपयांत हे काम संपले. यात माणसांऐवजी फक्त बायका कामाला लावल्या असत्या तर आणखी हजार-बाराशे रूपये वाचले असते.तरीही या कामासाठी मी एकूण ९०००रूपये द्यायला तयार झालो होतो. मजुरांनी याला संमतीही दिली होती.परंतु त्यांचा माझ्याबाबत गैरसमज झाला असावा. मला कामाची घाई आहे. कितीही पैसे मागीतले तरी देईन,असा त्यांचा गैरसमज झाला असावा. त्यांनी या कामासाठी एकूण १३००० रू.ची मागणी केली.
माझी दत्ता आणि त्यांच्या सोबत्यांबद्दल तक्रार नाही.ते कितीही मजुरी मागू शकतात.तो त्यांचा अधिकारच आहे. मात्र, किती मजुरी देणं परवडतं, ते तर मलाच ठरवावं लागेल.शि वाय कमीत कमी मनुष्यबळ लागेल अशीच शेती मी करण्याचा प्रयत्न करणार, हे ही स्पष्ट आहे. एका बाजुला माणसांच्या हातांना काम नाही अशी ओरड आहे.तर दुसऱ्या बाजुला असंही वास्तव आहे.या वास्तवाचा मी सतत अनुभव घेतोय.
आजही हाताखाली बिगारी काम करणारा माणूस मिळत नाही म्हणून दीपक मिस्त्रीचं काम आठवड्यातून दोन-तीन दिवस बंद असतं. हे कटू वाटलं तरी, वास्तवच आहे. माणसं अधूनमधून त्यांच्या सोईच्या मजुरीची कामं करतात. त्यात त्याचं कसं भागतं ते त्यांनाच विचारावं लागेल! दीपकची ती चार माणसं आमच्याकडं दोन दिवस काम केल्यानंतर, तीन दिवस त्याच्या कामावर आली नाहीत...
दीपकने त्यांचे सांगीतलेले किस्से ऐकून आम्ही मनसोक्त हसलो. योग्य मजुरी देऊनही शेतीकामासाठी माणूस मिळत नाही, हे न पटणारं सत्य आहे.शेतीचं मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झालयं म्हणून ठीक,नाही तर शेती कसणं अधिक मुश्किल झालं असतं. जे शेतीत स्वत: कष्ट करतात, ते निभावून नेतात.पण ज्यांची शेती पूर्णपणे मजुरांवर अवलंबून आहे, त्यांचे बेहाल आहेत.अशा शेतकऱ्यांशी बोललात तर,त्यांच्या व्यथा लक्षात येतील. दत्ता माझ्या चांगल्या परिचयातला असल्याने, मी त्याला फोन करून हे काम किती रुपयात झालं ते सांगीतलं....आणि सहज प्रश्न केला, तिप्पट पैसे तु कुठल्या हिशोबाने मागीतलेस.... त्याला याचं उत्तर देता आलं नाही...
कदाचित तो मनातल्या मनात खजील झाला असावा!