Home > मॅक्स ब्लॉग्ज > एक किरण विझून जाताना ......

एक किरण विझून जाताना ......

एकेकाळी तरुणाईचे आयडॉल ठरलेल्या पोलीस अधिकारी किरण बेदी यांना अपमानास्पदरित्या पोंडीचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून दूर करण्यात आल्यानंतर समाजातून आणि समाज माध्यमातून कोणत्याही प्रतिक्रिया उमटल्या नाही त्याचं विश्लेषण केलं आहे हेरंब कुलकर्णी यांनी...

एक किरण विझून जाताना ......
X

तुम्ही तुमच्याच भूतकाळाशी विसंगत वागलात तर समाज तुम्हाला विसरून जातो याचे उदाहरण आज किरण बेदी ठरल्या आहेत. ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध तुम्ही लढलात त्या व्यवस्थेचे भाग होणे लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत.. पॉडेचरीचे नायब राज्यपाल म्हणून त्यांना अपमानकारकरित्या राष्ट्रपतींनी काढून टाकले परंतु त्याची रेष सुद्धा मीडिया व समाजात उमटली नाही.. त्यापुढे त्या वादात त्या बरोबर होत्या की चूक हा मुद्दा गौण ठरला आहे परंतु एकेकाळी कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तीला इतक्या अपमानकारकरित्या परत बोलावल्यावर काहीही प्रतिक्रिया समाजमनात उमटत नाही याचे कारण समाज तुम्हाला जेव्हा आदर देतो तेव्हा तुमचे निर्णय हे समाजाला पटतील असेच असते पाहिजेत किंवा तुमच्या मागील जीवनाशी सुसंगत असले पाहीजे... तुमची व्यक्तिकेंद्रित प्रेरणा ही तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून व्यक्त होत असाल तर ती बाजूला ठेवायला हवी.. एकेकाळी याच किरण बेदी तरुण पिढीच्या आयकॉन होत्या.

1975 ते 2000 या काळात किरण बेदीच्या प्रेरणेने अनेक महिला व तरुणांमध्ये चैतन्य संचारले, एक धाडस रुजवले त्याच किरण बेदी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात आल्या तर यांच्या ग्लॅमरचा आंदोलनाला नक्कीच उपयोग झाला. एक विश्वासार्हता मिळाली परंतु ज्या काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय संस्कृती विरुद्ध आंदोलन केले त्याच भाजपात काही दिवसात त्यांनी प्रवेश केला आणि तिथेच त्यांचा समाज मनातील आदर संपला. इथे मुद्दा भाजप हा नाही तर काँग्रेस मध्ये गेल्या असत्या तरी लोकांनी स्वीकारले नसते कारण जनतेने तुम्हाला प्रस्थापित विरोधी भूमिका दिली होती.

त्यामुळे नंतर त्यांना पद मिळाले परंतु त्या पदाने त्यांची प्रतिष्ठा वाढली नाही उलट एक अनास्थाच समाजमनात निर्माण झाली. त्यामुळे नंतर त्या पदावर त्या राहिल्या काय किंवा गेल्या काही याचे कोणतेही सोयरसुतक जनतेला आज राहिले नाही. त्यामुळे आज त्या पूर्णतः समाज मनातून विसरल्या गेल्या आहेत. समाज ज्याना खूप आदर देतो असे लोक जीवनाच्या उत्तरार्धात अशा अनेक चुका करतात.भाजपात प्रवेश करून मुख्यमंत्री व्हायला निघालेले श्रीधरन अशीच चूक करून बसले आहेत.. याचा अर्थ प्रसिद्ध व्यक्तींनी राजकारणात जाऊच नये का? असा विचारला जाईल परंतु राजकारणात जाण्याची तुमची प्रेरणा कोणती आहे हे समाज ओळखत असतो. आणि तुम्हाला जर प्रस्थापित संस्कृतीविरुद्ध तुम्ही लढला असाल तर तुम्ही त्या व्यवस्थेचा भाग होणे लोक स्वीकारत नाहीत.

किरण बेदी यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध या आंदोलनात भाग घेतल्यामुळे प्रस्थापित पक्षात जाणे हे अजिबात समर्थनीय ठरले नाही. अनेक अधिकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ यशस्वी राजकारण केले आहे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या सारखी काही उदाहरणे आहेत परंतु पूर्णवेळ तळागाळातील राजकारणात सामील होणे वेगळे आणि केवळ सत्ताधारी एखादे पद देतील म्हणून वरच्या वर्तुळाच्या राजकारणात जाणे वेगळे हे लोक समजत असतात. तेव्हा एके काळी 'आय डेअर' या आत्मचरित्र शेकडो तरुणांना प्रेरित करणाऱ्या किरण बेदी अस्तंगत झाल्या आहेत. एकेकाळी आमच्यासारख्या शेकडो तरुणांना अंगावर शहारे आणणार्‍या किरण बेदी आज ज्या प्रकारे केविलवाण्या झाल्यात ते बघून वाईटही वाटते आणि दुसरीकडे हा धडा घ्यायला हवा हेही लक्षात येते.

Updated : 21 Feb 2021 12:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top