Home > मॅक्स ब्लॉग्ज > कुंकू-बिंदी आणि राजकारण्याची मानसिकता

कुंकू-बिंदी आणि राजकारण्याची मानसिकता

कुंकू वैश्विक शक्ती व प्राणशक्ती खेचून घेते का? कपाळावर कुंकू, बिंदी, सिंदूर लावल्यामुळे कपाळातील कुंडलिनी चक्र तेजोमय होते का? यासह बिंदीपेक्षा कुंकू हे जास्त पवित्र आणि सात्विक असते. असे वेगवेगळे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. या दाव्यांची सत्यता तुम्हाला माहिती आहे का? वाचा डॉ. प्रदीप पाटील यांचं विश्लेषण

कुंकू-बिंदी आणि राजकारण्याची मानसिकता
X

बिंदी, कुंकू किंवा सिंदूर नवऱ्याचे आयुष्य वाढवते असं कुठे दिसत नाही.... कुंकू, सिंदूर, बिंदी कपाळाला... भांगेत लावल्यामुळे जे नाहीतच ते कोणतेही देव किंवा देवी प्रसन्न होत नाहीत. तसे असते तर रीतसर झालेल्या लग्नात घटस्फोट झाले नसते! किंवा बायका विधवा झाल्या नसत्या.

विधवा आणि विवाहित हे ठळकपणे समाजात अधोरेखित केले जाते व लक्षात आणून देते. ते केवळ आणि केवळ कुंकू, बिंदी किंवा सिंदूर यांच्यामुळे. आणि तिथून विधवेच्या स्वातंत्र्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते आणि ती समाजातून बाहेर फेकली जाते. आयुष्यभर कोणताही रंग तिला लावता येत नाही. तिला पांढऱ्या रंगाच्या वेषात सतत वावरायला लावणारी परंपरा ही अतिशय अन्यायकारक परंपरा आहे.

कुंकू, बिंदी, सिंदूर लावल्याने नवऱ्याला दीर्घायुष्य मिळते ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे शत्रूपासून संरक्षण होते. असे एके ठिकाणी म्हटले आहे. ते कशाच्या आधारे हे समजत नाही.

कपाळावर कुंकू, बिंदी, सिंदूर लावल्यामुळे कपाळातील कुंडलिनी चक्र तेजोमय होते. ही अवैज्ञानिक गोष्ट आहे.

कुंकवात असलेल्या हळदीबद्दल तर भयानक अंधश्रद्धा आहेत. हळदीमुळे ताण-तणाव नाहीसे होतात आणि ती आरोग्य वाढवते. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. कुंकू वैश्विक शक्ती व प्राणशक्ती खेचून घेते. याच्या इतके भंकस विज्ञान कोणते नसेल!

मंगळ ग्रह लाल आहे. म्हणून कुंकू लावा. हे ज्योतिषशास्त्राचे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण याच ज्योतिषशास्त्राप्रमाणे मंगळ जर कुंडलीमध्ये असेल तर जोडीदार अल्पायुषी ठरतो. ही अंधश्रद्धा आहे.

एक विनोदी विज्ञान देखील मांडले जाते. सिंदूर जेव्हा कपाळावर लावले जाते. तेव्हा कपाळावरील वाईट पाणी त्यात शोषले जाते आणि शुद्ध पाणी कपाळात राहते. ज्यामुळे स्त्रीला मन केंद्रित करण्याची शक्ती प्राप्त होते. हे अगाध विज्ञान पाहून सर्व वैज्ञानिकांनी आत्महत्या करायला हरकत नाही.

बिंदीपेक्षा कुंकू हे जास्त पवित्र आणि सात्विक असते. असा वांझ वितंडवाद देखील या देशात चालतो. बिंदी लावल्याने तामसी वृत्ती वाढते, असा बिनडोक शोधही लावला गेलाय.

कुमकुम मधून सकारात्मक शक्ती प्रवेश करते आणि शरीरातील आत्मशक्ती वाढवते याच्या इतके घोर अज्ञानी विज्ञान कोणते नसेल.

कुंकू म्हणजे मर्क्युरी सल्फाईड. शरीरात गेले तर शरीरात विषबाधा तयार होईल. हे खरे विज्ञान म्हणता येईल.

कुंकू अन् बिंदीचा शोध घेतला तर आपणाला मेहरगड आणि बलुचिस्तान कडे जावे लागेल. तिथे उत्खननात सापडलेल्या काही मूर्त्यांच्या कपाळावर कुंकू आढळलेले आहे. अश्मयुगीन आणि ताम्रयुगीन काळातले सुमारे बारा हजार वर्षापूर्वीचे आदिमानव जिथे राहत होते. तेथे याचे अवशेष सापडतात. पण गंमत ही आहे की इथे राहणारे लोक हे मिश्र वर्णाचे होते. मग ते युरेशियातील असोत, युरोपातील असोत नाहीतर अशियातील असोत.

हरियाणात उत्खननात सापडलेल्या बिरहाना या गावातील लाल आणि काळ्या रंगाचे ड्रेस घालणाऱ्या परंपरा होत्या. हजारो संस्कृतींचे संमिश्रण म्हणजे आपली मानव जात असे असेल तर आम्ही खास वेगळ्या धर्माचे आणि बिंदी लावणारे फक्त आम्हीच असे म्हणणे बालिश ठरते.

उदाहरण द्यायचे झाले तर इराण आणि मध्यपूर्वेतील आशियातील लोकांचे संमिश्रण हे भारताच्या प्राचीन परंपरांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. लॅक्टोज टॉलरन्स जीन यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन या विषयीचा निष्कर्ष जाहीर झाला आहे.

एकोणिसाव्या शतकात शहाबुद्दीन मनेरी या सुफी अवलियाने बांगलादेशमध्ये मुस्लिम स्त्रियांनी कुंकू लावण्यासाठी प्रसार केला. जावा बांगलादेश आणि इंडोनेशिया येथील मुस्लिम व अन्यधर्मीय लोक देखील बिंदी लावतात. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी वापरलेली बिंदी ही कोणत्याही संस्कृतीची मक्तेदारी राहिलेली नाही.

देव-देवीला प्राणी बळी दिल्यावर वाहणाऱ्या रक्ताचा टिळा लावण्याची आदिम प्रथा होती. रक्तरंगाचा वापर रानटी समजुतीतून पुढे विकसित झाला. दैवी शक्ती प्रसन्न रहावी या आदिम समजुतीतून सौभाग्यवती रहाण्याचे लक्षण म्हणून बिंदी अवतरली असावी. त्याचा वापर सामाजिक वेगळेपण दाखविण्यासाठी सुरू झाला.

काळी बिंदी कुमारिकांसाठी, विधवेचे कपाळ मोकळे, v किंवा U किंवा तीन आडव्या रेषांनी वेगवेगळ्या संप्रदायाच्या खुणा म्हणून वापर होत आलाय.

इंडस व्हॅली मध्ये सापडलेल्या पुरातन मुर्त्यांच्या कपाळावर काही मुर्त्यांमध्ये बिंदी लावल्याचे आढळते. मात्र त्या कोणत्या आदिवासी टोळ्यांच्या होत्या हे सांगता येत नाही.

सिंदूर किंवा कुंकू हे हळद, चुना किंवा अलम सल्फेट पासून पारंपारिक पद्धतीत तयार करतात. मात्र, सध्या बाजारात मिळणाऱ्या कुंकवामध्ये मर्क्युरीक सल्फाईड नावाचे विषारी पदार्थ असतात. ज्यात लाल शिसे किंवा रेड लीड हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

मेंदूचे रोग ते मृत्यू असे त्याचे साईड इफेक्ट आहेत.

बिंदी ही कुंकवा पेक्षा वेगळी असते. दोन्ही भुवयांच्या मध्ये एखादे टिम्ब लावले की बिंदी तयार होते. शक्यतो लाल रंग वापरला जातो.

दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र नावाचे कुंडलिनी चक्रातले सहावे चक्र असते. अशी अंधश्रद्धा आहे. हे चक्र ब्रम्ह्याशी जोडले गेले आहे, याला तिसरा डोळा असे देखील म्हणतात, ज्याला विज्ञानाचा कोणताही आधार नाही. हा तिसरा डोळा वापरून साक्षात्कार होतात आणि भविष्यातील आणि भूतकाळातील सर्व घटना बघता येतात अशी घोर अंधश्रद्धा आहे.

या आज्ञाचक्रात इडा आणि पिंगळा अशा दोन नाड्या असतात, ज्या सुषुम्ना नाडीस जाऊन मिळतात, या आज्ञाचक्रात असलेले त्रिकोणाचे निमुळते खाली असलेले टोक म्हणजे लिंग, ज्याच्यात हाकिनी शक्ती असते, यातून स्वयंप्रज्ञा जन्म घेते, ही सर्व मांडणी म्हणजे निव्वळ कल्पनारंजन आहे.

बरेच जण आज्ञाचक्र म्हणजेच पीनियल ग्रंथी होय असा दावा करतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात हे अमान्य आहे. यामध्ये भंपक विज्ञान असे मांडले जाते की, पीनियल ग्रंथीतून मेलाटोनिन नावाचे रसायन पाझरते. जे अंतर्मनात निद्रा आणि जागृती यावर नियंत्रण ठेवते असे हे आज्ञाचक्र जर जागृत केले तर अहंकारापासून मुक्ती मिळते. असे तत्वज्ञान मांडले जाते. तेव्हा स्वतःच्या संस्कृतीचा वृथा गौरव करणाऱ्या सर्वांनी हे चक्र जागे करून स्व अहंकार घालविला तर बरे होईल !

लाल रंग हा सन्मान, प्रेम आणि भरभराट यांचे प्रतीक मानला जातो. पण भारतातल्या स्त्रियांना कुंकू किंवा बिंदी लावून देखील हे वाट्यास येणे अतिशय दुर्लभ ठरते.

नजर लागू नये म्हणूनही बिंदीचा वापर लहानग्यांमध्ये केला जातो.

जगाच्या पाठीवर संस्कृती संघर्ष सगळीकडे होत आलेला आहे. परसंस्कृतींवर हल्ले करून ती नष्ट करणे ही रानटी पद्धत होती. आज हे हल्ले याच रानटीपणाचे निदर्शक आहे. आर्थिक बहिष्कार हे एक प्रकारे आधुनिक शस्त्र ठरले आहे. परसंस्कृती विनाश तोही राजकारण आणि धर्म जागरणासाठी करणे ही जंगली समजूत होय. ही समजूत भारतात आजही पसरलेली आहे. आणि तो विनाश सर्व धर्मांनी अखंडपणे चालविला आहे.

बिंदी हे स्त्रियांना सुशोभित करते... त्यांचे सौंदर्य खुलविते... आणि मग ही स्त्री कोणत्याही धर्माची असो वा संस्कृतीची. जगातील सर्व स्त्रियांनी त्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी बिंदीचा, कुंकूचा वापर केला तर काहीच बिघडणार नाही. पण याहूनही पुढची गोष्ट अशी आहे की, स्वतःचे सौंदर्य कसे खुलवायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असते. प्रत्येक स्त्रीने ते स्वातंत्र्य धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली गमावू नये एवढा विवेक बाळगला तर खरी स्त्री शक्ती जागृत होईल. पण निव्वळ राजकारण करणाऱ्यांना तेवढी सुबुद्धी असती तर त्यांचे कपाळ बिंदी मुळे तेजोमय झाले असते..

बिंदीचे राजकारण करणाऱ्यांचे कपाळ अंधारून गेलेले आहे एवढेच यातून सिद्ध होते.

- डॉ. प्रदीप पाटील

Updated : 23 Oct 2021 11:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top